भाजपकडून पियूष गोयल आणि सहस्त्रबुद्धे यांना उमेदवारी निश्चित, धनंजय महाडिक तिसरे उमेदवार?

Piyush Goyal and Sahastrabuddhe's candidature for Rajya Sabha from BJP confirmed
भाजपकडून पियूष गोयल आणि सहस्त्रबुद्धे यांना उमेदवारी निश्चित, धनंजय महाडिक तिसरे उमेदवार?

शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर भाजपकडून पुन्हा एकदा पियूष गोयल आणि विनय सहस्त्रबुद्धे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरीष्ठ सूत्रांनी दिली. तर माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपचे तिसरे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – खासदार संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

संभाजीराजे छत्रपती यांनी पक्ष प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर संजय राऊत यांनी दुसऱ्या जागेची फाईल बंद झाल्याचे सांगत संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे बुधवारी जाहीर केले होते. मात्र अद्याप पवार यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे नेमके काय होणार ? याबाबत अजूनही साशंकता आहे. मात्र संजय राऊत यांनी आमचा निर्णय पक्का झाला असून गुरुवारी माझ्यासह संजय पवार हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हे अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आम्ही उमेदवारी अर्ज भरणार असल्याने संजय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्याची आता गरज नाही, असेही राऊत म्हणाले. तसेच संभाजीराजेंचा विषय आमच्याकडून संपला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि विनय सहस्त्रबुद्धे या दोघांना पुन्हा एकदा राज्यातून संधी देणार असल्याचे समजते. गोयल यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट असले तरी सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी मिळेल की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. भाजपकडे दोन जागा निवडून येऊन अतिरिक्त २८ अतिरीक्त मते आहेत. त्यामुळे भाजप तिसऱ्या जागेचीही चाचपणी करीत आहे. त्यासाठी धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची ४२ मते आवश्यक आहेत. पण ४२ चा कोटा पूर्ण झाला नाहीतर दुसऱ्या पसंतीची मतेही महत्वाची ठरणार आहेत. या पसंती मतावरही या निवडणुकीचे भवितव्य ठरू शकते, अशी आशा भाजपला आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्याने शेवटच्या क्षणी भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा – कट्टर शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी, जाणून घेऊया संजय पवार यांचा राजकीय प्रवास

संभाजीराजेंचे काय ?

शिवसेनेने राजसभा निवडणुकीत पाठिंबा नाकारला तरी संभाजीराजे छत्रपती हे मुंबईत तळ ठोकून आहेत. संजय पवार हे शिवसेनेचे डमी उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतला जाईल अशी चर्चा आहे. मात्र, संभाजीराजे मुंबईत थांबले असले तरी शिवसेना आणि त्यांच्यात दोन दिवसात कोणतीही चर्चा झाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास ३१ तारखेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत काय होते यावर संभाजीराजे यांचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांना शिवसेनेने पाठिंबा नाकारला तर भाजप त्यांना पुरस्कृत करेल अशीही एक चर्चा आहे. मात्र, भाजप त्यांना पुरस्कृत करण्याची शक्यता नाही. संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठविले तरी त्यांनी अनेकवेळा भाजपशी फटकून रहाण्याची भूमिका घेतली. भाजपला त्यांच्या खासदाकीचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यास उत्सुक नाही.