भुसे-कांदे वादात मुख्यमंत्र्यांची ओझरती भेट; वाद शमला की नाही अद्याप गुलदस्त्यात

नाशिक : जिल्याचे पालकमंत्री दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यातील अंतर्गत नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये काय तोडगा काढतात याविषयी सर्वांना उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी जास्त वेळ न देता या प्रकरणी ओझरती चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफुसीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आमदार संजय शिरसाठ यांच्या नाराजीची बातमी समोर आली. पण दोन्ही नेत्यांनी याबाबतच्या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. आपण नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या नाराजीच्या चर्चांना विराम मिळत असतानाच शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या नाराजीचा प्रकार समोर आला. त्यांची देखील नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: आमदार कांदे यांना काही दिवसांपूर्वी फोन केला होता. त्यानंतर आमदार कांदे यांनी मंगळवारी (दि.15) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असलेल्या आदिवासी समाजाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली.
या दौर्‍यात काहीतरी चर्चा घडेल, अशी दोघांनाही अपेक्षा लागून होती. त्यामुळे पालकमंत्री भुसे व आमदार कांदे हे दोघेही मुख्यमंत्र्यांना घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले. तेथून सोबत आल्यानंतर धावती चर्चा झाल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले. परंतु, काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे दोघांमधील दुरावा कमी झालेला असला तरी मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला हे अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.