घरताज्या घडामोडीकामचुकार रेल्वे पोलिसांची आता खैर नाही

कामचुकार रेल्वे पोलिसांची आता खैर नाही

Subscribe

रेल्वे पोलिसांवर सतत नजर ठेवण्याकरिता ई-पेट्रोलिंग अॅप सुरु करण्यात येणार आहे. या अॅपसाठी ८० लाख खर्च केले आहेत.

रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांसह रेल्वेच्या परिसरातील प्रवासी, मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची असते. त्यामुळे आरपीएफ जवान पेट्रोलिंगवर असतात. मात्र यातील काही पोलीस कामचुकारपणा करत असल्याचा वारंवार तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे गुजरातचा धर्तीवर मध्य रेल्वेने ई-पेट्रोलिंग सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या ई-पेट्रोलिंगसाठी एक मोबाईल अॅप तयार केला आहे. या ई-पेट्रोलिंग अॅपची सुरुवात ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. या मोबाईल अ‍ॅपसाठी ८० लाख खर्च केले असून याच्या माध्यमातून प्रत्येक आरपीएफ जवानांचा ठावठिकाणा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे सतत लक्ष असणार आहे. त्यामुळे आता कामचुकार रेल्वे पोलिसांची आता खैर नाही.

कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार

मध्य रेल्वेवर १ हजार ७०० आरपीएफ जवान तैनात आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ३५१ जवानांचा समावेश आहे. यांना रेल्वेच्या मालमत्ता आणि प्रवासी सुरक्षेसाठी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामे आणि ठिकाणे निश्चित केली जातात. पण संबंधित कर्मचारी निश्चित ठिकाणी आहे किंवा नाही, त्याची दैनंदिन कामे पूर्ण होत आहेत का? याबाबत लगेच माहिती मिळत नाही. त्यादृष्टीने ‘आरपीएफ’कडून ई-पेट्रोलिंग अ‍ॅप विकसित केले जात आहे. हे अ‍ॅप आरपीएफच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये असेल. या अ‍ॅपमध्ये प्रत्येकाने लॉगिन केल्यानंतर ते ज्या ठिकाणी जातील, ते ठिकाण नियंत्रण कक्षात समजणार आहे. त्यानुसार संबंधितांना आवश्यकतेनुसार अ‍ॅपवरच सूचनाही दिल्या जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे. सध्या हे काम प्राथमिक पातळीवर असून ३१ मार्च २०२० रोजी कार्यान्वित होईल.

- Advertisement -

९७ स्थानकांच्या होणार ई-पेट्रोलिंग

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ९७ स्थानकांच्या परिसरानुसार ई-पेट्रोलिंगसाठी ६०० सेक्शन (परिसर)आणि बीटची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ एनेलिटिक कॅमेरे आणि मेटेल डिटेक्टर बसविण्यात येणार आहेत. व्हिडिओ एनेलिटिक कॅमेरे, मेटेल डिटेक्टर, रेल्वे स्थानकांमधील संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी बसविण्यात येणार आहेत. एखादी व्यक्ती संशयास्पद दिसली किंवा त्याच्याकडे काही घातक सामान असेल तर या कॅमेऱ्यांचा बज्जर वाजणार. त्यामुळे आरपीएफला त्यानुसार कारवाई करण्यास मदत होणार आहे. गर्दीच्या स्थानकांमध्ये हे कॅमेरे बसविण्याची योजना करण्यात येणार आहे.

काम न केल्यास अलर्ट

प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप असेल. कामाच्या ठिकाणी कर्मचारी आल्यानंतर अ‍ॅपवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर संबंधिताला कामाचे क्षेत्र व नेमून दिलेले काम तसेच इतर माहिती उपलब्ध होईल. त्यानुसार तेच काम करावे लागेल. या क्षेत्राच्या बाहेर गेल्यास त्याचा अलर्ट नियंत्रण कक्षाकडे जाईल. काही घटना घडल्यास किंवा प्रवाशांना काही मदत हवी असल्यास अ‍ॅपवर अलर्ट देता येईल. त्यानंतर तातडीने मदत पोचविणे शक्य होईल.

- Advertisement -

‘आरपीएफ’कडून ई-पेट्रोलिंग अ‍ॅप प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये असेल. या अ‍ॅपमध्ये प्रत्येकाने लॉगिन केल्यानंतर ते ज्या ठिकाणी जातील, ते ठिकाण नियंत्रण कक्षात समजणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कोणते गुन्हे, घटना किंवा इतर घडामोडी कोणत्या वेळेत घडतात, याची संपूर्ण माहिती व ठिकाण अ‍ॅपवर निश्चित केले जाईल. कर्मचाऱ्यांच्या कामाचे ठिकाणीही निश्चित केले जाईल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सुरक्षेत भर वाढणार आहे. – के.के. अशर्फ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ मध्य रेल्वे मुंबई


हेही वाचा – अनधिकृत बांधकाम रोखल्याने, दहिसरच्या नदीचा प्रवाह मोकळा


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -