घरमुंबईभूसुरूंग स्फोटांमुळे रहिवाशांना धोका ! कंपनी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

भूसुरूंग स्फोटांमुळे रहिवाशांना धोका ! कंपनी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

Subscribe

नवी मुंबई – सिडकोकडून सुरू असलेल्या विमानतळाच्या कामासाठी पनवेल भागात केल्या जाणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे ओवळा गावातील काही घरांवर दगड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. यात जिवितहानी झाली नसली तरी रहिवाशांनी सुरूंग स्फोटांची धास्ती घेतली आहे. या सुरुंग स्फोटांमुळे परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अखेर पनवेल शहर पोलिसांनी विमानतळाच्या सपाटीकरणासह अन्य कामे करणाऱ्या टीआयपीएल, जेएमपीआयएल, गायत्री व जीव्हीके या कंपन्यांच्या कंत्राटदारावर निष्काळजीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

ग्रामस्थांनी ब्लास्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेरले
पनवेल परिसरातील १ हजार १६० हेक्टर जागेवर सिडकोच्या वतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष विमानतळाच्या जागेचे सपाटीकरण तसेच भरावाचे काम सुरू आहे. या विमानतळाच्या जागेवर ९८ मीटर उंचीची टेकडी असून या टेकडीचे सपाटीकरण करण्याकरता भूसुरुंग स्फोटाचे (ब्लास्टिंग) काम सध्या सुरू आहे. १६ मे रोजी सायंकाळी याठिकाणी ब्लास्टिंगचे काम सुरू असताना उडालेले दगड वरचा ओवळा गावातील काही घरांवर पडून त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे या ग्रामस्थांनी ब्लास्टिंग सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेरून त्यांचे काम बंद पाडले होते.

- Advertisement -

कंत्राटदाराविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी २० ते २५ ग्रामस्थांवर बेकायदा जमाव जमवून तेथील कामगारांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर, दुसरीकडे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्लास्टिंगचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि भूसुरुंग स्फोट करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांतील कामगार असा संघर्ष निर्माण झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी वरचा ओवळा गावात प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता, ब्लास्टिंगचे दगड पडल्यामुळे वरचा ओवळा गावातील काही घरांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -