पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावरच खड्डा, आयुक्तांसह महापौरांची त्याच रस्त्यावरुन ये-जा

pothole in front of Mumbai Municipal Corporation how mayor and Commissioner ignore pit
पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावरच खड्डा, आयुक्तांसह महापौरांची त्याच रस्त्यावरुन ये-जा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा कारभार हाकणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावरच (महापालिका मार्ग पालिका नवीन इमारत गेट क्रं. ७ समोर) गेल्या काही दिवसापासून एक खड्डा पडला आहे. मात्र पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर, संबंधित अधिकारी यांची या रस्त्यावरून ये – जा असतानाही कोणालाच हा खड्डा कसा दिसत नाही, जर खड्डा दिसला असेल तर अद्याप तो का बुजवला नाही, असे प्रश्न उभे ठाकले आहेत.

पालिका दरवर्षी रस्ते कामांवर किमान २ हजार कोटी रुपये खर्च करते. तसेच दरवर्षी पावसाळ्यात काही रस्त्यांवर लहान – मोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तसेच, खड्डे चुकवताना काही वाहनांना अपघात होऊन त्यात चालक, पादचारी जखमी होतात किंवा जीवित हानीसुद्धा होत असते. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला पुन्हा १०० – १५० कोटींचा खर्च येतो. याच खड्ड्यांवरून पालिका सभेत स्थायी समिती बैठकीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात तिखट चर्चा होते. प्रसंगी शाब्दिक चकमक, आरोप- प्रत्यारोप, भ्रष्टाचाराचे आरोपही होतात.

मात्र रस्त्यांवर हे खड्डे का पडतात, निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याने व त्यात पावसाचे पाणी शिरल्याने खड्डे पडण्यास सुरुवात होते. हे खड्डे अगदी छोटे असताना ते दुरुस्त करणे, बुजविणे आदी उपाययोजना पालिका अधिकाऱ्यांना वेळीच सुचत नाहीत. परिणामी छोट्या खड्ड्याचे रूपांतर मोठ्या खड्ड्यात होते. हे खड्डे बुजवायला पालिकेला अधिक मटेरियल लागते व कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा भुदंडही बसतो. मात्र येथे तर पालिका मुख्यालयासमोरच रस्त्यावर खड्डा पडला असून तो बुजविण्यात आलेला नाही. म्हणजेच दिव्याखाली अंधार आहे, असेच म्हणावे लागणार.


हेही वाचा : राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती