घरमुंबईदुषित पाण्याच्या तक्रारी आल्यास २४ तासात निकाली काढा

दुषित पाण्याच्या तक्रारी आल्यास २४ तासात निकाली काढा

Subscribe

राज्य सरकारचे महापालिका अधिकार्‍यांना आदेश

दुषित पाण्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर दुर्बिण टाका, रात्रपाळीत काम करा, आणखी कामगार घ्या पण, दुषित पाण्याचा प्रश्न २४ तासात निकाली काढा, असे आदेश राज्य सरकारच्या वतीने महापालिका अधिकारी, अभियंत्यांना देण्यात आले.
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये तसेच अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाईपलाईन गटारातून, चिखलातून गेल्या आहेत. त्यामुळे दर पावसाळ्यात पाणी साचून अनेक भागात दुषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे गॅस्ट्रो, काविळ यांसारख्या आजारांचा मुंबईकरांना सामना करावा लागतो.मुंबईत मोठ्या प्रमाणावर छोट्या मोठ्या जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहेत. अनेक भागात पाण्याच्या पाईपलाईन गटारातून, चिखलातून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुषित पाण्याचा पुरवठा होतो. या पार्श्वभूमीवर सरकार याप्रकरणी काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला. त्याला नगरविकास राज्यमंत्री योगेस सागर यांनी उत्तर दिले. गोरेगाव येथील उन्नत नगर, प्रेम नगर, समता नगर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुषित पाण्याच्या तक्रारी आल्याचे पाटील यांनी सांगितले. अशाप्रकारे अर्ध्या मुंबईला गढूळ पाणी प्यावे लागत असून याबाबत सरकार काय खबरदारी घेणार असा सवालही त्यांनी केला. यावर पूर्व, पश्चिम उपनगरे तसेच मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर दुषित पाण्याच्या तक्रारी मार्गी लावण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारचा प्रतिबंधात्मक उपाय
मुंबईत विविध ठिकाणी ६८ ठिकाणच्या जागा निश्चित केल्या असून या ठिकाणांहून दर महिन्याला पाण्याचे ३ हजार नमूने घेतले जात आहेत. दुषित पाण्याची तक्रार आल्यानंतर दुसर्‍या दिवशी पाणीपुरवठा करण्याआधी येथे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईत अनेक भागात टनेल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पाईपलाईनचा प्रश्नच उद्भवणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -