घरराजकारणचोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान..., शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान…, शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या वैधतेला दिलेले आव्हान तसेच आमदारांच्या अपात्रतेसंबंधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेतील ठाकरे गटाने शिंदे गटांवरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संभाजीनगर येथे म्हटले होते.

- Advertisement -

यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपावर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी असे म्हणण्याचा अर्थ दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही, अशी खोचक टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका, हे मुख्यमंत्र्यांचे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण गाव का बच्चा बच्चा जानता है की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरुनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे. शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाड्या ईडीनेच आवळल्यानंतर त्यांनी सध्याचा उठाव आणि ‘क्रांती’ केली हेच सत्य आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणजे आमदाराचा सेनापती ईडीविरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला, असा प्रहारही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा
महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. त्याच मराठी अस्मितेवर व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर अपमानाच्या गुळण्या टाकण्याचे काम राज्यपाल महोदयांनी केले, पण शिंदे यांनी त्यावर गप्प बसणे पसंत केले. महाराष्ट्राचा अपमान सहन करा व शांत बसा हा तर बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना शिंदे यांनी त्या विचारांशी प्रतारणा केली, असे शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांना सुनावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा
शिंदे संभाजीनगरात म्हणाले, राज्यात आम्ही नवीन सरकार बनवले आहे. शिंदे हे कोणत्या सरकारच्या बाबतीत बोलत आहेत? राज्यात शिंदे फडणवीसांनी फक्त शपथ घेतली. त्याला एक महिना उलटूनही अद्याप सरकारचा पाळणा हललेला नाही. शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार, असे कोणाला वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ना घर का ना घाट का अशीच या लोकांची अवस्था झाली आहे. शिंदे गटाचा काळ किती कठीण आला आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला म्हणणे बकवास
सिल्लोडचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास ठेवणारे बाराच्याच भावात जातात. सत्तार यांनी बाराच्या भावात घालण्यासाठी या वेळी मुख्यमंत्र्यांचीच निवड केली हे कौतुकास्पद आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला हे विधान तर्कसंगत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळाले असते तर राष्ट्रवादीचे गुणगान करताना हे महाशय दिसले असते. शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्रीपद हडपायचे होते, भाजप युतीने त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग दाखवला तेव्हा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला वगैरे सगळी बकवास आहे, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -