घरमुंबईगणवेशावरील बॅचवरून अट्टल गुन्हेगारास अटक

गणवेशावरील बॅचवरून अट्टल गुन्हेगारास अटक

Subscribe

शाळेतील गणवेशातील मुलांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर ठेवणे चोरी करणार्‍या एका मोलकरणीला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सअ‍ॅप डीपीवरील मोलकरणीचा पत्ता शोधून सांताक्रूझ पोलिसांनी तिला अखेर मुंबईतून अटक केली आहे. नर्मदा सोहेल खान (३४) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव असून तिला मदत करणार्‍या सावित्री ठाकूर हिला देखील अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगर तसेच दक्षिण मुंबईत राहणार्‍या श्रीमंताच्या घरी मोलकरणीचे काम करणार्‍या चार महिलांची एका टोळीने शहरात धुमाकूळ घातला होता. या चौघींच्या मागावर असणार्‍या सांताक्रूझ पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी देवनार येथून वनिता गायकवाडला अटक केली होती. वनिताच्या चौकशीत नर्मदाचे नाव समोर आले. मुलुंड येथे राहणार्‍या नर्मदाचा पोलिसांनी शोध सुरू केला असता आपल्या मागावर पोलीस असल्याचे कळताच तिने मुंबईतून थेट उत्तरप्रदेशात पळ काढला. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात नर्मदाची दोन मुले एका प्रतिष्ठीत शाळेत शिक्षण घेतात.

- Advertisement -

नर्मदाच्या मागावर असलेल्या सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे सपोनी. सुरेश वळवी, पो.ह. संतोष पाटील ,जयेश फाटक, आशिष भांड, विजयकुमार शेंदरकर, राजदीप दळवी, परब आणि शिरसाठ या पथकाकडे नर्मदाच्या मोबाईल क्रमांकाशिवाय तिला शोधण्याचे कुठलेही साधन नव्हते. अखेर पोलिसांनी तिचा मोबाईल क्रमांक व्हॉट्सअ‍ॅपला आहे का हे तपासले असता तिच्या व्हाट्सअ‍ॅपच्या डीपीवर तिच्या दोन्ही मुलांचा शाळेच्या गणवेशातील फोटो होता. मुलाच्या शाळेच्या गणवेशावर असलेल्या शाळेच्या बॅचवर पोलिसांना बुलंद शहरातील शाळेचा पत्ता सापडला.

त्यानंतर बुलंद शहर येथे धाव घेऊन सपोनि. वळवी यांनी शाळेच्या मुख्यध्यापकांची भेट घेऊन त्यांच्या शाळेत शिकणार्‍या नर्मदाच्या मुलांचे छायाचित्र दाखवून त्यांच्या घरचा पत्ता मिळवला. मात्र आपल्या मागावर असलेले पोलीस बुलंद शहरात पोहचल्याची कुणकुण नर्मदाला लागताच तिच्या घरी पोहचलेल्या पोलिसांना तिने चकवा देत थेट मुंबई गाठली. नर्मदाने मुंबईला पळून गेल्याचे कळताच पोलीस पथकाने मुंबईतील आपल्या दुसर्‍या पथकाला तिच्या मागावर पाठवले. अखेर नर्मदाला मुंबईत अटक करण्यात आली. तिच्या पाठोपाठ तिला गुन्ह्यांत मदत करणार्‍या सावित्री ठाकूरला देखील गुरुवारी अटक करण्यात आली.

- Advertisement -

सांताक्रूझ पोलिसांनी वनिता, नर्मदा आणि सावित्री या तिघींना अटक केली असून त्यांची चौथी साथीदार भारती शिंदेला पवई पोलिसांनी अटक केली आहे.

तुरूंगात झाली ओळख

या चौघींची ओळख तुरुंगात झाली होती . तेथून त्या टोळी तयार करून मुंबईत श्रीमंतांच्या घरी घरकाम मिळवून घरातील मौल्यवान दागिने पैसे चोरी करीत होत्या. महत्वाचे म्हणजे या चौघी ज्या ठिकाणी काम करीत असत त्या ठिकाणच्या त्यांच्या मालकांनी त्यांची व्यक्तिगत माहिती न मिळवता त्यांना नोकरीवर ठेवत होते. त्याचा गैरफायदा उचलत या चौघी चोर्‍या करून पळ काढत होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चौघींवर मुंबईत ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -