घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमेंदूतल्या बेजबाबदारपणाच्या विषाणूचे काय ?

मेंदूतल्या बेजबाबदारपणाच्या विषाणूचे काय ?

Subscribe

क्वारंटाईन केलेले सहा प्रवासी मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र एक्स्प्रेसने वडोदराला जाण्यासाठी निघाले होते. त्यांना बोरिवली स्टेशनवर उतरवून पुन्हा तपासणीसाठी नेण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. हातावरील शिक्क्यामुळे या प्रवाशांना ओळखणे शक्य झाले. हे सर्व प्रवासी सिंगापूरहून आले होते. त्यानंतर या प्रवाशांचे विलगीकरण करण्यात आले होते. मात्र करोनाचे सावट असताना यातील काही प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीतून लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका निर्माण केला, मेंदूत शिरलेला हा बेजबाबदारपणाचा विषाणू करोनापेक्षा जास्त घातक आहे.

सरकार आणि संबंधित यंत्रणा करोनाबाबत सतर्क आहेतच. मात्र लोकांनी या आजाराला गांभीर्याने घेतलेले नाही. करोनाचा संसर्ग झाल्यावर आपण रुग्ण विषाणूचे वाहकही बनणार आहोत. या दोन्ही गोष्टींचे गांभीर्य मोठे आहे. परंतु मुंबईतील ‘त्या सहा’ जणांच्या बेजबाबदार वागण्यानंतर करोनाबाबत मुंबईकर खरेच सजग आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लोकल आणि बस सेवा बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले, याआधीच्या आपत्काळात मुंबईकरांंनी सूज्ञतेचा परिचय दिलेला आहे. एक विषाणू ज्याप्रमाणे मानवी देहातील लाखो पेशींना बाधित करू शकतो. तसाच एक बेजबाबदार नागरिक लाखो मुंबईकरांना धोक्यात आणू शकतो. या बेजबाबदारपणावर नियंत्रण कसे आणावे? केवळ अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र लोकल ट्रेनमधली गर्दी पाहता या आवाहनाचा परिणाम नगण्य स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुपारच्या वेळेतही मध्य रेल्वेच्या लोकलही खचाखच भरलेल्या आहेत. सकाळी विरार, वसई, कल्याण, कर्जत, कसार्‍याहून मुंबईकडे जाणार्‍या लोकलची गर्दी कायम आहे. लोकलची गर्दी मोजायचा अंदाज चौथ्या सीटवरून काढता येऊ शकतो. करोनाचे सावट असतानाही लोकलच्या चौथ्या सीटवरही प्रवासी होते. या शिवाय दोन सीट्समधल्या मोकळ्या जागेतही प्रवासी आहेत. त्यामुळे करोनाच्या सुटीचा फायदा घेऊन नागरिक जिवाची मुंबई करायला बाहेर पडले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील चौपाट्या, मरिन ड्राईव्हवरही फिरायला आलेली कुटुंबे दिसत आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान न करता या सुटीत मौजमजेसाठी करणारे आणि करोनाच्या सुट्टीचाही असा ‘लाभ’ घेणारे सारखेच बेजबाबदार आहेत.

ही बेजबाबदारी एवढ्यापुरती मर्यादेत नाही, त्याहीपुढे जाऊन रस्त्यावर पिचकार्‍या मारणार्‍यांची संख्याही मोठी आहे. लोकल ट्रेनच्या खिडकीत बसून आपल्या मुखात भरलेल्या गुटख्यारुपी किंवा तंबाखूरुपी कारंजांचे तुषार उडवणार्‍यांची संख्या मोठी आहे. याशिवाय उगाचच थुंकणार्‍या गटात येणार्‍यांची संख्याही मोठी आहे. मिनिटा-मिनिटांनी उगाचच थुंकणे, पिचकार्‍या मारण्यालाही स्टाईल समजणार्‍यांची संख्या मुंबई ठाण्यात कमी नाही. त्यांना आवारण्यासाठीच ठाण्यात पानाच्या टपर्‍या बंद करण्याचा निर्णय ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. या पिचकारी बहाद्दरांकडून करोनाचा संसर्ग वाढू शकतो. लोकल ट्रेनमध्ये असे अनेक पिचकारी बहाद्दर आहेत. तोंडावरचा मास्क वरखाली करून खिडकीतून किंवा दरवाज्यातून कारंजी उडवणार्‍यांच्या मुसक्या आवळणार कोण, असा प्रश्न आहे. दुसरीकडे फलाटावर रेल्वे रुळावर आणि लोकल ट्रेनच्या दोन डब्यांच्या मधल्या गॅपमध्ये अतिशय कलात्मकतेने आपले पिचकारी प्रदर्शन मांडणारेही कमी नाहीत. दोन बोटांनी दाब देऊन तोंडाचा चंबू करत दातओठांच्या फटीतून सोडलेली पिचकारी जास्तीत जास्त लांबवर फेकण्याची ही कला सादर करणारे ‘कलाकार’ मुंबई ठाण्यात कमी नाहीत.

- Advertisement -

मास्क लावण्यामागची कारणे कोणती? आपल्या आजाराचा इतरांना संसर्ग होऊ नये, हे यातले प्रमुख कारण आहे. तोंड, नाक आणि डोळ्यांना वारंवार हात लावू नका, असे आवाहन लोकल ट्रेनमधून केले जात आहे. मास्क लावल्यानंतर ते अ‍ॅडजेस्ट करण्याच्या प्रयत्नात हाता तोंडाजवळ अनेकदा हात नेणार्‍यांमुळे खरेतर असा मास्कच धोकादायक ठरणार आहे. तोंडाला मास्क लावण्याची आणि मास्क काढण्याची योग्य पद्धत समजून न घेता लावलेला मास्कही संसर्गाला कारण ठरू शकतो. नाक आणि तोंड तसे डोळे शरीराच्या इतर कुठल्याही अवयवाच्या संपर्कात येता कामा नयेत, याशिवाय बाहेरील कुठल्याही वस्तू किंवा कापडाच्या संपर्कात हे अवयव आल्यास संसर्गाचा धोका आहे. अर्धवट माहितीमुळे हा धोका वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आणू नका, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांनी गर्दी टाळण्याची आपली सामाजिक जबाबदारी समजून घरात बसावे. सुचनांना नियम बनवण्याची गरज पडू नये, असे आवाहन वारंवार केले. मात्र लोकल ट्रेनची गर्दी आवश्यक तेवढी कमी झालेली नाही. सुट्टी ही मौजमजेसाठीच असते, असे समजणार्‍या नागरिकांना करोनाच्या वाढत्या फैलावाबाबतओरड करण्याचा अधिकार नसतो. सार्वजनिक स्वच्छतेचे पालन न करणारे, लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या सीटवर पाय ठेवणारे, खिडक्यांना थूकदाणी समजणारे नागरिक करोनाच्या ‘कोविड १९’ विषाणूपेक्षाही जास्त खतरनाक आहेत. या विषाणूवर औषध निर्माण होईलच, त्यावर प्रतिबंधात्मक लसही येत्या काळात तयार होईल. मात्र अशा बेजबाबदारपणा शिरलेल्या मेंदूतील विषाणूचा धोका यापुढेही कायम असेल, त्यावर उपाय आपला आपल्यालाच शोधावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -