मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार; पालकमंत्री दीपक केसरकरांचा विश्वास

दक्षिण मुंबईत 'फूड कोर्ट' च्या माध्यमातून करणार रोजगार

mumbai will make the most beautiful city in india said min deepak kesarkar

मुंबई -: मुंबईला भारतातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

मुंबईत महापालिकेमार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते जी/उत्तर कार्यालय परिसरात करण्यात आले. याप्रसंगी, स्थानिक आमदार सदा सरवणकर, पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते.

मुंबई आर्थिक राजधानीचे शहर असल्याने या शहरात देशभरातून लोकं येतात. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महापालिकक पार पाडत आहे. तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून त्यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाचे सर्व विभाग याकामी सहकार्य करतील, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई महापालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे आणि राबणाऱ्या पालिका कामगारांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतूक केले.

दक्षिण मुंबईत ‘फूड कोर्ट’ च्या माध्यमातून रोजगार

मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत ‘फूड कोर्ट’ निर्माण करण्यात येणार आहेत. मात्र हे करीत असताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

याप्रसंगी, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी, आजारांचे मूळ अस्वच्छतेत असल्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी, असे आवाहन केले. तर, उपायुक्त श्री.बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. उपायुक्त चंदा जाधव यांनी, स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महापालिकेमार्फत उपाययोजना केल्या जातील, असे आश्वसन दिले. यावेळी, ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ‘मितवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे, राज ठाकरेंचा हल्लाबोल