खरी शिवसेना आम्हीच, लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

आज सरकारवरचा विश्वासदर्शक ठरावही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या प्रमाणे 164 विरुद्ध 99 तो जिंकलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानलेले आहेत. अधिवेशनाची तारीख चर्चा करून ठरवली जाईल, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय

मुंबईः खरी शिवसेना आम्हीच आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत सभागृहातच आहोत ना, आम्हाला बाहेर तर पडू द्या, सभागृहातून बाहेर गेल्यानंतर बघू या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते. लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्वं असतं आणि दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. या देशात कायदा आहे, नियम आहेत. त्याच्याबाहेर कोणाला जाता येणार नाही. कोर्टानं त्यांना फटकारलंय. आज गेले आणि उद्यापण जातील, पण कोर्ट त्यांना उभं करणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

आपल्या सरकारला मतदान केलेल्या आमदारांची मत राष्ट्रपतींपदाच्या उमेदवाराला मिळणार आहेत. संतोष बांगर चुकीच्या गटात होते, ते आता खऱ्या शिवसेनेत आले. भरत गोगावलेंच्या व्हिपचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. काल आम्ही स्पीकरची निवडणूक घेतली, त्यातही आम्ही बहुतमानं निवडणूक जिकंली, आज सरकारवरचा विश्वासदर्शक ठरवही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या प्रमाणे 164 विरुद्ध 99 तो जिंकलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानलेले आहेत. अधिवेशनाची तारीख चर्चा करून ठरवली जाईल, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.

आमच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचं आणि शिवसेना-भाजप युतीचं सरकारची काल सुरुवात झालेली आहे. मी सभागृहात सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आमच्या 50 लोकांच्या गटाला देवेंद्रजींनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तो सगळ्यांना माहीत आहे. त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. त्यामुळेच एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय फडणवीसांनी घेतलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा या सगळ्यांच्या सहकार्यातून सुरुवात होतेय. लोकांच्या अपेक्षेचं सरकार आहे. काही कारणास्तव वेगळं सरकार स्थापन झालं. जनतेच्या मनातलं जे काही असतं, ते पूर्णतः जातं. आणि खऱ्या अर्थाने 50 इकडे आहेत. एक चांगली सुरुवात झालेली आहे. लोकहिताचे निर्णय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आपल्याला माहीत आहे. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता होती, त्याची केंद्राकडून परवानगी मिळवून ते अडथळे दूर करणे हे पाच वर्षांच्या कालावधीत केली, असंही ते म्हणालेत.

मेट्रो उभी राहिलेली पाहिलीय. मेट्रोची रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेत आहोत. या राज्यातील सर्व घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. जलसंपदेची काही कामं अडलेली आहेत, ती पूर्णत्वास नेणार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास आमच्या सहकाऱ्यांना आणि विरोधकांना विश्वासात घेऊन करू. 100 टक्के कामं आम्ही करू शकत नाही, पण जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्यामुक्त करणार आहोत. हिरकणी गावाच्या विकासाठी 21 कोटींचा निधी दिलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवारचे आदेश देऊन टाकलेले आहेत. राज्याच्या विकासात कुठेही काही कमी पडणार नाही. गृहमंत्र्यांनीही विकासात आवश्यक बाबींना पाठिंबा देऊ असं सांगितलं आहे. केंद्राकडे प्रलंबित विषय सोडवले जातात. देवेंद्र फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होणार असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

केंद्रीय नेतृत्वाशी बोलून लवकरच खातेवाटप करणार आहोत. आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतोय. आजही कोर्टात गेलो होतो. बाळासाहेबांचं हिंदुत्व सगळ्यांना माहीत आहे. महाविकास आघाडीच सगळ्यांची घुसमट होत होती, त्यामुळे आता आम्ही मोकळा श्वास घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय. शरद पवार साहेब ते खूप मोठे नेते आहेत. शरद पवार जे काही भाष्य करतात त्याच्या नेमकं उलटं होतं. त्यामुळे आमचं सरकार पूर्ण अडीच वर्षे चालेल. अडीच वर्षाचा पूर्ण कार्यकाळ आमचं सरकार पूर्ण करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.


हेही वाचाः व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते – देवेंद्र फडणवीस