राज ठाकरे-भाजपमध्ये आता ‘व्यंगचित्र’ वॉर!

राज ठाकरेंनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या व्यंगचित्राला आता भाजपकडून व्यंगचित्राच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Raj Thackeray PM Narendra Modi
राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकीकडे देशभरात ७०व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसत असताना सोशल मीडियावर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपमध्ये ऑनलाईन वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळीच राज ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत व्यंगचित्र काढून भाजप आणि नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीवर परखड पद्धतीने टीका केली. त्यालाच आता भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. गंमतीचा भाग म्हणजे राज ठाकरेंच्याच व्यंगचित्रामध्ये फेरफार करून हे प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर या सोशल वॉरमुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये ऑनलाईन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray Cartoon
राज ठाकरे यांचे व्यंगचित्र

काय आहे राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात?

प्रजासत्ताकला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह फासावर लटकवत आहेत असं दर्शवणारं व्यंगचित्र राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केलं. यामध्ये फासाची दोरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असून अमित शाह त्यांच्या पाठिमागे उभे राहून ‘मोदींचे हात बळकट करा!’ असं सांगत आहेत. व्यंगचित्राच्या वर मथळ्याच्या रुपात ‘स्वतंत्रते न बघवते’ असं लिहिण्यात आलं आहे. राज ठाकरेंचं हे व्यंगचित्र अपेक्षेप्रमाणे भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे भाजपकडून देखील व्यंगचित्राच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

BJP Cartoon on Raj Thackeray
राज ठाकरेंवर भाजपचे व्यंगचित्र

भाजपच्या व्यंगचित्रात कुणाकडे रोख?

भाजपने काढलेल्या व्यंगचित्रामध्ये प्रजासत्ताकऐवजी थेट राज ठाकरे यांनाच फासावर लटकावलेले दाखवण्यात आले आहे. शिवाय वर ‘स्वतंत्रते न बघवते’ऐवजी ‘अच्छे दिन न बघवीते’ असे लिहिण्यात आले आहे. शिवाय, मोदींच्या हाततल्या दोरीवर ‘नोटबंदी’ असे देखील लिहिण्यात आले आहे. त्यामुळे नक्की या व्यंगचित्रात कोणत्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात आले आहे हे जरी स्पष्ट होत नसलं, तरी राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं आहे हे मात्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि भाजप यांच्यात हे व्यंगचित्र वॉर होत असताना दिसत आहे.