घरमुंबईबेस्टच्या एक हजार बसगाड्यांमध्ये जीपीएस

बेस्टच्या एक हजार बसगाड्यांमध्ये जीपीएस

Subscribe

बसगाडीचे नेमके ठिकाणी समजणार

बेस्ट बसची बराच वेळ वाट पाहून ओला, उबर किंवा काळी पिवळी टॅक्सी, रिक्षाने प्रवास सुरू करण्याची वेळ यापुढे मुंबईकरांवर येणार नाही. आपल्याला अपेक्षित असलेली बेस्टची बस आता यापुढे ट्रॅक करता येणार आहे. बेस्ट उपक्रम राबवत असलेल्या इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्पामुळे हे शक्य होईल. बेस्टने सध्या मुंबईतील दोन आगारातील बसगाड्यांना आयटीएमएस प्रकल्पाची प्रायोगिक अंमलबजावणी केली आहे. तर मुंबईतील एक हजार बस गाड्यांवर (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम) जीपीएस बसविण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

आयटीएमएस प्रकल्पाअंतर्गत प्रवाशांना बस थांब्यावर बस येण्याची अचूक वेळ कळणार आहे. या प्रकल्पात बस आगार, बस स्थानक आणि बस चौकी याठिकाणी संगणकीयकरण करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील बॅकबे डेपो आणि वडाळा डेपोची निवड करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत बॅकबे डेपोअंतर्गत १२४ बसेसचा समावेश आहे, तर वडाळा डेपोअंतर्गत १५९ बसेसचा समावेश आहे. दोन्ही डेपोतील बसेसवर जीपीएसचा वापर करून ट्रॅकिंगचे काम सध्या करण्यात येत आहे. तसेच बस स्थानक, बस आगार आणि बस चौकी अशा तिन्ही ठिकाणी संपूर्ण बस ऑपरेशनअंतर्गत असणार्‍या यंत्रणेचे संगणकीयकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

संपूर्ण मुंबईतील डेपोमध्ये या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संपूर्ण यंत्रणा अंमलात येण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा बेस्टच्या अधिकार्‍यांचा विश्वास आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक विभाग आणि अभियांत्रिकी विभाग या दोन्ही विभागातील कार्यक्षमता वाढेल. तसेच बेस्ट बसेसच्या फेर्‍यांचे सुसूत्रीकरण तसेच नियोजनबद्ध कामकाज करण्यासाठी बेस्टच्या यंत्रणेला याचा फायदा होईल.

सध्या दोन डेपोमध्ये ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर अंमलात आणली आहे. या दोन ठिकाणचा प्रतिसाद पाहूनच उर्वरीत डेपोमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती बेस्टच्या वाहतूक अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक एस.ए. पवार यांनी दिली. आतापर्यंत एक हजार बस गाड्यांवर जीपीएस बसवण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

यामुळे होईल बसचे ट्रॅकिंग

पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीआयएस) द्वारे प्रवाशांना बसचे नेमके ठिकाण कळणार आहे. तसेच लगेचच्या येणार्‍या बस थांब्याची माहिती बसमधील अनाऊंसमेंटच्या माध्यमातून मिळेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि बस ट्रॅकिंगसाठी ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपची सुविधा बेस्टकडून देण्यात येईल. बेस्ट अ‍ॅपचे डिझाईन आणि ऑपरेटींगचे ट्रायल सध्या सुरू आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनच बस ट्रॅक करणे शक्य होणार आहे. ग्राहकांना अ‍ॅपच्या माध्यमातून बेस्ट बस कुठे अडकली आहे, तसेच प्रवासादरम्यान कुठे वाहतूक कोंडी होऊन बस प्रवास लांबू शकतो असे अपडेट्सही या माध्यमातून मिळणार आहेत. अ‍ॅपमध्ये Expected Time of Arrival of bus फीचर प्रवाशांच्या सुविधेसाठी देण्यात आले आहे. आपण उभ्या असलेल्या स्टॉपवर बस किती वेळात येईल ही माहिती देण्यासाठी या फीचरचा फायदा होईल. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) या जीपीएसवर आधारीत यंत्रणेचा उपयोग यासाठी करण्यात आला आहे.

बेस्ट बसचा ताफा

एकूण बसेस ३३३७
मिडी ४३३
सिंगल डेकर २७६०
डबल डेकर १२०
इलेक्ट्रिक ६
हायस्पीड डिझेल १३५४
सीएनजी १९७८
हायब्रिड २५

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -