घरमुंबईगायक तरुणीशी लैंगिक अत्याचार करुन सहा लाखांचा अपहार

गायक तरुणीशी लैंगिक अत्याचार करुन सहा लाखांचा अपहार

Subscribe

मालवणीत धक्कादायक घटनेत आरोपी प्रियकराला अटक व कोठडी

लग्नाचे आमिष दाखवून एका 23 वर्षीय गायक तरुणीशी लैंगिक अत्याचार करुन फ्लॅटसाठी दिलेल्या सुमारे सहा लाख रुपयांचा अपहार करुन तिची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच विशाल फुलचंद पांडे या 38 वर्षांच्या प्रियकराला शुक्रवारी मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत तरुणी ही मालाड येथील मालवणीतील जनकल्याण नगरात तिच्या बहिणीसोबत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते.

मूळची उत्तर प्रदेशची रहिवाशी असलेली या तरुणीचे शालेय आणि कॉलेजचे शिक्षण तिथेच झाले असून तिला गायनाची आवड होती. त्यासाठी ती मुंबई शहरात नशीब अजमाविण्यासाठी बहिणीसोबत आली होती. दोन वर्षांपूर्वी ती एका बारमध्ये सिंगर म्हणून कामाला होती. याच बारमध्ये तिची ओळख विशाल पांडे याच्याशी झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते, त्यानंतर ते दोघेही सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान विशालने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिला तो आवडत असल्याने तिनेही त्यास होकार दिला होता. त्यानंतर ते दोघेही भेटत होते.

- Advertisement -

विशाल हा मिरारोड येथील पेनकर पाडा, कक्कड पॅराडाईज इमारतीच्या ए विंगच्या फ्लॅट क्रमांक 1502 मध्ये राहत होता. ऑगस्ट 2017 रोजी ते दोघेही सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट येथील बालाजी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते, तिथे त्याने मद्यप्राशन केले होते, त्यामुळे तिने त्याला तिच्याच होंडासिटी कारमधून त्याच्या मिरारोड येथील राहत्या घरी सोडले होते, दुसर्‍या दिवशी तो तिच्या घरी आला आणि त्याने घडलेल्या प्रकाराची माफी मागून तिच्याशी जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर तिच्या घरासह त्याच्या घरी, मालाड, दहिसर, मिरारोड येथील विविध लॉज, हॉटेलमध्ये त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते.

विवाहाची आमिष दाखवून लुबाडले
प्रत्येक वेळेस तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा फायदा घेत होता. त्यातून ती गरोदर राहिली होती, मात्र त्याने तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. लग्नाचा विषय काढल्यानंतर तो तिला स्वत:चे घर घेतल्यानंतर विवाह करु असे सांगत होता. याच दरम्यान त्यांनी एका इस्टेट एजंटच्या मदतीने मालाड परिसरात एक फ्लॅट पाहिला होता. या फ्लॅटची किंमत 95 लाख रुपये होती, त्यापैकी 50 लाख रुपये कॅशने जमा करुन आणि उर्वरित 45 लाख रुपयांचे लोन करु असे त्याने तिला सांगितले होते, याच दरम्यान त्याने तिचे काही कागदपत्रे घेऊन एका बँकेत अर्ज केला होता. त्यापूर्वी तिने त्याला फ्लॅट बुकींगसाठी सहा लाख रुपये दिले होते. बँकेने तिचे लोन पास केल्याचे कागदपत्रेही त्याने तिला दाखविले होते, मात्र इतक्या लवकरच संपूर्ण प्रक्रिया होत असल्याने तिला संशय आला.

- Advertisement -

त्यामुळे तिने या एजंटकडे विचारणा केली असता विशालने फ्लॅट बुकींगसाठी दिलेले सहा लाख रुपये परत करुन फ्लॅटचा करार रद्द केल्याचे सांगितले. याबाबत तिने त्याच्याकडे विचारणा सुरु केली असता तो तिच्याशी वाद घालून तिला मारहाण करु लागला. त्याला शिवीगाळ करुन धमकी देऊ लागला. विशालकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मालवणी पोलिसांत त्याच्याविरुद्ध 25 मार्चला लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. विशालच्या अटकेच्या वृत्ताला पोलीस निरीक्षक मनोहर हिंदळेकर यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक कांबळे हे करीत आहेत.
.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -