Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुंबईत 28 एप्रिलपासून नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ

मुंबईत 28 एप्रिलपासून नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ

Subscribe

मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना 24 लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक लस देण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना 24 लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक लस देण्यात येणार आहे. या कोरोना-19 प्रतिबंधक लसीकरणाला 28 एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे हे स्वतः लक्ष घालून कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक लसीकरण व अन्य उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चाललेयं अपघातांची स्पर्धा?

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. कोरोना-19 लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येत आहेत. 26 एप्रिल अखेरपर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आली आहे.

- Advertisement -

यामध्‍ये पहिली मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या 1 कोटी 8 लाख 93 हजार 679, दुसरी मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या 98 लाख 15 हजार 20 आणि प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या 14 लाख 88 हजार 296 एवढी आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 28 एप्रिलपासून इन्‍कोव्‍हॅक ही लस 60 वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्‍कोव्‍हॅक लस देता येणार नसल्‍याचे पालिकेने स्‍पष्‍ट केले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील 24 ठिकाणी इन्‍कोव्‍हॅक लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पाट नोंदणीद्वारे देण्यात येईल. 24 विभागातील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते मुंबई महापालिकेच्या ट्वीटर खात्यावर दररोज प्रकाशित करण्यात येतील. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -