स्थायी समिती अध्यक्षांविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव

सत्ताधारी शिवसेनेकडून जनहितार्थ होणारी विकासकामे पाहवत नाही. त्यामुळेच ते अविश्वास ठराव आणत आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

BJP files Motion of no confidence against Yashwant Jadhav
BJP files Motion of no confidence against Yashwant Jadhav

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असलेल्या कोविड सारख्या महत्वाच्या विषयांवर आणि अन्य विषयांवर भाजप सदस्यांना बोलू दिले जात नाही. नियमबाह्य पद्धतीने ऐनवेळी आणलेले प्रस्ताव अभ्यास करू न देता तसेच मंजूर केले जात आहेत. त्यामुळेच आम्ही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘अविश्वास ठराव’ आणला आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. यासंदर्भात भाजपने एक पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठवले असून तातडीची सभा बोलावण्याची मागणी केली आहे. या पत्रावर भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट, राजेश्री शिरवाडकर, मकरंद नार्वेकर, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे, विद्यार्थी सिंह या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मुंबईच्या विकासाच्या विरोधात भाजप – यशवंत जाधव

भाजपच्या सदस्यांना ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष बैठकीतही मी प्रत्येक वेळी व प्रत्येक विषयावर बोलायला दिले आहे. मात्र राज्यात व पालिकेत सत्ता हाती नसलेल्या भाजपची सध्याची भूमिका ही मुंबईतील विकासकामांमध्ये उगाच अडथळे आणणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून सभेत गदारोळ करणे, गोंधळ घालणे, तिरसट बोलणे, सभा तहकुबी मांडणे हीच असल्याचे गेल्या चार वर्षात दिसून आले आहे. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचे भांडवल करतात. त्यांना सत्ताधारी शिवसेनेकडून जनहितार्थ होणारी विकासकामे पाहवत नाही. त्यामुळेच ते अविश्वास ठराव आणत आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

तसेच, पालिका कायद्यानेच समितीचे कामकाज चालते. मात्र कधी कधी प्रथा , परंपरा, संकेत आदींचा विचार करून कामकाज करावे लागते. भाजपच्या काही नगरसेवकांच्या विकासकामांचे प्रस्ताव ऐनवेळी मंजुरीला आले व त्यांच्या विनंतीवरून ते मंजूर करण्यात आले आणि त्यांना शिवसेनेने सहकार्य केले आहे. मात्र त्यावेळी भाजपचे नेते आमच्या नगरसेवकांचे विकासकामांचे ऐनवेळी आलेले प्रस्ताव मंजूर करू नका, अन्यथा आम्ही विरोध करू, अशी भूमिका घेताना कधी दिसले नाहीत, अशी खोचक टोला यशवंत जाधव यांनी भाजपला लगावला आहे.


हेही वाचा – पालिका कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत विमा योजना मंजूर