घरमुंबईउत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींचा पत्ता कापणार

उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींचा पत्ता कापणार

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. शेट्टींऐवजी दुसऱ्या उमेदवारांना युतीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून आपल्या कामाचा सपाटा लावला असला तरी त्यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. शेट्टी यांच्या विरोधातील लाटेमुळे त्यांचा पत्ता कापून चारकोपचे आमदार योगेश सागर यांना लोकसभेत पाठवण्याचा विचार सुरु आहे. शेट्टी यांना पर्याय म्हणून पालकमंत्री विनोद तावडे यांचेही नाव चर्चेत होते, परंतु तावडे यांनी याबाबत नकार दर्शवल्यामुळे योगेश सागर यांना दिल्लीत पाठवण्याचा पक्षाचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

गोपाळ शेट्टींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून बोरीवलीतील आमदार गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा झाली. या निवडणुकीत शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार संजय निरुपम यांचा साडे चार लाख मतांनी पराभव केला. भाजपची ताकद कमी असताना केवळ मोदी लाटेमुळे शेट्टी यांनी साडेचार लाखांचे मताधिक्य घेतले होते. परंतु त्यानंतर भाजपचे आमदार वाढून त्यांची संख्या ४ झाली. तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे नगरसेवक वाढून त्यांची संख्या २४ झाली. त्यामुळे भाजपची ताकद मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक वाढलीच आहे. आता त्यात युती झाल्याने सेनेच्या मदतीने ही ताकद अधिकच वाढली आहे. त्यामुळे भाजपसाठी या मतदार संघात कुणाचेही आव्हान नसून शेट्टी यांच्या स्वभावामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले जात असल्याने त्यांना बदलण्याचा विचार पक्ष पातळीवर सुरु आहे.

- Advertisement -

शेट्टींच्या जागेवर ‘या’ उमेदवाराच्या नावाची चर्चा

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी यांच्या विरोधात बहुतांशी पदाधिकारी असल्यानेच याठिकाणी उमेदवार बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र याबाबत ठोस निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शाह घेतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु याठिकाणी सर्व प्रथम शिक्षण मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर होते. तावडे यांना दिल्लीत पाठवून राज्याच्या राजकारणातील एक स्पर्धक कमी करण्याची रणनिती मुख्यमंत्र्यांची होती. त्यामुळेच त्यांना खासदारकीसाठी विचारले गेले होते. परंतु दिल्लीपेक्षा आपली गल्ली बरी म्हणत तावडे यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचा निर्णय घेत ही ऑफर नाकारली. त्यामुळेच तावडे यांच्यानंतर योगेश सागर यांचे नाव पुढे आले आहे. खुद्द सागरही होणार्‍या बदलास सामोरे जाण्यास तयार आहे. परंतु शेट्टी यांचा पत्ता कापला जाणार असला तरी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचाही पर्याय पक्षाकडे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व गणिते जुळून आल्यास सागर यांना उत्तर मुंबईतून लोकसभेवर आणि शेट्टी यांना राज्यसभेवर पाठवले जाईल,अशी माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -