घरमुंबई‘हाता’ला टेन्शन एमआयएमच्या ‘पतंग’चे

‘हाता’ला टेन्शन एमआयएमच्या ‘पतंग’चे

Subscribe

युतीमध्ये कोणाच्या वाट्याला येणार ही जागा

मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईसह राज्याचे लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे भायखळा मतदारसंघ. एमआयएम पक्षाने मुंबईतील एकमेव याच मतदारसंघावर आपला झेंडा रोवत सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा या मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागले असून या मतदारसंघावर यंदा कोणाचा झेंडा फडकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता या मतदारसंघात काँग्रेसला मिळालेले मताधिक्य लक्षात घेता या मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघासाठी शिवसेनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्यांची पत्नी यामिनी जाधव यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असले तरी या मतदारसंघ कोणाचा वाटेला येतो, यावरुन याठिकाणाच्या लढतीचे भवितव्य ठरणार असल्याचे बोलले जाते.

भायखळा हा मतदारसंघ मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. आधी माझगावचा भाग असलेला हा मतदारसंघ मुस्लीम बहुल मतदारांमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. काँग्रेसने आत्तापर्यंत या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र, २०१४मध्ये एमआयएमचे वारीस पठाण यांनी काँग्रसेचे हे प्रस्थ मोडून काढत या मतदारसंघातून विजय मिळवला. कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचा डोंगरी परिसर देखील याच मतदारसंघात येतो.

- Advertisement -

भायखळा मतदारसंघात येणार्‍या भागाचा विकास अजूनही दृष्टीपथात नसताना देखील या मतदारसंघातून जे कुणी आमदार निवडून जातात, त्यांना यावर तोडगा काढता आलेला नाही. या मतदारसंघात एकूण २४७ मतदान केंद्र आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी जाएंट किलर ठरलेल्या एमआयएम याठिकाणी पुन्हा निवडून येते का, हा सध्या या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या मतदारसंघातही अनेक एसआरएचे प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्याशिवाय याठिकाणी इतर चाळींच्या पुर्नविकासाचा प्रश्न ही गाजणार आहेत.

या मतदारसंघात सध्या शिवसेनेकडून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांचे जोरदार प्रयत्न सुरु केलेेले आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांचे देखील नाव चर्चेत असल्याने याठिकाणी युतीचे उमेदवार कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपाचे मधू चव्हाण हे देखील येथील इच्छुकांच्या गर्दीत असल्याने या मतदारसंघावर कोणाचा दावा कायम राहतो, याकडे येथील स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदार क्षेत्रात २०१४ साली बीजेपीचे मधू चव्हाण हे दुसर्‍या स्थानावर होते.

- Advertisement -

मधू चव्हाण यांना २०१४ साली २३ हजार मते मिळाली होती. तर विजय संपादन केलेल्या वारिस पठाण यांना २५ हजार मते मिळाली होती. त्यामुळे मताधिक्य लक्षात घेतले तर म्हणावे तेवढे जास्त नसल्याने या मतदारसंघात सध्या इतर पक्षातील नेते एकवटल्याची माहिती देखील पुढे आली आहे. दरम्यान, सध्या याठिकाणी हिंदु आणि मुस्लिम असे दोन गट झाल्याचे मतदारसंघात पहायला मिळते, जो विधानसभा निवडणुकीत देखील गाजणारा विषय ठरणार आहे. हे मात्र नक्की.

लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता लोकसभेत भायखळा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना फक्त ४७ हजार ६२७ मते मिळाली होती. तर दुसरीकडे काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना ७५ हजार ३०२ मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघासाठी येथून काँग्रेसकडून दावा करण्यात येणार असून यात प्रामुख्याने मधुकर चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, या मतदारसंघात देखील मनसे फॅक्टर मोठ्या प्रमाणात असल्याने लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. पण येणार्‍या विधानसभा निवडणुकीत ही मते कोणाच्या पारड्यात पडणार आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मनसेने देखील येथून निवडणूक लढविली होती. यावेळी मनसेचे संजय नाईक यांना १९ हजार मते मिळाली होती. त्यामुळे यंदा याठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळेल हे मात्र नक्की.

मतदारांची संख्या
पुरुष – १,२३,६१६
महिला – १,०३,५२०
एकूण मतदार – २,२७,१४३

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अ‍ॅड. वारिस पठाण, एमआयएम – २५,३१४
२) मधु चव्हाण, भाजप – २३,९५७
३) मधुकर चव्हाण, काँग्रेस – २२,०२१
४) गीता गवळी, अभासे – २०,८९५
५) संजय नाईक, मनसे – १९,७६२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -