घरपालघरराजकीय पक्षांपेक्षा सामाजिक संघटना वरचढ; पालघर ग्रामीणमधील बदलते सत्ताकारण

राजकीय पक्षांपेक्षा सामाजिक संघटना वरचढ; पालघर ग्रामीणमधील बदलते सत्ताकारण

Subscribe

पालघर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलासरी, विक्रमगड व मोखाडा या तीनही नगरपंचयतींसाठीची दुसरी निवडणूक २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडली असून एक महिन्याच्या प्रतिक्षेननंतर १९ जानेवारी २०२२ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे

पालघर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलासरी, विक्रमगड व मोखाडा या तीनही नगरपंचयतींसाठीची दुसरी निवडणूक २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडली असून एक महिन्याच्या प्रतिक्षेननंतर १९ जानेवारी २०२२ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाची निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरली असून निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. राजकीय पक्षांच्या तुलनेत जिजाऊ संघटनेने सर्वाधिक उमेदवार निवडून आणल्यामुळे सध्या जिजाऊ संघटना चर्चेचा विषय ठरली आहे. मागील निवडणुकीत तीन नगरपंचायतमधील ५१ जागांपैकी सर्वाधिक १४ जागा या शिवसेनेने मिळवल्या होत्या. तर त्या पाठोपाठ माकप ११, जिजाऊ ७, भाजप व श्रमजीवी संघटना प्रत्येकी ६, राष्ट्रवादी ५ तर कांग्रेस व अपक्ष प्रत्येकी १ असे बलाबल होते. यंदाच्या निवडणुकीत ५१ जागांपैकी २० जागा पटकावत जिजाऊ संघटनेने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्यापाठोपाठ शिवसेना १२, भाजप ८, माकप ६, राष्ट्रवादी ४ तर काँग्रेस १, असे बलाबल आहे. एकूणच सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत जिजाऊ संघटना सरस ठरली आहे. मागील निवडणुकीत फक्त विक्रमगड नगरपंचायत पर्यंत सीमित असलेल्या जिजाऊ संस्थेने विक्रमगड बाहेरील तालुक्यांमध्येही आपले पाय रोवयला सुरुवात केली आहे.

तलासरी नगरपंचायतीमध्ये माकपची एकहाती सत्ता असताना नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेना व जिजाऊ संघटनेमुळे माकपला मोठा फटका बसला आहे. ११ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवणार्‍या माकपला यंदा ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपने ४ वरून ६ जागांवर मुसंडी मारली आहे. यासाठी भाजपला जिजाऊ व शिवसेनेमुळे फायदा झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यापाठोपाठ शिवसेना ३ व जिजाऊ संघटनेचे २ असे उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन पक्ष सत्तेपासून वंचित राहिले आहेत. माकप व शिवसेना यांची युती होऊन सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यावेळेस नेमकी कोणाची सत्ता स्थापन होते. याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

- Advertisement -

विक्रमगड हे राष्ट्रवादीचे होमग्राऊंड असताना देखील विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिजाऊ संघटना व मित्रपक्ष यांनी मीळून शिवसेनेची १ जागा वगळता इतर पक्षांना विजयाच्या जवळपासही भटकू दिलेले नाही. जिजाऊ संघटनेच्या नगराध्यक्षा यांनी जिजाऊ सोडून भाजपचा हात धरला होता. परंतु त्यातही त्यांना मोठी हार पत्करावी लागली आहे. १७ जागांपैकी ३ जागांवर बिनविरोध निवडून येत इतर १३ जागांवर जिजाऊने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. तर शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मोखाडा नगरपंचायतींवर तब्बल १३ जागा पटकावत एकहाती सत्ता स्थापन करणार्‍या शिवसेनेलाही यंदाच्या निवडणुकीत ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी ४, भाजप व जिजाऊ प्रत्येकी २, काँग्रेस १ असे बलाबल यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. एकहाती सत्ता स्थापन करणार्‍या शिवसेनेला यंदा महाविकास आघाडी करावी लागणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात सत्ताकारण बदलत असल्याचे चित्र आहे. राज्यात व देशात कोणाची सत्ता आहे. यापेक्षा आपापल्या भागातील नागरिकांसाठी काम करणार्‍या पक्ष, संघटना व उमेदवारांकडे मतदारांचा कौल वळताना दिसत आहे. तलासरीमध्ये वर्षानुवर्षे आपली सत्ता टिकवून ठेवलेल्या माकपसोबत भाजपने बरोबरी केली आहे. तर विक्रमगडमध्ये मोठमोठाले राजकीय पक्ष मैदानात असताना जिजाऊ संघटनेने एकहाती सत्ता मिळवत राजकीय पक्षांना पछाडले आहे. त्यापाठोपाठ मोखाडामध्ये सत्ताधारी शिवसेनेला १३ जागांपैकी फक्त ८ जागांवर समाधान मानावे लागल्यामुळे यंदा युती करूनच सत्ता स्थापन करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

(कुणाल लाडे – हे डहाणूचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -