घरफिचर्सते मुशायर्‍यात रमले तरी...

ते मुशायर्‍यात रमले तरी…

Subscribe

निखालस ज्वरजहाल लिहिणारे राहत इंदौरी त्यांचा मुशायरा कसे पेश करत असतील ह्याबद्दल बर्‍याच जणांना कुतूहल होतं. त्यांची ज्वलंत, जिवंत, रसरशीत आणि खणखणीत शब्दकळा वाचल्यानंतर ती प्रत्यक्ष अंगावर घ्यायला जाणार्‍यांचा एक मोठा वर्ग त्यासाठीच जायचा. त्यांच्या तोंडून जळजळीत निखारा निघायचा, पण तोही तितक्याच ताकदीने आणि त्वेषाने. जागच्या जागी शांत, स्तब्ध राहून त्यांच्या मुखातला अंगार प्रकट होत नसे. अन्याय झालेल्याने शब्दांचे पलिते घेऊन पेटून उठावं, असा त्यांचा रचना बोलून दाखवताना नूर असे.

एका हाताच्या बोटावरच मोजण्याइतके काही कलावंत असतात, विशेषत: लेखक, गीतकार-कवी वगैरे मंडळी, जे हातचं राखून बोलत नसतात. हातचं राखून बोलणं त्यांच्या स्वभावात नसतं. राहत इंदौरी नावाचा शायर नेमका ह्या चौकटीत फिट बसणारा अवलिया होता. जे ओठात तेच पोटात, जे कागदावर तेच माइकवर अशी खास विचारसरणीसाठी विचारसरणी बाळगणारा तो शायर नव्हता. तो त्यांचा तो उसना अभिनिवेश नव्हता. ती त्यांची जन्मजात विचारसरणी होती. नाहीतर त्यांच्या लिखाणातून आणि वाणीतून तसे धगधगते शब्द बाहेर पडलेच नसते…

लश्कर भी तुम्हारा हैं,
सरदार तुम्हारा हैं,
तुम झुठ को सच लिख दो,
अखबार तुम्हारा हैं,
इस दौर में फरियादी,
जाए तो जाए कहाँ,
सरकार तुम्हारी हैं,
दरबार तुम्हारा हैं.

- Advertisement -

असं निखालस ज्वरजहाल लिहिणारे राहत इंदौरी त्यांचा मुशायरा कसे पेश करत असतील ह्याबद्दल बर्‍याच जणांना कुतूहल होतं. त्यांची ज्वलंत, जिवंत, रसरशीत आणि खणखणीत शब्दकळा वाचल्यानंतर ती प्रत्यक्ष अंगावर घ्यायला जाणार्‍यांचा एक मोठा वर्ग त्यासाठीच जायचा. त्यांच्या तोंडून जळजळीत निखारा निघायचा, पण तोही तितक्याच ताकदीने आणि त्वेषाने. जागच्या जागी शांत, स्तब्ध राहून त्यांच्या मुखातला अंगार प्रकट होत नसे. अन्याय झालेल्याने शब्दांचे पलिते घेऊन पेटून उठावं, असा त्यांचा रचना बोलून दाखवताना नूर असे.

सरहदों पर बहुत तनाव हैं क्या?
कुछ पता तो करो, चुनाव हैं क्या?
खौंफ बिखरा हैं दोनों समतों में
तिसरी समत का दबाव हैं क्या?

- Advertisement -

…अशी त्यांची शब्दरचना बोलून दाखवताना त्यात नाद असे, काही हेलकावेही असत, जिथे चिमटा काढायचा आहे तिथे एक खास खर्जातला अवरोह असे. पण असे हे राहत इंदौरी फक्त मुशायर्‍यांतच मुशाफिरी करत होते का? त्यांना सिनेमा लायनीत बुलावा आला नव्हता का?

प्रश्नाचं उत्तर हो आहे.
खद्दार, मर्डर, मुन्नाभाई एमबीबीएस, मिशन कश्मीर, इश्क, सर ह्यासारख्या सिनेमांसाठी त्यांना बुलावा आला होता. त्यांनी तो प्रांत आपल्यापुरता आजमावून पाहिला होता. त्यातली काही गाणी त्यांनी चालीवर लिहिली होती तर काही त्यांच्या शब्दांवर चाल बांधून आकाराला आली होती. ‘इश्क’मधलं ‘देखो देखो जानम हम, दिल अपना तेरे लिए लाए’ हे गाणं त्यांच्याच लेखणीतून उतरलेलं. अजय देवगण-काजोल जोडीवर चित्रित झालेलं. हिंदी सिनेमाच्या विशिष्ट पठडीतलं. नायक-नायिकांच्या प्रेमावेगात श्वास-नि:श्वास टाकणारं.

सभी का खुन शामिल हैं यहाँ की मिट्टी में,
किसी के बाप का हिंदोस्ता थोडी ही हैं

असं कुणाचीही भीडभाड न ठेवता ठणकावून विचारणार्‍या कवीचं सिनेमा लाइनीतलं ते वेगळं रूप होतं. ‘मिशन कश्मीर’मध्ये ‘बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो’ असं एक गाणं त्यांनी लिहिलं होतं, जे फार गाजलं-वाजलं नसलं तरी अनेकांच्या कानावरून गेलेलं आहे. ‘निंद चुराई मेरी, किस ने ओ सनम, तुने’ हे गाणंही त्यांच्याकडून लिहिलं गेलेलं. ही सगळी गाणी किंवा हे शब्द तद्दन व्यावसायिक सिनेमांसाठी गेलेले तितकेच तद्दन व्यावसायिक. समाजातल्या अन्याय-जोरजुलमाविरूध्द लिहिणार्‍या राहत इंदौरींचा खरंतर तो पिंडही नव्हता आणि प्रांतही नव्हता. काही काळ त्यांना बुलावा आला म्हणून ते त्या प्रांतात गेले, हिंडले-फिरले, पण रमले नाहीत, विसावले तर अजिबात नाहीत.

शब्दात नादावलेली काही माणसं, हाही एक प्रयोग आपण करूया म्हणून एखादा प्रयोग करतात तसा तो त्यांनी केला असेल, पण गड्या आपला गाव बरा म्हणत ते आपल्या मुशायर्‍याच्या तंबूत पुन्हा दाखल झाले…आणि शेवटपर्यंत त्यालाच आपल्या शब्दांचा महाल त्यांनी बनवलं. वास्तविक, उजाला नावाच्या सिनेमात शैलेन्द्रंनी जसं ‘अब कहाँ जाये हम, ये बता दे जमीं’ ह्यासारखी सामजिक जाणीवेची गीत-कविता लिहिली तशी एखादी संधी सिनेमावाल्यांनी राहत इंदौरींना द्यायला हवी होती. पण गल्ल्यावरची नजर जराही हटू न देणारी सिनेमावाली माणसं राहत इंदौरींना ओळखायला तोकडी पडली असंच आज म्हणावं लागेल!

असो, राहत इंदौरीचं सिनेमाबद्दलचं मत तसं कडवटच होतं, ते म्हणाले होते, ‘फिल्मी गाण्यांतून आज शब्द गायब होऊ लागलेत, त्याचं कारण आहे शायर आणि शायरी फिल्ममधून दूर होत चालले आहेत. आता तर ढिंगा चिकासारख्या गाण्यांना मागणी आहे. अशा गाण्यासाठी कवीची काय गरज आहे? असं गाणं कुणीही लिहू शकतो.’

राजकीय, सामजिक स्थितीविषयी राहत इंदौरींच्या मनात खंत होतीच. पण सिनेमातल्या गाण्यांविषयीही ही खंत त्यांच्या मनात होती. एका शायराची गाण्यातल्या आजच्या अभिव्यक्तीविषयी ती खंत होती. ती अखेर तशीच राहून गेली.
राहत इंदौरींना श्रध्दांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -