घरफिचर्समायमहानगर ब्लॉगउठा उठा दिवाळी आली...

उठा उठा दिवाळी आली…

Subscribe

लाडवांची मोठी रास अंगावर कोसळतेय.... करंजीचा उपयोग धनुष्यबाणासारखा केला जातोय... चकलीच्या वेटोळ्याला सरळ करून सपासप पाठीवर सटकारे दिले जाताय, असे भास क्षणोक्षणी होत होते. या स्वप्नानं मानसिकता ढासळायला सीमाच उरली नव्हती. एखादी मोठी भक्कम गढी वार्‍याच्या झुळकेनिशी कोसळावी तशी माझ्या झोपेची अवस्था झाली. क्षणाक्षणाला जाग येत होती आणि क्षणाक्षणाला पुन्हा-पुन्हा कोरोनाची मालिका सुरू होत होती. कोरोनाच्या रौद्र रुपाची बरोबरी माझ्यासारखा सामान्य माणूस आपल्या बायकोशीच करतो. माझ्यासारख्या सामान्याच्या स्वप्नात स्वत:ची बायको, परी-बिरीच्या रुपात येत नाही. ती येते तिच्या नेहमीच्याच रौद्र रुपात.

उठा उठा दिवाळी आली, फराळ खाण्याची वेळ झाली! पण यंदा दिवाळी बरोबर दिवाळंही आलंय. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कोरोनामुळे खालावलेली मानसिक स्थिती. यामुळे यंदाच्या दिवाळीचा प्रकाश काहीसा फिका वाटतोय. अशातच हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवल्याने सर्वसामान्यांना थंडी पडण्याआधीच हुडहुडी भरलीय. परिणामी दिवाळीतील उत्साहाचे फटाके फुसके झालेय. चैतन्यरुपी फराळाचीही चव गेली. या सर्व भीतीदायक वातावरणाचा परिणाम काय झाला तर म्या पामराला केवळ आणि केवळ कोरोनाचीच स्वप्न पडू लागली. अर्थात सामान्य माणूस म्हटला की, हे सारं आलंच. मानसिक गोंधळ आमच्या पाचवीला पूजलेला. आम्ही आत्मचिंतन करत नाही. पण अतिचिंता करतो. त्या चिंतेतून निष्पन्न काही होत नाही, ही बाब अलहिदा.

जगभरातील भित्रा प्राणी कोणता असा प्रश्न जर कुणी केला तर त्याचं उत्तर ‘सामान्य माणूस’ असंच यायला हवं. ‘मी मोर्चा नेला नाही, मी संप केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही’ हे गाणं माझ्यावरच लिहिलंय असा माझा ठाम दावा आहे. मी व्यवस्थेच्या विरोधात बोलत नाही. मी व्यवस्थेच्या बाजूनेही कधी उभा राहत नाही. खरं तर मी व्यवस्थेविषयी भूमिकाच घेत नाही. त्यामुळेच मला ‘सामान्य माणूस’ अशी उपाधी मिळालीय. तर मुद्दा असा आहे की, माझ्यातला सामान्य माणूस गेल्या काही महिन्यांंपासून सातत्याने कोरोनासंबंधित बातम्या पाहतो, वाचतो. ते बघून, वाचून झोपमोड करुन घेतो. दुसर्‍या दिवशी ‘पहिले पाढे पंचावन्न’. त्यामुळे डोक्यात आजकाल केवळ कोरोनाचेच विचार घोंगावतात. परिणामी रात्री झोपेत स्वप्नही भयानक पडायला लागलेय. असंच स्वप्न काल मला पडलं.

- Advertisement -

लाडवांची मोठी रास अंगावर कोसळतेय…. करंजीचा उपयोग धनुष्यबाणासारखा केला जातोय… चकलीच्या वेटोळ्याला सरळ करून सपासप पाठीवर सटकारे दिले जाताय, असे भास क्षणोक्षणी होत होते. या स्वप्नानं मानसिकता ढासळायला सीमाच उरली नव्हती. एखादी मोठी भक्कम गढी वार्‍याच्या झुळकेनिशी कोसळावी तशी माझ्या झोपेची अवस्था झाली. क्षणाक्षणाला जाग येत होती आणि क्षणाक्षणाला पुन्हा-पुन्हा कोरोनाची मालिका सुरू होत होती. कोरोनाच्या रौद्र रुपाची बरोबरी माझ्यासारखा सामान्य माणूस आपल्या बायकोशीच करतो. उगीच दुसर्‍या कुणाशी बरोबरी करुन मला वाद ओढावून घ्यायचा नसतो. माझ्यासारख्या सामान्याच्या स्वप्नात स्वत:ची बायको, परी-बिरीच्या रुपात येत नाही. ती येते तिच्या नेहमीच्याच रौद्र रुपात. अशा रौद्र स्त्रीच्या हातचा फराळ खायचा म्हणजे अतिधाडसाचं काम. ते धाडस केलं नाही तर फासावर लटकवलं जाणार याची खूनगाठ मनाशी पक्की बांधली गेलेली.

तिनं केलेले फराळाचे ‘ते’ एकसे एक आयटम्स झोपमोड करणारेच होते. वरून पांढरीशुभ्र दिसणारी करंजी न तुटता ‘समुद्र सपाटीपासून’ तीन फूट वर उचलणं म्हणजे एक दिव्यच. उचलल्यावर राजस्थानच्या वाळूप्रमाणे हातात भुगाच राहायचा. इकडेतिकडे बघत हळूच मूठ दाबून मग त्या भुग्याचा लाडू करायचा अन् ‘लाडू फार आवडतात बुवा’, म्हणत खोट्या आविर्भावात मिटक्या मारत खायचा. शंकरपाळ्यांचं तर विचारूच नका. ती शंकरपाळी होती की ‘लिटलस्टोन’ हे शेवटपर्यंत कळलंच नाही. किडनीस्टोनला लाजवेल, असं सौंदर्य लाभलेल्या शंकरपाळ्यांना खायला मोठी ‘डेअरिंग’ लागत होती. लाडू तर एवढे ‘स्ट्राँग’ होते की, खाताच दात ब्रेकडान्स करायला लागायचे. मिक्सरमध्ये टाकले तर त्याचे पाते वाकले. खलबत्यात कुटू म्हटले, तर तिथूनही तो स्प्रिंगसारखा टुणकन उडी मारून बाहेर यायचा. शेवटी रागाने त्याच्यावर मुसळी हाणली, तर तो उडून कपाळावरच बसला अन् बॉम्ब फुटल्यागत कपाळाची अवस्था झाली.

- Advertisement -

एवढं पुरेसं नव्हतं की काय तोच चकल्यांचा आग्रहही मोठ्या ‘प्रेमाने’ सुरु झाला. प्रेमाने कसले चकल्या खाण्याची धमकीच दिली गेली. त्यामुळे भीत-भीत ही ही चकली उचलली. तर त्यातून अभिषेक घातल्यागत तेल निथळायला लागलं. तरीही बायकोच्या ‘हस्तकलेला’ व्यासपीठ मिळावं म्हणून खात गेलो अन् नरड्याचा बिघडलेला तुनतुना (करकर आवाज करणारा) करून बसलो. बोलायला गेलो, तर मधूनच जुनं पातेलं घासल्यागत आवाज यायचा. ‘वाकेल पण मोडणार नाही’, अशा बाण्याच्या अनारशानंही काही कमी छळलं नाही. वातड तर एवढा की, लहानपणी रस्सीखेचाच्या खेळात दोरीऐवजी त्याचा वापर केला असता तरी चाललं असतं. अंगाला भरपूर माती चोपडून आखाड्यात उतरणार्‍या पहिलवानागत हे ‘अनारसं’ फराळाच्या ताटात (आखाड्यात) अंगाला भरपूर खसखस चोपडून उतरलेलं… ‘खाऊन दाखवा अन् बक्षीस जिंका’, अशा आविर्भावात वाकुल्या दाखवत ‘करशील का लग्न?’ म्हणून जणू चिडवतच होतं. झोपेच्या पूर्वार्धात हा फराळाचा छळ, तर उत्तरार्धात फटाक्यांचा..! फटाके फोडण्याच्या माझ्या स्वप्नावरून ‘फोडणं’ हा शब्द फक्त ‘नशीब फोडणं’, ‘फोडून काढणं’, ‘डोकं फोडणं’ एवढ्यासाठीच वापरायला हवा, असा ठाम समज झालाय.

स्वप्नाच्या प्रारंभीच लवंगी फटाक्याला भिऊन जो पळत सुटलो तो थेट पेटलेल्या सुतळी बॉम्बवरच जाऊन आदळलो. त्यामुळे आता नागगोळीसुध्दा पेटवायची रिस्क घ्यायची नाही, असं ठरवूनच टाकलं होतं, पण आलीया भोगासी. असावे सादर..! जगातील सर्वाधिक मानाचा नातेवाईक म्हणून ज्याकडे मी बघतो त्या साल्यांच्या आग्रहास्तव अंगणात फटाके पाहायला गेलो. अर्थात साल्याला शिवी देण्याची हिंमत कधी झाली नाही. पण जरा रागानं त्याला साला म्हटलं तरीही माझी अतृप्त इच्छा पूर्ण होते. तर या साल्यांच्या आग्रहास्तव मी फटाके फोडण्यासाठी रंणांगणात (अंगणात) उतरलो. शत्रुपक्षानं सर्वच अस्त्रांची तोंडं आपल्याकडेच नेम धरून रोखली असल्याचा त्याचक्षणी भास झाला. या सर्वांमध्ये सर्वात भयंकर अस्त्र होतं ते म्हणजे रॉकेट, ‘बाटली’ आणि डोक्यातील ‘दारू’ शिवाय न उडणारं हे ध्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवायला आलेल्या विमानागत डोक्याकडे धाव घेते की काय, या भीतीनं मी जीव मुठीत धरून उभा होतो. तेवढ्यात मघा पेटता-पेटता राहून गेलेल्या सुतळीनं अचानक बंडखोरी केली अन् कानावर हात ठेवण्याआधीच कानठळ्या बसवून गेला. फुटल्यावर तर काही क्षण साक्षात उस्ताद बिस्मिल्ला खान येऊन शहनाई वादन करीत असल्याचा भास झाला. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मंदिरात घुमतो तसाच दीर्घ वेळ ‘किऽऽणऽऽ‘ आवाज माझ्या कानात घुमत राहिला. या किणकिणीतच अधूनमधून लवंगी फटाकेही ‘कोरस’ची भूमिका बजावत होते.

शेवटी वैतागून ‘बस करा ही कटकट’ म्हणून काढता पाय घ्यायचा प्रयत्न केला; पण माझी दाणाफाण पाहून साले मंडळींनीच आवाजाचे फटाके न फोडण्याचा निर्णय जाहीर केला.‘आता आतषबाजी जीज्जू’ म्हणत अगदी वीतभर कपडे घातलेल्या नट्यांच्या फोटोंचे बॉक्स भराभर बाहेर आले; पण या पूर्वीच्या अत्याचारानं हतबल झालेला ‘मी’ आता या आतषबाजीसमोर बळीच्या बकर्‍याप्रमाणे निर्व्याजपणे उभा होतो. तेवढ्यात भामटा भुईनळा सातबाराच्या उतार्‍यावर आपलं नाव नसूनही दुसर्‍याची जमीन (आंगण) आपल्याच बापाची आहे, अशा थाटात उभा राहिला. पेटल्यावर सुरुवातीला त्यानं सुंदर सुंदर देखाव्यांचं झाड उभं केलं अन् क्षणार्धात दिवाळखोरी जाहीर करून मोकळा झाला. भुईचक्राचं गरगरणं मानसिक संतुलन हरवलेल्या जीवाप्रमाणे दिसत होतं, तर कधी पिसाळलेल्या कुत्र्यासारखं दिशाहीन गरगरणं वाटत होतं. गोळीतला नाग ‘कालिया, कोब्रा’ किंवा ‘अ‍ॅनाकोन्डा’ असल्याचा दिमाख दाखवीत होता. हे सारं सहन करत मी मनाला खोटं खोटं प्रसन्न करू पाहात होतो. अगदी पिशवीतला माल संपल्यानंतर फुसके फटाके वेचून कागदावर केलेल्या दारूच्या ‘आतषबाजी’ पर्यंतचा अत्याचार मी सहन करीत होतो. तेव्हढ्यात फुसक्या फटक्यांमधून आणखी कुणीतरी बंडखोरी केली आणि तो जोरात आवाज करुन उठला. त्याच्या आवाजाने नेहमीप्रमाणे दचकून उठलो. या दचकण्याची तीव्रता इतकी होती की, घरच्यांनी मानसरोग तज्ज्ञाची अपॉईंटमेंट घेतली म्हणे ! आता बोला !

उठा उठा दिवाळी आली…
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -