देशातील पहिला 'कोस्टल रोड' मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे ३.२५ वाजता कोस्टल रोड आणि वांद्रे - वरळी सी लिंक यांना एका बाजूने महाकाय गर्डरने जोडण्याचे काम अवघ्या १ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पार पाडण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीची मुंबई महापालिकेच्या इतिहासात नोंद झाली आहे.
देशातील पहिला ‘कोस्टल रोड’ मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शुक्रवारी पहाटे ३.२५ वाजता कोस्टल रोड आणि वांद्रे – वरळी सी लिंक यांना एका बाजूने महाकाय गर्डरने जोडण्याचे काम अवघ्या १ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पार पाडण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीची मुंबई महापालिकेच्या इतिहासात नोंद झाली आहे.
वांद्रे – वरळी सी लिंक आणि कोस्टल रोड यांना महाकाय गर्डरने जोडण्याचा कामाला शुक्रवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून सुरू झाली. तसेच, अवघ्या १ तास २५ मिनिटात म्हणजे पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी महाकाय गर्डरद्वारे दोन सागरी मार्ग एकमेकांना यशस्वीपणे जोडण्याची कामगिरी पार पडली.
प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून मध्यरात्री २ वाजल्यापासून गर्डर बसवण्याच्या कामाला सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने गर्डर कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक यांच्या मधोमध आणण्यात आला.
सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत यंत्रणेचा सुयोग्य वापर करून गर्डर जोडण्याचे काम हाती घेण्यात आले.
कोस्टल रोडच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सी लिंकच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत.
या दोन्ही टोकांना सांधणारा पहिला गर्डर २४ एप्रिल रोजी दुपारी १२.३० मिनिटांनी माझगाव डॉक, न्हावा येथून मार्गस्थ झाला होता. त्यानंतर अजस्त्र अशा बार्जद्वारे अवघड सागरी प्रवास करून हा गर्डर २५ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता वांद्रे – वरळी सी लिंक आणि कोस्टल रोड यांना ज्या ठिकाणी जोडण्यात येणार होते त्या ठिकाणी तो गर्डर आणण्यात आला.
मे महिन्यात अशाच प्रकारचा दुसरा महाकाय गर्डर मुंबईत आणून तोसुद्धा कोस्टल रोड आणि वांद्रे – वरळी सी लिंक यांना जोडण्यात येणार आहे. त्यानंतर कोस्टल रोड – वांद्रे – वरळी सी लिंक मार्गे वाहनांचा समुद्र मार्गावरील प्रवास सुलभ आणि जलद होणार असून त्यामुळे मुंबईकरांच्या इंधनाची, वेळेची मोठी बचत होणार आहे.
कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या गर्डरवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या गर्डरला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे गर्डरचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.
Edited By – Vaibhav Patil