घरमनोरंजनविख्यात गायक किशोरकुमारच्या बंगल्याचा सौदा वादात

विख्यात गायक किशोरकुमारच्या बंगल्याचा सौदा वादात

Subscribe

भोपाळ –
सिनेक्षेत्रातील अवलिया कलाकार आणि विख्यात गायक किशोरकुमार यांच्या खांडवा येथील वडिलोपार्जित बंगल्याचा सौदा वादात सापडला आहे. मध्य प्रदेशाच्या खांडवा येथील बॉम्बे बाजारात असलेला वडिलोपार्जित बंगला ‘गांगुली हाऊस’ची विक्री झाल्याचा दावा अभय जैन यांनी केलाय. अभय जैन हे खांडव्यातील शेतकरी आणि संबंधित परिसरातील रहिवासी आहेत. मात्र, किशोरकुमार यांचे बंधू अनुपकुमार यांच्या मुलाने बंगल्याचा कुठलाही सौदा झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ‘गांगुली हाऊस’चा सौदा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

बंगल्याचा सौदा साडेचार कोटी रुपयांमध्ये झाला असून या वर्षा अखेरीस त्याच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. ७ हजार २०० चौरस फुटांच्या या बंगल्याचा सौदा २० हजार रूपये प्रति चौरस फूट या दराने झाला आहे. हा सौदा दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत किशोरकुमार यांचा मुलगा सुमीतकुमार, त्यांचे वकील व पीए यांच्या उपस्थितीत झाला आहे.
– अभय जैन, बिल्डर

“बंगल्याच्या आजूबाजूला १५ हून अधिक दुकाने असून यापैकी तीन दुकानांची रजिस्ट्री आहे. तर, इतर दुकानांच्या ताब्यावरून वाद सुरू आहे. आपसात तडजोड करून हा वाद मिटवण्यात येईल. याला साधारणत: एक वर्ष लागेल. त्यानंतरच रजिस्ट्री होईल,” अशी माहिती अभय जैन यांनी दिली.

- Advertisement -

‘गांगुली हाऊस’ बाबत गांगुली कुटुंबियांत वाद
खांडवा येथील वडिलोपार्जित बंगला व दुकानावरून गांगुली कुटुंबीयांत वाद होते. त्यांच्या कुटुंबातील सर्वांना एकत्र बसवून हा वाद सोडवण्यात येईल. बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाला असून या बंगल्याच्या जागी भव्य कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे. कॉम्प्लेक्समध्ये किशोरकुमार यांच्या स्मृती जतन केल्या जातील, असेही जैन यांनी सांगितले.

कोण आहे अभय जैन?
मूळचे खांडवा जिल्ह्यातील हरसूद येथील रहिवासी अभय जैन शेतकरी आहेत. त्यांची हरसूद बुडीत क्षेत्र, सिंगोट व बलवाडा येथे खूप जमीन होती. जैन यांनी खांडव्यापासून २५ किमी अंतरावरील खापरखेडा येथे पडीक जमीन विकत घेतली. तेथे चंदनाची झाडे लावली. काही काळातच चंदनाची झाडे मोठी झाली. यामुळे गावकऱ्यांनी गावाचे नाव चंदनपूर ठेवले. जैन यांनी २०१४ मध्ये चंदनाची ३६०० झाडे २०१४ मध्ये १२ कोटी रुपयात विकली. नंतर खांडव्यात येऊन ते बिल्डर झाले. याआधीही जैन यांची हरसूद येथे ५० एकर जमीन व बलवाडा गावात १०० एकर जमीन होती.

- Advertisement -

बंगला विकलेला नाही – अर्जुनकुमार
मुंबईत राहणारे किशोरकुमार यांचे बंधू अनुपकुमार यांचा मुलगा अर्जुनकुमार यांनी ‘बंगला विकलेला नाही’, असे ठामपणे सांगितले आहे. कोणीतरी ही अफवा पसरवली असून, अशी अफवा खांडव्यात कोण पसरवतंय? याची कल्पना नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

किशोरकुमार आणि त्यांचे जन्मठिकाण

‘गांगुली हाऊस’चा इतिहास
मध्य प्रदेशच्या गौरीकुंज खांडवा नगर परिसरातील ‘गांगुली हाऊस’ हे १०० वर्ष जुने निवासस्थान आहे. ४ ऑगस्ट १९२९ साली आभासकुमार ऊर्फ किशोरकुमार यांचा जन्म या वडिलोपार्जित बंगल्यात झाला होता. आई गौरी देवी आणि वडिल कुंजीलाल गांगुली यांच्यासोबत किशोरकुमार यांचे मोठे बंधू अशोककुमार अणि अनुपकुमार या बंगल्यात राहत होते. मरणापूर्वी एकदा तरी या बंगल्यात यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. १९८७ मध्ये किशोरकुमार यांचे निधन झाले. त्यानंतर खांडवामध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -