घरमुंबईडोळ्यातील अश्रूंना वाट करून देत त्यांनी घरे खाली केली

डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत त्यांनी घरे खाली केली

Subscribe

चाळमाफिया मोकाट... शेकडो कुटूंबावर वनविभागाचा बुलडोझर ! टिटवाळ्यात वनजमिनीवरील ३७४ बांधकामे जमीनदोस्त

टिटवाळा परिसरातील बल्याणी नजीकच्या उंभार्ली येथे वनविभागाच्या जमिनीवरील घरांवर शुक्रवारी वनविभागाने बुलडोझर फिरवत ३७४ बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामुळे शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. इथल्या रहिवाशांना घर खाली करण्यासाठी एक तासाची मुदत देण्यात आली होती. अखेर दु:खी अंत:करणाने डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत त्यांनी पोराबाळांच्या मदतीने आपले समान काढून घेत घरे रिकामी केली. स्वस्तातील घराचे आमिष दाखवून वनजमिनींवर अनधिकृत चाळी थाटून ती विकणारे चाळमाफिया मात्र मोकाटच राहिल्याची खंत या कुटुंबांनी व्यक्त केली.

टिटवाळा परिसरातील ग्रामीण भागात वनविभागाच्या जमिनींवर शेकडो चाळी थाटल्या आहेत. राजकारणी व चाळमाफियांनी संगनमत करून सुमारे चारशेच्या आसपास घरे बांधली आहेत. चाळ माफियांनी ही घरे स्वस्तात विकून गडगंज पैसा कमवला आणि ते निघून गेले. ही शेकडो अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून वनविभागाने कारवाईला सुरुवात केली. मुरबाडचे सहायक वन संरक्षक हिरवे, भामरे, कल्याणच्या वन परिक्षेत्र कल्पना वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी सुमारे ३ हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. मुंबई, ठाणे, पालघर रिजनचे वनविभागाचे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिसांच्या फौजफाट्यासह ही मोठी कारवाई करण्यात आली. डोळ्यादेखत जेसीबीच्या मदतीने घरे जमीनदोस्त होताना पाहताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत. कोणीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

- Advertisement -

स्वस्त घराच्या आमिषाने ते झाले बेघर 
आंबिवली-टिटवाळा परिसरात खाजगी मालकीच्या मोकळ्या जागांसह वन विभागाच्या तसेच महापालिकेच्या आरक्षित जमिनीवर अतिक्रमण करीत चाळ माफियांनी शेकडो चाळींचे बांधकामे केले. अधिकृत इमारतीमधील महागड्या घरांच्या तुलनेत चाळीमध्ये स्वस्त घरे देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या मालकीच्या घराचे स्वप्न पाहणार्‍या गरीब लोकांना ही घरे विकण्यात आली. घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कर लावून देत कारवाई न होण्याची त्यांना खात्री दिली गेली. अशा प्रकारे चाळमाफियांनी स्थानिक राजकारणी आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने ही घरे गरिबांना विकली आणि गडगंज पैसा कमावला. स्वस्तात घरे मिळत असल्याने मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही ही घरे खरेदी केली. एकाची दोन कुटुंबे झाली. अनेक कुटुंबानी येथेच आश्रय घेतला. कल्याण -डोंबिवली आणि आजूबाजूच्या शहरात घर घेणे परवडत नसल्याने दोन ते तीन लाखाला मिळणार्‍या चाळीतील घरांकडे अनेकांची झुंबड उडाली. याच स्वस्त घराच्या आमिषामुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -