घरमुंबईसुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन लवकर गुंडाळणार? सूत्रांची माहिती

सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन लवकर गुंडाळणार? सूत्रांची माहिती

Subscribe

देशभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर संपवावं अशी विनंती मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशन १ दिवस आधीच संपण्याची शक्यता आहे.

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर झाल्यानंतर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणेच अर्थसंकल्पावर टीका केली. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अजून २ दिवस शिल्लक असताना ते उद्याच म्हणजे एक दिवस आधीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. पुलमावामा भ्याड दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेला एअर स्ट्राईक आणि त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचसंदर्भात आज (बुधवारी) मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

अधिवेशनावर पुलवामा हल्ल्याची सावली

भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीमुळे देशभरात विविध शहरांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. विशेषत: मुंबईमध्ये याआधीही दहशतवाद्यांनी हल्ला केला असल्यामुळे मुंबईतल्या पोलीस दलावर अधिक जबाबदारी असणार आहे. असं असताना मुंबईत राज्यभरातले सगळेच आमदार, मंत्री एकत्र असणं आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात असणं हे सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या दृष्टीने जिकिरीचं होत असल्याची बाब या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

पाहा : ‘त्या’ बेपत्ता जवानाचा Video व्हायरल

५ ते ६ हजार पोलीस विधान भवन परिसरात

दरम्यान थेट आयबीकडून अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अधिवेशनात ५ ते ६ हजार पोलीस फौजफाटा सुरक्षेसाठी विधानभवन आणि आसपासच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. यामुळे शहरात इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात पोलीस दलाला अडचणी येत असल्याचं या बैठकीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळलं जाण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्याआधी विनियोजन विधेयक मंजूर करणं सरकारला क्रमप्राप्त आहे. कारण त्याशिवाय अर्थसंकल्प मंजूर होत नाही. त्यामुळे विनियोजन विधेयक मंजूर झाल्यानंतर अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -