घरफिचर्सराज ठाकरेंच्या सभांचं झालं काय? हे झालं!

राज ठाकरेंच्या सभांचं झालं काय? हे झालं!

Subscribe

‘मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करत नाही, पण मोदी-शहा जोडीला मत देऊ नका’, असा राज ठाकरेंचा थेट दावा होता. पण त्याच वेळी सेना-भाजप नाही आणि काँग्रेसला मतांचा आग्रह नाही, तर मग मत द्यायचं तरी कुणाला? असा प्रश्न मतदारांना पडला असेल यात नवल नाही. त्यातच स्वत: मनसेनं उमेदवार उभे केले नसल्यामुळे राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे पटलेले अनेक तारेवरचे आणि दोन्ही गोटातले मतदार गोंधळात पडले होते. त्यामुळे त्यांनी आपापला निर्णय घेतला. त्यातल्या बहुतेकांचा निर्णय सेना-भाजपच्या गोटात गेला हे तर स्पष्टच आहे.

‘राज ठाकरेंच्या सभांमुळे मराठी मतांचं विभाजन होणार’, ‘भाजप-शिवसेनेची मतं कमी होणार’, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मराठी मतदार वळणार’ अशा आशयाच्या चर्चा आपण मतमोजणीपूर्वी महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई-नाशिकमध्ये अगदी सहज ऐकत होतो. पण जसजसे लोकसभेचे निकाल जाहीर होऊ लागले, तसतसे हे संवाद ऐकू येईनासे झाले. आणि एक प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला…’..मग राज ठाकरेंच्या संभांचं झालं काय?’ खरंतर राज ठाकरेंनी प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अद्यापही भाजप किंवा शिवसेनेला देता आलेली नाहीत. आशिष शेलार यांनी उत्तर देताना दिलेली ‘आता बघाच तो व्हिडिओ’ ही हाकही फार लांबपर्यंत गेली नाही. भाजपची नेतेमंडळी देखील राज ठाकरेंच्या आरोपांबद्दल बोलताना काही क्षण चाचरत होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभांचा हमखास परिणाम निवडणुकांच्या निकालांवर पडणार याची खात्रीच राज्यातल्या जनतेला होती. पण झालं उलटंच!

राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं चित्र निकालांमधून समोर आलं. मोदी-अमित शहा जोडीला पराभूत करण्यासाठी राज ठाकरेंनी राज्यभर एकूण १० प्रचारसभा घेतल्या. प्रत्येक प्रचारसभेत मोदींच्या आश्वासनांचे आणि वक्तव्यांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी जनतेला मोदी-शहा मुक्त भारताचं आवाहन केलं. राज यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, उपस्थितांची प्रचंड संख्या लक्षात घेता या सभांचा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम जाणवेल, असं वाटत होतं. कारण राज यांच्या सभांमधील थेटपणा बोलका होता. शहा-मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचा राज यांनी पद्धतशीरपणे पोलखोल केला होता. या दोघांसाठी हा अनुभव कमालीचा त्रासदायक आणि तापदायकही होता. कारण मराठीतून भाषणाच्या भाषांतरित झालेल्या ऑडिओक्लिप देशभर पोहोचल्या होत्या. यामुळे राज यांच्या भाषणांचा परिणाम सर्वदूर होईल, अशी अपेक्षा होती. पण लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर राज्यात ‘राज’ फॅक्टर गायब झाल्याची चर्चा रंगू लागली. २०१४च्या आकडेवारीपेक्षा भाजप (२३) आणि शिवसेना (१८) यांच्या जागांमध्ये एकाही जागेचा फरक झाला नाही. उलट काँग्रेस गेल्या निवडणुकीत २ जागांवर होती ती यंदा एकवर आली. खुद्द राज ठाकरेंनी देखील या निकालांचं ‘अनाकलनीय’ असं वर्णन केलं. मनसेच्या सभांचा परिणाम का जाणवला नाही? या प्रश्नामुळे मतदारांपेक्षाही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळीच जास्त बुचकळ्यात पडली आहेत. राजकीय जाणकारांना देखील हाच प्रश्न पडला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आपण निकालाची आकडेवारी पाहिल्यास कदाचित मिळू शकेल!

- Advertisement -

नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मावळ, नाशिक आणि मुंबईतले दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई हे दोन, अशा एकूण १० मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या प्रचारसभा घेतल्या. ‘मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करत नाही, पण मोदी-शहा जोडीला मत देऊ नका’, असा राज ठाकरेंचा थेट दावा होता. पण त्याच वेळी सेना-भाजप नाही आणि काँग्रेसला मतांचा आग्रह नाही, तर मग मत द्यायचं तरी कुणाला? असा प्रश्न मतदारांना पडला असेल यात नवल नाही. त्यातच स्वत: मनसेनं उमेदवार उभे केले नसल्यामुळे राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे पटलेले अनेक तारेवरचे आणि दोन्ही गोटातले मतदार गोंधळात पडले होते. त्यामुळे त्यांनी आपापला निर्णय घेतला. त्यातल्या बहुतेकांचा निर्णय सेना-भाजपच्या गोटात गेला हे तर स्पष्टच आहे. पण त्यातही मोठ्या संख्येने हा मतदार नोटाकडे वळल्याचं स्पष्टपणे दिसतं. विशेषत: राज ठाकरेंच्या सभा झालेल्या मतदारसंघात. आणि इथेच राज ठाकरेंच्या सभांचा सर्वात मोठा प्रभाव जाणवतो.


पाहा – Video : राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’वर आता रॅप साँग

राज ठाकरेंनी घेतलेल्या १० सभांपैकी ६ ठिकाणी नोटासाठी पडलेल्या मतांची संख्या २०१४च्या तुलनेत मोठ्या संख्येनं वाढली आहे. त्यातही सर्वाधिक परिणाम मुंबईतल्या द. मुंबई, द. मध्य मुंबई याशिवाय पुणे आणि मावळ या ४ मतदारसंघांमध्ये दिसून येतो. ज्यांना एनडीए किंवा यूपीए अशा कोणत्याही आघाडीला मत द्यायचं नव्हतं आणि इतर पक्षीय उमेदवार त्या पात्रतेचे वाटले नाहीत, त्यांनी नोटाचा पर्यात निश्चितच स्वीकारला असणार. या वाढलेल्या नोटा मतदानावर राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम झाला असेल असं म्हणण्यास निश्चितच वाव आहे. यात दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे खुद्द मनसेने उमेदवार उभे केलेले नसल्यामुळे राज ठाकरेंच्या सभांमधून प्रभावित झालेला मोठा मतदारवर्ग शिवसेनेकडे वळल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. खुद्द शरद पवारांनी देखील ‘मनसेचे उमेदवार असते, तर निकाल वेगळे लागले असते’, अशा आशयाचं केलेलं वक्तव्य याचीच साक्ष देणारं आहे.

- Advertisement -

यंदाच्या निकालाची ही बाब राज ठाकरे आणि मनसेसाठी नक्कीच दिलासादायक आहे. आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधार्‍यांसाठीही काळजी करायला लावणारी आहे. कारण, येत्या विधानसभेत मनसेचे उमेदवार स्पर्धेत असणार आहेत. त्यामुळे एक तर मराठी मतदारांना शिवसेनेव्यतिरिक्त पर्याय उपलब्ध असणार आहे. सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणालाही निवडण्याची इच्छा नसलेला मतदार मनसेकडे अपेक्षेनं पाहत असणार आहे. त्याही उपर यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने प्रचार करणारे राज ठाकरे तेव्हा फक्त त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार करत असतील. त्यामुळे आत्ता जरी सेना-भाजपने जिंकलेल्या जागांवर राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम जाणवला नसला, तरी विधानसभेत तो जाणवू शकतो हे नक्की. विजयाच्या धुंदीत असणार्‍या सत्ताधार्‍यांनी आणि पराभवाच्या धक्क्याने कोलमडून पडलेल्या विरोधकांनी हा गर्भित आणि सूचक इशारा समजावा!


हेही वाचा – लोकसभेच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पाहा काय म्हणाले होते राज ठाकरे…

राज ठाकरेंचा भाजप आणि नरेंद्र मोदीवर 'स्ट्राईक'

राज ठाकरेंचा भाजप आणि नरेंद्र मोदीवर 'स्ट्राईक'

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 8, 2019

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -