घरमुंबईएल्फिन्स्टनच्या नव्या पुलाला 'दुबईचे' छत!

एल्फिन्स्टनच्या नव्या पुलाला ‘दुबईचे’ छत!

Subscribe

एल्फिन्स्टन स्थानकावर बांधण्यात आलेला नवा पूल लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या पुलाला दुबईचे छत बसवण्यात आल्यामुळे हा पूल सध्या चर्चेत आहे.

एल्फिन्स्टन पुलावर घडलेली दुर्घटना आजही मुंबईकरांच्या मनात ताजी आहे. एका नव्या मुद्द्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. परळ एलफिन्स्टन स्थानकाला जोडणाऱ्या नव्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आजपासून हा पूल प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या पुलाला लावण्यात आलेले नवे छत चर्चेचा विषय ठरत आहे. हे छत खास दुबई येथून आणण्यात आले आहे. एल्फिन्स्टन रोड आणि परळ या दोन स्थानकांना जोडणारा हा पूल मध्य व पश्चिम रेल्वेकडून उभारण्यात आला आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या मध्यावर बांधण्यात आलेला हा नवा  ७० मीटर लांब तर १२ मीटर रुंद आहे. आहे. हा पुल खुला झाल्यानंतर एल्फिन्स्टन स्थानकातील जुन्या पुलावरील भार कमी होणार आहे.

‘दुबई’च्या छताची जोरदार चर्चा

या नव्या पुलासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, पुलाचं छत खास दुबईवरुन मागवण्यात आलं आहे. दुबईचं छत बसवण्यात आल्यामुळे हा पूल सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. अशाप्रकारे छत बनवण्याचं काम इंडालगो नावाची एक भारतीय कंपनीही करते. मात्र, पुलासाठी कमी वजनाच्या आणि अधिक भक्कम छताची गरज होती. तसंच हे काम लवकर पूर्ण होणंही अपेक्षित होतं. त्यामुळे हे छत दुबईवरुन आणण्यात आल्याची माहिती,  श्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दुबई येथून आणलेलं छत वजनाने हलकं असून, त्याची टिकाउ क्षमता अधिक असल्याचंही, त्यांनी सांगितलं.

अखेर प्रतीक्षा संपली

एलफिन्स्टन स्थानकावरील नव्या पुलाला रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये मंजुरी दिली होती. परंतु या पुलासाठी निविदा मागवण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने खूप विलंब केला. तब्बल एका वर्षानंतर रेल्वेने पुलासाठी निविदा मागवल्या. २९ सप्टेंबर २०१७ रोजी येथील जून्या पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली होती. त्यामध्ये २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. नवा पूल वेळेत उभारला असता तर ही दुर्घटना टळली असती. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. दुर्घटनेमुळे जागे झालेल्या प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पुलाचे काम सुरु केले. ८ महिन्यानंतर नव्या पुलाचे काम पूर्ण झाले असून आता हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.


सुशांत सावंत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -