Cornavirus: भाजीपाला, फळ मार्केट बंद राहणार!

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च पर्यंत मार्केट एक दिवस आड करुन बंद ठेवण्यात येणार आहे.

sanpada market
Cornavirus: भाजीपाला, फळ मार्केट बंद राहणार!  

राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत खबरदारी म्हणून सानपाडा येथील एपीएमसीमधील भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केट गुरुवारपासून एकदिवस आड करुन बंद राहणार आहे. मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्केट बंद करण्यात येणार आहेत.

सानपाडा येथील भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटमध्ये गुरुवारी १९ मार्च रोजी निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याने दोन्ही मार्केट बंद ठेवण्यात आल्याचे भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. शुक्रवार आणि शनिवारी पुन्हा मार्केट सुरु ठेवून रविवारी पुन्हा निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पिंगळे म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च पर्यंत मार्केट एक दिवस आड करुन बंद ठेवण्यात येणार आहे. ३१ मार्च पर्यंत इन आणि आऊटचे गेट निश्चित केले आहेत. त्याव्यतिरिक्त इतर ग्रेट मधून प्रवेश दिला जाणार नाही. गेटवर प्रवेश करताना सॅनिटाइजरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पिंगळे म्हणाले.


हेही वाचा – करोना: ‘त्या’ ट्विटबाबत जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा, कॉलेज बंद ठेवले आहेत. गर्दी टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. दरम्यान, अनावश्यक गर्दी कमी झाली नाही तर, लोकल ट्रेन बंद करण्याचा विचार करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.