हे अभिनेते होणार ‘नेते’!

mumbai

मोदी लाट कायम असल्याचे या लोकसभा निवडणुकीने पुरेसे स्पष्ट केले आहे. याच लाटेवर स्वार होऊन बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री, अभिनेते हे लोकप्रतिनिधी होणार आहेत. उत्तर प्रदेशात मथुरेतून अभिनेत्री हेमा मालिनी सलग दुसर्‍यांदा विजयाच्या मार्गावर आहेत. या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी धमेंद्र यांनीही हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हेमाला विजयी करा, म्हणजे मी विजयी होईन, अशी भावनिक साद मथुरावासीयांना घातली होती. राष्ट्रीय लोकदलाचे कुंवर नरेंद्र सिंग यांना मागे सारून हेमा मालिनी यांनी विजय मिळवला आहे.

दुसरीकडे अभिनेते धमेंद्र यांचे ज्येष्ठ पूत्र सन्नी देओल यांचा विजयाचा ‘ढाई किलो का हाथ’ भाजपच्या बाजूने पडल्याने काँग्रेसचे सुनील कुमार जाखर यांचा पराभव झाला आहे. अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रतिष्ठेच्या या जागेवर सन्नी देओल यांची निवड भाजपने केली होती. तर केंद्रिय नेतृत्व असलेल्या मोदींवर टीका करून काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पाटण्यातून पराभव पत्करावा लागण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या रविशंकर प्रसाद यांनी त्यांना जवळपास ‘खामोश’ केले आहे.

मुंबईतून उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकरांना भाजपच्या गोपाळ शेट्टींनी पराभवाच्या छायेत आणले आहे. अनपेक्षित किंवा धक्कादायक निकालांच्या या रणधुमाळीत अमोल कोल्हे यांचा शिवबंधन सोडून हातावर घड्याळ बांधण्याचा निर्णय योग्य ठरला आहे. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. माजी क्रिकेटपटू भाजपचे उमेदवार गौतम गंभीरने पूर्व दिल्लीतून अरविंद सिंग लव्हली यांना पराभवाच्या छायेत आणले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here