घरफिचर्सकोळीगीतांच्या निमित्ताने

कोळीगीतांच्या निमित्ताने

Subscribe

कोळीगीतांची हीच खासियत असते की ती ऐकताना त्यांचा ठेका आपल्याला एखाद्या समुद्रकिनार्‍यावर वसलेल्या कोळीवाड्यात घेऊन जातो. त्यांची संपूर्ण जीवनशैलीच आपल्यासमोर उभी करतो. कोळीगीतांतली बहुसंख्य गाणी ही बर्‍याचदा लग्नसमारंभ केंद्रस्थानी ठेवून गुंफलेली असल्याचं आढळून येतं. ‘अंबियाच्या करांवर तंबियाची डाली, मिरवते लग्नान हिरूबाई करवली’ हे त्यापैकीच एक गाणं. साधारण पस्तिस ते चाळीस वर्षांपूर्वी शाहीर दामोदर विटावकर यांनी गायलेलं. पण इतक्या वर्षांनंतरही ते कुणी बॅन्डवर वाजवतं आहे हे पाहून आश्चर्य वाटतं.

परवा गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक चालली होती…आणि त्या मिरवणुकीच्या पुढे हजर असलेल्या बॅन्डवर कोळीगीतं सुरू होती म्हणून इतर मिरवणुकांपेक्षा त्याकडे जरा जास्त लक्ष वेधलं गेलं. इतर मिरवणुकांमध्ये नाशिक बाजा वगैरे प्रकार सुरू असताना या कोळीगीतं वाजवणार्‍या मिरवणुकीचा प्रकार काही औरच होता. त्यांनी जी मेडली सुरू केली होती तीही कोळीगीतांचीच होती. एका कोळीगीतातून दुसरंही कोळीगीतच गुंफण्याची त्यांची पध्दत त्या सगळ्या गोंगाटाच्या, कल्लोळाच्या, धिंगाण्याच्या वातावरणात मन सुखावणारी होती. तरूणपणी कुठे कुठे ऐकलेल्या त्या कोळीगीतांची ओळख पटत गेली आणि माझं शहरी मन ती कोळीगीतं ऐकता ऐकता तिथल्या तिथे थबकलं. एरव्ही आपण जे हिंदी-मराठी सिनेमासंंगीत ऐकतो त्यात अचानक फाटा बदलून कोळीगीतांच्या सुरांकडे वळण्याची आपल्याला तशी सवय नसते. पण परवा मात्र त्याला साफ फाटा देऊन भरस्त्यात ती कोळीगीतं ऐकावीशी वाटली.

सुरूवातीलाच त्या बॅन्डवर ‘दर्यावरी आमची डुलं होरी, घेऊन माशांच्या डोली न आम्ही हाव जातीचे कोली’ हे फार वर्षांपासून प्रसिध्द असलेलं कोळीगीत असं काही झोकात वाजवलं गेलं की आपल्या अंगी नाचण्याचं कोणत्याही प्रकारचं कसब नसलं तरी मन मनातल्या मनात फेर धरू लागलं. त्यातल्या ‘आम्ही हाव जातीचे कोली’ हे शब्द कोळ्यांच्या आपण कोळी असण्याच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा असा काही ठसका देऊन गेले की दर्यावर डुलणार्‍या होडीतला कोळीबांधव नजरेसमोर दिसू लागला. कोळीगीतांची हीच खासियत असते की ती ऐकताना त्यांचा ठेका आपल्याला एखाद्या समुद्रकिनार्‍यावर वसलेल्या कोळीवाड्यात घेऊन जातो. त्यांची संपूर्ण जीवनशैलीच आपल्यासमोर उभी करतो. कोळीगीतांतली बहुसंख्य गाणी ही बर्‍याचदा लग्नसमारंभ केंद्रस्थानी ठेवून गुंफलेली असल्याचं आढळून येतं. ‘अंबियाच्या करांवर तंबियाची डाली, मिरवते लग्नान हिरूबाई करवली’ हे त्यापैकीच एक गाणं.

- Advertisement -

साधारण पस्तिस ते चाळीस वर्षांपूर्वी शाहीर दामोदर विटावकर यांनी गायलेलं. पण इतक्या वर्षांनंतरही ते कुणी बॅन्डवर वाजवतं आहे हे पाहून आश्चर्य वाटतं. शाहीर दामोदर विटावकर यांनी ध्वनिमुद्रिकांच्या काळात हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा तो लग्नसराईचा मोसम होता आणि गाणं रेकॉर्ड करून ते ऐकल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक लग्नातली करवली जरा जास्तच मिरवून घेईल! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या गाण्यात ‘मिरवणं’ हा शब्द येणं ही लग्नगीताची प्राथमिक गरज होती आणि त्याप्रमाणे तो या गाण्यात आला आहे. ते या गाण्याबद्दल बोलता बोलता सहज बोलून गेले होते की हे गाणं जिथे जिथे वाजायचं तिथली एक गंमत सांगायलाच हवी की हे गाणं वाजल्यावर हिरूबाईच कशाला, प्रत्येकालाच आपण करवली आणि करवला असल्यासारखं वाटायला लागायचं!

लग्नाशी संबंधित असंच एक जुनं कोळीगीत आठवतं ते म्हणजे ‘सांजचे पारा, बसून मागले दारा, धुये नको ललू तुला दिलंय मोठे घरा.’ हे कोळीगीत लग्नाशी संबंधित असलं तरी ते माहेरवाशिणीचं गाणं आहे. या गाण्यात वर्णन केलेली जी कुणी आहे तिचं लग्न झालेलं आहे. पण एखाद्या कातरवेळी घराच्या मागच्या दारात बसून माहेरच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. अशा वेळी हे गाणं तिची समजूत काढतं आणि म्हणतं, संध्याकाळच्या प्रहरी अशी भरल्या घरात रडू नकोस, खरंतर खूप मोठ्या घरंदाज घरात तुझं लग्न लावून दिलं आहे. उलट तू आनंदाने राहायला हवं. तसं पाहिलं तर माहेवाशिणीच्या मनातली वेदना व्यक्त करणारं हे गाणं आहे. पण तरीही त्या गाण्यात जो ठेका आहे तो नाचायला प्रवृत्त करतो हे या गाण्याचं वैशिष्ठ्य आहे. या गाण्यातला हा आशय कळतो तेव्हा सुमन कल्याणपूरांनी गायलेल्या ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात’ या गाण्याची आठवण आल्यावाचून रहात नाही. अर्थात, सुमन कल्याणपूरांनी गायलेलं ते गाणं हे काही कोळीगीत नाही तर ती आहे एका माहेरवाशिणीच्या कैफियतीची नितांत कविता. पण तिच्यातला आशय हा ‘सांजचे पारा, बसून मागले दारा’ या कोळीगीतातल्या माहेरवाशिणीच्या म्हणण्याशी बर्‍याच अंशी जुळतो.

- Advertisement -

शहरात राहणार्‍या आणि शहरीबाबू बनलेल्या बर्‍याच जणांना कोळीगीत म्हटलं की, ‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा’ आठवतं किंवा ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?’ गुणगुणावंसं वाटतं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या या दोन्ही गाण्यांमध्ये कोळीगीताचा बाज असला तरी ती कायम शहरीच वाटतात. ती काही अस्सल कोळीवाड्यातली गाणी वाटत नाहीत. अर्थात, एक गोष्ट मान्य करायलाच हवी की, ‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा’ या गाण्याला शांता शेळकेंसारख्या प्रतिभावंत लेखणीचा स्पर्श झाला असल्यामुळे त्यातल्या कोळी भगिनीचं जे नितांतसुंदर चित्र उभं राहिलं आहे त्याला तोड नाही. तिचं वर्णन करताना शांताबाई लिहितात, आयबापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसले अंजिरी सारी, माझ्या केसान गो मालिला फुलैला चाफा, वास परमालता वार्‍यानं घेतंय झेपा, नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी. कोळी भगिनीचं इतकं नाजूकसाजूक पण, अचूक वर्णन क्वचितच एखाद्या कोळीगीतात आजवर आलेलं असेल!

पण या दोन्ही गाण्यांना तसा रेशमी आवाज लाभला तो हेमंतकुमारांचा. तसं पाहिलं तर त्या एका काळात हेमंतकुमारांच्या वाट्याला काही कोळीगीतं ठरवून आल्यासारखी आली. त्यातलंच एक गाणं होतं, दर्यावरी रं, तरली होरी रं, तुझी-माझी जोरी बरी, साजना, होरीतून जाऊ घरी. हे गाणं हेमंतकुमारांनी सुमन कल्याणपूरांची बहीण श्यामा चित्तारबरोबर गायलं आणि ते लोकांपर्यंत बर्‍यापैकी पोहोचलं. पण आधी म्हटल्याप्रमाणे ही सगळी कोळीगीतं शहरी चेहरा पांघरलेली होती. ती भावगीतांसारखी चांदणओलीच राहिली. त्यांना जी लोकमान्यता मिळायला हवी होती ती नक्की मिळाली. पण ती लग्नाच्या वरातीत नाचणार्‍या तरूणतरूणींना तितकीशी जवळची वाटली नाहीत. ज्याच्या त्याच्या अभिरूचीचा तो प्रश्न होता असा समज करून घेतला तरी कोळीगीतातसुध्दा हा पंक्तीप्रपंच होता किंवा आहे हे अमान्य करता येणार नाही.

रवींद्र जैन यांच्यासारख्या संगीतकारालाही कोळीगीतांच्या चालींबद्दल विशेष आकर्षण होतं हे या निमित्ताने सांगायला हवं. त्यांना कोळीगीतांच्या चाली जवळ जवळ एकसारख्या असूनही त्यांच्यात वेगळेपण कसं येतं याचं कुतूहल होतं. म्हणूनच त्यांनी संगीत दिलेल्या ‘दो जासूस’ मधल्या ‘पुरवैय्या, ले के चली मेरी नैया’ या गाण्याच्या आधी ‘दर्याचा राजा देवा हो देवा’ अशा शब्दांतले कोळीगीताचे बोल टाकले होते आणि गाण्याचा समारोप पुन्हा त्याच कोळीगीतावर केला होता.

असो, कोळीगीत हा आपल्या संगीतातला एक वेगळा अध्याय आहे आणि त्यावर काही लिहिण्याबोलण्यासाठी गणपतीच्या मिरवणुकीचा बॅन्ड एक निमित्त झाला!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -