घरमुंबईसरकारपेक्षा लोकांचा गणपतीवर विश्वास ! खरेदीसाठी दादरमध्ये प्रचंड गर्दी

सरकारपेक्षा लोकांचा गणपतीवर विश्वास ! खरेदीसाठी दादरमध्ये प्रचंड गर्दी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे, मात्र या सर्व गोष्टीला छेद देत बाप्पांच्या आगमनासाठी मुंबईकर कोरोना आणि पावसाला भीक न घालता गणेशोत्सवासाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शुक्रवारी घराबाहेर पडले होते. त्यामुळे दादरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. या गर्दीत कोरोनासुध्दा चिरडून जाईल, असे चित्र दिसत होते. आमचा सरकारपेक्षा गणपती बाप्पावर अधिक विश्वास आहे, अशी भावना खरेदीसाठी आलेल्या मुंबईकरांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे अनेक दिवस बंद असणार्‍या बाजारपेठा गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या होत्या. लाडक्या गणरायाचे आगमन शनिवारी घरोघरी होणार असून त्याच्या स्वागतासाठी लागणारी फुले, फळे आणि इतर पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी शुक्रवारी सकाळीपासूनच दादरमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाचा जोर जास्त असतानाही ग्राहकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. या गर्दीमुळे दादरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शारदाश्रम शाळेपासून ते प्लाझा सिनेमापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

कोरोनाची कसलीही भीती गर्दीतील नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसत नव्हती. सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले होते. जणूकाही या गर्दीत कोरोनाही चिरडला, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रचंड गर्दी असताना तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दादरमध्ये पोलीसही अभावानेच दिसत होते. वाहतूक कोंडी झाली असताना प्लाझा जंक्शनवर एकही ट्रॅफिक पोलीस नव्हता.

दादरचा फुलबाजार तर माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. ग्राहक राकेश यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलतना सांगितले की, गेले चार महिने घरात बसून होतो. सरकारने जारी केेलेल्या नियामांचे आम्ही काटेकोर पालन केले आहे. मात्र आता सरकारने अनलॉकमध्ये जास्त लक्ष देणेे गरजेचे आहे. मात्र आजची दादर बाजारपेठेतील ही गर्दी कोरोनाला आंमत्रण देणारी आहे. त्यामुळे सरकारने या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र ते कुठेही दिसून येत नाही.

- Advertisement -

ना मास्क ना सुरक्षित अंतर
फुले, फळे, सजावट, पूजा सामुग्री खरेदीसाठी दादरमधील दुकानांमध्ये गर्दी उसळली होती. त्यामुळे दुकानात सुरक्षित अंतर कुठेही दिसले नाही. या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलेही दिसून येत होती. यातील काही ग्राहकांनी सांगितले की, आम्हाला गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊनमुळे घरी बसवून ठेवले. त्यामुळे आमची नोकरी गेली. सरकारच्या या नियोजनशून्य कारभारावर आमचा विश्वास नाही. त्यापेक्षा गणपतीवर आमचा विश्वास आहे. सरकारला बाप्पा नक्की सद्बुध्दी देईल आणि मुंबई कोरोनामुक्त होईल, अशी आम्हाला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -