खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत, नामांतरावरून भाजपाचा टोला

bjp atul bhatkhalkar tweet on maharashtra political crisisi shivsena devendra fadanvis

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास जात आहे. त्याआधी आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून भाजपाने, अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झाल्याचा टोला लगावला आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर तर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याशिवाय, नवी मुंबई विमानतळालाही दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठरले. विशेष म्हणजे, औरंगाबादच्या नामांतराची मागणी शिवसेना फार आधीपासून करीत होती आणि त्याला काँग्रेसचा विरोध होता. आता जवळपास 50 आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचे निर्णय घेण्यात आले.

भाजपाने देखील नामांतराची मागणी लावून धरली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अडीच वर्षांनी निर्णय घेतल्यावरून भाजपाने टोला लगावला आहे. सत्ता सुंदरी सोडून जातेय, हे लक्षात येताच गेली अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेले दिसतेय…, असे ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटला? रस्ते गुळगुळीत झाले? अखंड वीज मिळू लागली? असे सवालही त्यांनी केले आहेत.