घरमनोरंजननदीत उडी मारून आत्महत्या करणारा सीन अविस्मरणीय

नदीत उडी मारून आत्महत्या करणारा सीन अविस्मरणीय

Subscribe

अभिनय, दिग्दर्शन, लेखन या विविध क्षेत्रांतून कला जगतात आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या मिलिंद फाटक यांचा ‘निद्राय’ हा मराठी सिनेमा २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निद्राय चित्रपटासंबंधी अभिनेता मिलिंद फाटक यांनी ‘आपलं महानगरं’ च्या प्रतिनिधीने साधलेला हा संवाद

अभिनय, दिग्दर्शन, लेखन या विविध क्षेत्रांतून कला जगतात आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या मिलिंद फाटक यांचा ‘निद्राय’ हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका आजारावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता मिलिंद फाटक प्रमुख भूमिका साकारत असून प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने अनेक चित्रपट महोत्सवांमधून समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. गोवा चित्रपट महोत्सव, रेगीना चित्रपट महोत्सव, दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव अशा अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये निद्राय या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. या सिनेमातील भुमिकेसाठी दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये अभिनेते मिलिंद फाटक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. याच निद्राय चित्रपटासंबंधी अभिनेता मिलिंद फाटक यांनी ‘आपलं महानगरं’ च्या प्रतिनिधीने साधलेला हा संवाद

 ‘निद्राय’ या चित्रपटाची कथा काय आहे ?

निद्राय हा एक आजाराविषयी चित्रपट आहे. फेटल फॅमिलीअल इनसोमिनीआ (fatal familial insomnia) म्हणजेच निद्रानाश त्या आजाराविषयी जागृकता प्रेक्षकांमध्ये निर्माण करणं हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे. हा क्वचितच होणारा आजार आहे. याचे जगभरात २८० रूग्ण आतापर्यंत आढळले आहेत. भारतात केवळ आतापर्यंत एकच रूग्ण आढळला आहे. या आजारात माणसाने नेमकी काय काळजी घ्यावी, आजारादरम्यान त्या माणसात होणारे बदल, त्याचा कुटुंबावर झालेला परिणाम निद्राय चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ८८ सालचा काळ या चित्रपटात आहे.

- Advertisement -

निद्रायमधील तुमच्या भूमिकेबद्दल सांगा ?

निद्रानाश झालेल्या माणसाची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. या आजाराशी संबंधीत काही हॉलिवूडचे चित्रपट पाहिले, अनेक पुस्तकं वाचली, मानसोपचार तज्ञ्जांशी बोललो कारण या आजाराचा परिणाम तुमच्यावर मानसिकदृष्याही होत असतो. तुम्हाला झोप येत नसल्यामुळे तुमचा मेंदू हा सतत काम करत राहतो. त्यामुळे या भूमिकेचा चहूबाजूने अभ्यास करणे गरजेचे होते. या आजाराचे इटलीमध्ये पहिल्यांदा निदान झाले. त्यामुळे त्या पुस्तकाचा अभ्यास केला. या आजारात तुम्ही पूर्णपणे खंगून जाता. त्यासाठी मी डाएटवर लक्ष केंद्रीत केलं. आहारही कमी केला होता. या भूमिकेसाठी १२-१५ किलो वजन कमी केलं.

 चित्रपटात मुलगी आणि वडिलांचं नातं आधोरेखित झालं आहे ? त्याबाबत सांगाल

नेहमीप्रमाणे या चित्रपटातही वडील आणि मुलीचं नातं जस प्रेमळ असतं तसंच आहे. निद्रानाशाचा आजार त्याच्या अजोबांना आणि वडिलांनाही झालेला असतो. त्यामुळे त्याला सतत भीती असते. आपल्या नंतर हा आजार आपल्या मुलीला होणार. ते तीला हे सांगायला नेहमी घाबरत असतात. म्हणून ते सतत मुलीपासून हे लपवत असतात. कॉलेजमध्ये जाणार्‍या या मुलीचा प्रियकरही या सिनेमात आहे. या आजारामुळे वडील आणि मुलीच्या नात्यावर होणारा परिणाम या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची एखादी आठवण सांगा

कर्जतला नदीच्या काठी एका बंगल्यात या चित्रपटाच चित्रीकरण झालं आहे. मला, दररोज बंगल्याच्या गच्चीवरून नदीतील असंख्य साप दिसायचे आणि एकेदिवशी मला दिग्दर्शकाने सांगितलं तू नदीत उडी मारून आत्महत्या करतो, असा प्रसंग शूट करायचा आहे. आपल्या बंगल्याच्या मागच्या नदीतच हा सीन शूट करूया. अक्षरश: माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. पण माझ्यासोबत कॅमेरामनही पाण्यात उतरणार असल्यामुळे मला तो प्रसंग शूट करावाच लागला. हा सीन संध्याकाळी शूट करण्यात आला आहे. यावेळी कॅमेरामनने पाण्याच्या आतून कॅमेरा लावल्याने तो सीन चांगल्या पध्दतीने शूट करणे मला भागच होते. हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही.

 ही भूमिका तुमच्या करिअरसाठी किती महत्वाची ठरली आहे?

ही माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. अशा पध्दतीची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. मला यापुढे देखील अशा पद्धतीच्या आव्हानात्मक भूमिका साकारायला नक्कीच आवडेल. मी वास्तवात जसा नाही, तशा भूमिका मला करायला आवडतात. मला एकदा दिलीप प्रभावळकर यांच्या हसवा फसवी नाटकातील भूमिका साकारण्याची इच्छा आहे.

 आगामी प्रोजेक्ट कोणते ?

मी अ‍ॅमेझॉन प्राईमसाठी एक वेबसिरीज करत आहे. ज्यात, इरफान खान, गिरीश कुलकर्णी आदी तगडी स्टारकास्ट आहे. हिंदी वाहिनीवर लवकरच माझी एक मालिकादेखील सुरू होत असून ‘कागर’ आणि ‘व्हिडीओ पार्लर’ हे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -