सावलीची सोबत

सावलीची सोबत

कोरोनाची भीती त्यालाही होती. त्याचं कुटुंब रुढार्थानं तिघांचं. तो, पत्नी आणि एक मुलगी. पत्नीचं छोटसं ब्युटीपार्लर आणि मुलगी मेडिकलची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी. स्वत:ची होईल तेवढी काळजी घेत मालकांना सांभाळायचं हे या पीएचं गेल्या 32 वर्षांचं व्रत. या पीएचा आधीचा मालकही तीन टर्मचा आमदार होता. मो. दा. जोशी त्यांचं नाव. हा सद्गृहस्थ आमदार असूनही आपल्याच कोषात जगणारा… रविवारी सकाळी रामायण, महाभारत बघणारा…चाळीत रहाणारा, कमांडर जीपमधून फिरणारा, आनंद दिघेंच्या शब्दाबाहेर विश्व माहीत नसलेला…भोळासांब…त्याचा सध्याचा मालक फक्त आमदारच नाही तर दोन खात्यांचा कॅबिनेट मंत्री, पक्षाचा ब्रॅण्ड, लोकनेता आणि रंजल्या-गांजल्यांचा ‘भाई’. म्हणूनच त्यांच्या कामाच्या वेळा विचित्र, मालकाला राजकारणातलं ‘तुफानी’ करण्याचा चस्का…मग या पीएचं काय होतं असेल? लोकांसाठी राबताना मालकांना कोरोना झाला तरं…दिव्यचं ना! हे दिव्य लिलया पेलणार्‍या माणसाचं नाव आहे प्रभाकर काळे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए असलेला प्रभाकर काळे हा गृहस्थ जितका चांगला पीए आहे त्यापेक्षा तो सद्गुणी, सद्वर्तनी आहे. म्हणजे त्याला शिव्या पडायलाच नको ना असं आपल्याला वाटेल… पण प्रत्यक्षात तसं नाहीय. पीए हा खरं तर आपल्याकडे प्रशासकीय काम करणारा, नेत्याचा राग काढण्याचा, नेत्याचा नकार लोकांपर्यंत पोहोचवणारा, वापरुन झाला की फेकून देण्याचा प्राणी. प्रभाकर काळे हा मात्र पीए म्हणून काही नोकरीला राहिलेला नाही. त्याला कुणीही एकनाथ शिंदेंकडे ‘ठेवला’ किंवा ‘लावला’ नाही. प्रभाकरचा जन्म ठाण्यातल्या विष्णूनगरचा. शिक्षणही ठाण्यातलंच.अगदी लहानपणापासून आपल्याला जमतील अशी शिवसेनेची कामं करण्याकडेच कल. त्यामुळे ‘निष्ठावंत’ हे बिरुद प्रभाकरकडे सुरुवातीपासून होतं. साहजिकच काळेंना आमदारकी आधी नगरसेवक असलेल्या मो.दा.जोशी यांचा कार्यकर्ता ते त्यांचा पीए होणं अवघड गेलं नाही. 1990 ते 2003 असे तीन टर्म आमदार असणार्‍या मोदांची गाडी चालवण्यापासून ते त्यांची डायरी आणि त्यांचा जीव सांभाळण्याची कामगिरीही काळेंना करावी लागायची. या सगळ्याची जाण मोदांच्या दुसर्‍या पिढीलाही आहे. आजसुद्धा मिलिंद-मंजिरी आपला भाऊ या रुपातच प्रभाकरकडे पाहतायत. इतकंच काय प्रभाकर यांच दर महिन्याचं मोबाईल बिल आजही मिलिंद जोशीचं भरतायत. अर्थात हीच गोष्ट शिंदे कुटुंबियांनीही जपलीय. ठाण्यात नवरात्रौत्सव आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मोसमी मांगेलाल’ असे उगवतात की काही विचारु नका. ही मंडळी नेत्यांचे कपडे अंगावर शिल्लक ठेवतात हेच नशीब. अशाच काहींनी पाच वर्षांपूर्वी काळेंनी आम्हांला देवीची वर्गणी दिली नाही अशी तक्रार मध्यरात्री कोपरीतल्या नवरात्रीच्या स्टेजवरच मंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. आधीच वेगळ्या कुठल्यातरी गोष्टीनं शिंदे भणभणले होते. ती सगळी भडास प्रभाकरवर निघाली.

काही फडतूस लोकांसाठी शिंदेनी काळेंवर सर्वांसमोर हात उगारला. त्याला स्टेजवरून ढकलून दिलं. तिथे उपस्थित खासदार विचारेंपासून सगळे सुन्न झाले. प्रभाकरच्या या अपमानानं तिथलाच नव्हे तर ठाण्यातला प्रत्येकजण दुखावला. याच मध्यरात्री काळेंनी शिंदेंना शेवटचा ‘जय-महाराष्ट्र’ केला. संवेदनशील शिंदेंना आपली चूक कळून आली होती.पण वेळ निघून गेली होती. तेव्हा लता शिंदे आजारी होत्या. त्यांनी आजारी असतानाही तडक शिवाजी दिवटेंना घेऊन काळेंचं घर गाठलं. काळे आणि त्याचं कुटुंब ‘आता राजकारणच नको’ म्हणून ठाम होतं. एका बहिणीने भावाकडे पदर पसरलाय, प्रभाकर परत चला…असं सांगून लता शिंदेंनी ही कोंडी फोडली. दुसर्‍यादिवशी हेमंत पवारांनी प्रभाकर काळेंना मलबार हिलवरच्या ‘नंदनवन’ला नेलं. आजारी असतानाही दुसर्‍या दिवशी लता शिंदेंनी कोपरीत जिथे प्रभाकरचा अपमान झाला तिथेच खोटी तक्रार करणार्‍याला बोलावलं आणि दणकून ठोकला. त्यानंतर प्रभाकरच्या 50 व्या वाढदिवशी अंतरा चौघुलेनं बनवलेली फिल्म बघून अख्खं शिंदे कुटुंब हेलावून गेलं होतं. दोन्ही कुटुंबांचे डोळे ओलावले होते. अगदी शिंदेंच्या किचनपर्यंत एरव्ही वावरणारे प्रभाकर-शिवाचे हात कोविड वार्डातही तितक्याच आपलेपणाने वावरत होते.

एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह ठरले आणि एरव्ही कशालाही न घाबरणारा हा मर्‍हाठा गडी काहीसा हलला…त्यांनी प्रभाकरला गाडीत न बसण्याच्या, आपल्या जवळ न थांबण्याच्या सूचना दिल्या. त्यावर प्रभाकरचं म्हणणं, ‘सहा महिने दिवस रात्र एकत्रच आहोत. तेव्हा काही नाही झालं. मग आता कोरोना झाल्यावर तुम्हाला एकट्याला सोडायचं का? मी आणि शिवा इथेच थांबणार. तुम्ही शांत रहा. आम्ही सगळं ठरवलंय. शिवाजी हा तर शिंदेंचा डावा हातच. तो मूळचा औरंगाबादच्या पैठणचा. त्याच्याही घरात दोन लहान नातवंडं. पण तो ही डगमगला नाही. कोरोनाच्या दिवसांत सख्खे- रक्ताचे दुरावतात-घाबरतात. पण प्रभाकर-शिवाची जोडी ठाम राहिली. आतापर्यंत राज्यात 15 मंत्र्यांना कोरोनाची लागण झालीय. पण विधानभवनाच्या गॅलरीतलाच पीए कोविड वार्डातही साहेबाची काळजी घेण्याचं बहुधा महाराष्ट्रातील हे पहिलंचं उदाहरण असेल.कारण प्रत्येकाला आपल्या जिवाचं भय वाटतंच. शिवाय मंत्री पॉझिटिव्ह झाल्यावर अनेक पीएही क्वॉरंटाईन झाले आहेत.

पहिल्या टर्मला प्रभाकर काळे या पीएचा सरकारी पगार होता महिना 1450/- आता तो 25 हजाराच्या घरात गेला असला तरी ही जबाबदारी पेलताना जितके तास आणि मनस्ताप झेलावा लागतो ते पाहिलं की काळेंचं अग्निदिव्य समजतं. जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी काळेंना नावा-गावानिशी माहिती आहेत. त्यातले जे ‘धंदेवाईक’ आहेत ते त्यांना शिव्या घालतात. त्यांची तक्रार एकच हा शिंदे साहेबांना फोन देत नाही. आम्हांला भाईंशी बोलू देत नाही’. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा ‘प्रभाकर, शिंदें साहेबांना तुमचा फोन देत नाही तेव्हा त्यांना तुमचा फोन नको असतो’ त्या क्षणाला येथे घडलेली घटना आणि आपल्या साहेबाचा मूड याची योग्य कल्पना असलेला पीए म्हणजे प्रभाकर काळे.

प्रभाकर काळे मूळचे पुण्यातल्या घोडेगांवचे. त्यांचा जन्म,बालपण, शिक्षण सबकुछ ठाण्यातच. एकनाथ शिंदे साहेबांना आम्हीच सांगितलं तुला ठेवून घ्यायला वगैरे. पण गंमतीचा भाग म्हणजे ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेते असतानाच एकनाथ शिंदे यांनी काळेंना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली होती. पण तेव्हा ते मोदा जोशींचे पीए होते. त्यानंतर डिसेंबर 2003 ला मो.दा.जोशी आजारपणामुळे गेले. आणि ठाण्याचा राजकीय खेळच पालटला. 11 महिन्यात निवडणुका लागल्या आणि एकनाथ शिंदे आमदार झाले. त्यानंतर काळे आमदार शिंदे यांचे पीए झाले आणि आता तर राज्यातल्या एका ताकदवान नेत्याची सावलीच झालेत.

23 सप्टेंबरला एकनाथ शिंदे यांना संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याआधी दोन तीन दिवस त्यांना त्रास जाणवत होता. कल्याणचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अंत्यदर्शनाहून परतल्यानंतर त्यांना अधिक त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांचा खासदार चिरंजीव डॉ.श्रीकांत दिल्लीत होता. त्याला कळवलं. रिपोर्ट आल्याबरोबर ज्युपिटरमधल्या उमेशने धावपळ करत दाखल होण्याची सगळी व्यवस्था केली. आता प्रश्न तिथे राहण्याचा. शिवा आणि प्रभाकरने ती जबाबदारी स्वीकारली. खरं तरं ती या दोघांसाठीही कसोटी होती. कारण शिवाजी दिवटेंच्या घरी तर दोन लहान नातवंडं. प्रभाकरनी पत्नी सौ.सुचिता आणि ऋतुजाला गुहागरला जायच्या सूचना दिल्या. ते नको तर स्वत: हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय ठेवला. पण त्याला दोघींचाही ठाम नकार. जे काही होईल ते तिघांचं एकत्रच. अर्थात सगळी सावधानता बाळगूनच… सकाळपासून दुपारपर्यंत शिवाने थांबायचं दुपार ते मध्यरात्रीपर्यंत प्रभाकरनं. औषधपाण्यापासून ते खाण्यापिण्याचं काय हवं नको ते बघायचं, डॉक्टरांशी बोलायचं. 12 दिवसातल्या शेवटच्या तीन दिवसांत शिंदेंनी कामकाजही सुरू केलं. दुसर्‍यादिवशी ठाण्यात परतलेला मुलगा डॉ.श्रीकांत यांनी आपली जबाबदारी पार पाडली तरी प्रभाकर-शिवाच्या मेहनतीला तोड नाहीय.

या सगळ्यानंतर प्रभाकर काळे काय मिळवेल माहीत नाही. इतर पीए जसं बाहेरच्या बाहेर जी वाजवावाजवी करतात हा प्रभाकरचा कधीच उद्योग नाही किंवा स्वभावही नाही. त्याचं एकही प्रकरण अजून तरी चर्चेत सोडा पण नजरेतही नाही. त्याच्यासमोर अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुतलेत. साहेबाचा गंडा बांधून फ्लॅट, गाड्या, फार्महाऊसेस, टेंडर, यातून करोडो कमावलेत. प्रभाकर काळेंच्या विष्णू नगरातील घराचा पालिकेतला तिढा अजून सुटलेला नाही. ठाण्यातली गंगा आधी दिघेंची होती आता शिंदेची आहे. काहींचं म्हणणं आहे सेनेची ही गंगा मैली झालीय…पण जोपर्यंत प्रभाकर-शिवा किंवा हेमंत पवार, विलास जोशींसारखी मंडळी आहेत तोपर्यंत या गंगेचं पावित्र्य टिकून आहे. शिंदेशाहीची निशाणं सर्वदूर फडकताना जिवाची बाजी लावणार्‍या या निष्ठावंतांना लक्षात ठेवलं जावं ह्याच कोरोनानंतरच्या शुभेच्छा!