घरमनोरंजनरंग कलेचे

रंग कलेचे

Subscribe

बर्‍याचशा शाळांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याला कारण म्हणजे माजी विद्यार्थी एकत्र येऊन संघटितपणे काम करायला लागलेले आहेत. गाठीभेटी, जुन्या स्मृतींना उजाळा देणे, हयातीत असलेल्या शिक्षकांचा गौरव आणि दिवंगत झालेल्या शिक्षकांचे स्मरण असे काहीसे कामाचे स्वरुप राहिलेले आहे. त्यातूनही शाळेचा विकास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. शिक्षणासाठी जी तांत्रिक सुविधा अपेक्षित आहे ती या विद्यार्थ्यांकडून पूर्ण केली जात आहे. परळमध्ये शैक्षणिक कार्य करणार्‍या शाळांचा मागोवा घेतला तर अनेक शाळांनी दोन पिढ्या शिक्षण घेऊ शकतील इतका प्रदीर्घ प्रवास केलेला आहे. त्यातूनही सर्वांत जास्त गाजावाजा कोणत्या शाळेचा झाला असेल तर तो गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर एम भट हायस्कूलचा सांगता येईल.

या शाळेने शंभरी गाठलेली आहे. त्यामुळे ‘परळचे वैभव’ म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. शताब्दीचे निमित्त घेऊन माजी विद्यार्थी शाळकरी गणवेशात शाळेत दाखल झाले होते. तो संस्मरणीय कार्यक्रम कितीतरी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला. कविता कोळी ही या शाळेची माजी विद्यार्थिनी. शाळेतल्या विद्यार्थ्यांना तसेच कामगार भागातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण देण्याचे काम ती गेली अनेक वर्षे इथे करत आहे. विद्यार्थिनी या नात्याने शाळेच्या मदतीसाठी ‘रंग कलेचे’ या कार्यक्रमाची तिने निर्मिती केलेली आहे. या कार्यक्रमातून जो निधी उभा रहाणार आहे तो शाळेच्या रंगमंचाचे नूतनीकरण करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. दिग्दर्शन, संकल्पना तिची स्वत:ची असून हेमदत्त सावंत, विनोद गोंदकर, शशी करंदीकर, प्रतिभा जोशी यांनी या कामी तिला सहकार्य केलेले आहे.

- Advertisement -

नृत्य, गायन आणि स्कीट्स असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. अनेक माजी विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. शिवाय सामाजिक जाणीव असलेले परंतु सांस्कृतिक चळवळीशीही निगडीत असणारे अनेक कलाकार या निमित्ताने एकत्र येणार आहेत. संजय खापरे, अरुण कदम, अभिजित चव्हाण, मीरा मोडक, जयवंत भालेकर, कमलाकर सातपुते, सुप्रिया पाठारे यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल हीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तिची आई या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्यामुळे ती काही गाणी इथे सादर करणार आहे. दर्शन साटम याचासुद्धा सुस्वर ऐकायला मिळेल. नृत्यांगणा म्हणून कविताचा या कार्यक्रमात सहभाग आहेच, परंतु तिच्याकडे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होऊन कलाविष्कार घडवणार आहेत. हेमांगी कवी, संजय खापरे प्रत्यक्ष नृत्य सादर करणार आहेत. कॉमेडी एक्स्प्रेस फेम अमीर हडकर कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणार आहे. निवेदनाची जबाबदारी विघ्नेश जोशीवर सोपवलेली आहे.
३ एप्रिल सकाळी १०.३० वाजता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात प्रेक्षकांना ‘रंग कलेचा’ आनंद घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -