घरमहाराष्ट्र'...भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय'; बारामतीत बॅनरबाजी

‘…भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय’; बारामतीत बॅनरबाजी

Subscribe

‘सुबह का भुला शाम को घर आ जाये तो उसे भुला नहीं कहते’, अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. याच म्हणीनुसार बारामतीकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे पुन्हा एकदा पक्षात स्वागत केले आहे. विशेष म्हणजे अजित पवारांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे, अशी बारामतीकरांची इच्छा आहे. कारण, तशा आशयाची बॅनरबाजी सध्या बारामतीमध्ये बघायला मिळत आहे. चार दिवसांपूर्वी देखील अशीच बॅनरबाजी बारामतीकरांनी केली होती. मात्र, त्यावेळी ‘आम्ही शरद पवार साहेबांसोबतच’ असे बॅनरवर लिहले होते. कारण त्यावेळी परिस्थिती देखील तशीच होती. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत होती. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे बारामतीकरांनी त्यांना माफ केल्याचे चित्र दिसत आहे.

काय आहे बॅनरमध्ये?

‘दादा आपण राज्यात प्रथम क्रमांकाने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे, महाराष्ट्राला आपली गरज आहे, आपण थांबू शकत नाही. आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय’, असे बारामतीकरांनी बॅनरमध्ये लिहले आहे.

- Advertisement -
 support for ajit pawar poster in baramati
बारामतीकरांची बॅनरबाजी

…आणि अजित पवारांनी राजीनामा दिला

गेल्या महिन्याभरापासून राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी घडत होत्या. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आधारे सरकार स्थापन करण्याचे ठरवले. मात्र, त्यासाठी काँग्रेसची मनधरणी करण्यात आणि सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच बैठका सुरु होत्या. बैठकांमध्ये वाढत जाणाऱ्या अपेक्षा पाहून अजित पवार विचलीत झाले आणि त्यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपने अजित पवार यांच्या साहाय्याने सरकार स्थापन केले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने नव्याने स्थापन झालेल्या सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली. अखेर कोर्टाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले. अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचे सरकार पुरते कोसळले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पुन्हा सज्ज झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -