Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर फिचर्स सप्तसुरांकित आरोग्यासाठी

सप्तसुरांकित आरोग्यासाठी

गाणं गाण्यामुळे तुमच्या फुफ्फुसाचं आणि हृदयाचं आरोग्यही व्यवस्थित राहतं, गाण्यामुळे म्हणजे गाणं गाण्यामुळे त्यातले शब्द, त्यातल्या शब्दांचे चढउतार, त्या शब्दातल्या जागा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात, त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे तुम्ही दररोज गात राहिल्यास अल्झायमरसारख्या आजाराची बाधा तुम्हाला होऊ शकत नाही, गाण्यामुळे तुम्हाला जगण्याच्या वाटेवर काही काळानंतर येणारा एकटेपणा वाटत नाही.

Mumbai

ठाण्यातले एक युरॉलॉजिस्ट डॉ. अजय कणबूर यांच्या दवाखान्यातली एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी. ते दवाखान्यात आले की सगळ्यात आधी एक गोष्ट करतात. त्यांच्याकडल्या जुन्या रेकॉर्ड प्लेअरवर (हो, ते ध्वनीमुद्रिका जाऊन त्यांनतर कॅसेटचा जमाना आला आणि तोही जाऊन व्हाया सीडी पेन ड्राइव्हचा जमाना आला तरी रेकॉर्ड प्लेअरचाच वापर करतात!) मराठी भावगीतं किंवा मदनमोहनच्या संगीतातली हृदयाला स्पर्श करणारी, पण मनाला निखळ आनंद देणारी, प्रसन्नता देणारी गाणी अतिशय मंद स्वरात लावतात…आणि त्यानंतरच त्यांच्याकडे आलेल्या पेशंटना आत येण्याची मुभा देतात, मगच त्यांना तपासतात.

गंमत याची वाटते की पेशंट त्यांना आपल्या आरोग्याबाबतच्या तक्रारी सांगत असतात, ते त्या कान देऊन ऐकत असतात, पेशंटना तपासत असतात, पेशंट्सनी पॅथॉलॉजीमधून आणलेले रिपोर्ट्स पहात असतात आणि त्या आजारावर उपचार म्हणून प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान त्यांच्या त्या रूममध्ये एक गाणं दरवळत असतं, वेलीवरची जुई मंद दरवळावी तसं ते गाणं दरवळतं. गाण्याचे शब्द साधारण असेच असतात, म्हणजे ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं’ किंवा ‘सावर रे, सावर रे उंच उंच झुला’ वगैरेसारखे. पण ते मंद सूर ऐकून त्यांच्याकडे येणार्‍या तशाच एखाद्या रसिक रुग्णाच्या मनावरचा ताणतणाव थोडा तरी हलका होतो किंवा एखादा तसाच रसिक नसला तरी आरोग्याची व्यथा घेऊन आलेल्या त्या रूग्णाला ते मंद संगीत कानावर पडता पडता थोडा तरी दिलासा मिळतो. तो डॉक्टरांकडे येताना घेऊन आलेल्या त्याच्या दुखण्याचं ओझं त्यामुळे कणभर तरी कमी झालेलं असतं.

….तर आज हे सर्व सांगताना, मूळ प्रश्न असा आहे की संगीत हे मनावरचं ओझं खरोखरच कमी करतं का?

या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असण्याची शक्यता दुरान्वयानेही नाही. कारण औषध हा शारीरिक दुखण्याचा आधार असला तरी संगीत ही मनाला आधार देणारी गोष्ट असते. आजच्या टेक्नॉलॉजिकल जगातली सकाळी सकाळी जॉगिंगला जाणारी माणसं पहा. त्यांच्या जॉगिंगच्या पॅन्टच्या खिशात मोबाइल असतो, पण त्या मोबाइलची लांबसडक वायर त्यांच्या कानाला लागलेली असते आणि ते त्यातून त्यांना हवी असलेली मंदधुंद गाणी ऐकत असतात. त्या गाण्यातून त्यांना त्यांच्या जॉगिंगसाठी हवं असलेलं चैतन्य मिळतं. बर्‍याचशा बागबगिचांच्या ठिकाणी लोक जॉगिंगला येतात म्हणून आधीच स्पीकर्सची व्यवस्था केली जाते आणि त्यातून सकाळच्या प्रहराला साजेशी गाणी लावली जातात. त्याचा मूळ हेतू हाच असतो की आपल्या आयुष्यातला किंवा मनातला एक रिक्त अवकाश संगीतामुळे भरून जावा आणि सकाळच्या वातावरणातली माणसाच्या मनातली टवटवी संगीतामुळे द्विगुणित व्हावी.

संगीतकार ओ. पी. नय्यर म्हणायचे, ‘जो दररोज जी जान लगा के गाणं गाईल, दिल लगा के रोज रोज गाणं ऐकेल त्याचं आयुष्य वाढेल, त्याचं तारूण्य टिकेल.’

ओ. पी. नय्यर यांचं म्हणणं असायचं, ‘गाणं गाताना किंवा गाणं ऐकताना आपण आपलं वयोमान आणि देहभान विसरून जातो. गाणं हे सर्वप्रथम आपल्याला विसरायला लावतं ते आपला अहंकार. अहंकार आपल्या मनातलं एक प्रकारचं जहर असतं. आपल्या मनातला हा जहराचा अंश निघून गेला की आपल्याला आयुष्यातला सारांश कळतो. ज्याला गाण्यावर प्रेम करावंसं वाटतं, ज्याचं गाण्यावर प्रेम असतं त्याला त्याचं वय झाल्यावरसुध्दा वयात आल्यासारखं वाटतं. गाणं हे त्याच्या शरीराला सुख आणि आत्म्याला आनंद देतं.’

ओ. पी. नय्यर हे असं जेव्हा तत्वज्ञानपर बोलू लागले होते तेव्हा एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी की नंतर नंतर ते होमिओपॅथ बनले होते. होमिओपॅथीची औषधं देऊ लागले होते.

संगीत हे मल्हार राग आळवून पाऊस पाडू शकतं, दीप राग गाऊन दिवे प्रकाशमान करू शकतं ही आपल्या पुराणकथांत वर्णन केली गेलेली संगीताची शक्ती आणि महती आहे. पण त्याही पलिकडे रक्तदाब वाढलेल्या माणसाने औषधांचं श्रवण करण्यापेक्षा गंधमधूर संगीताचं श्रवण केलं तर त्याचा रक्तदाब हळुहळू पुर्ववत होऊ शकतो असं ओ.पी. नय्यर यांचं निरीक्षण होतं.

मला आठवतंय, ओ.पी. नय्यर यांच्या म्हणण्याला तेव्हा माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरांनीही दुजोरा दिला होता, ते म्हणाले होते, जेव्हा तुम्ही गाणं गाता तेव्हा तुम्ही खोलवर श्वास घेता आणि त्यामुळे हवेतला ऑक्सिजन तुमच्या शरीरात पोहोचून तुमचं रक्ताभिसरण सुरळित होतं, अगदी तुम्ही रस्त्यावरून एकटे जाताना गाणं गात नसला तरी गुणगुणत जा, तुम्हाला एका गाण्याची नव्हे तर सात सुरांची सोबत आहे याची अनुभूती मिळते, ज्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरचे ताठरलेले स्नायू सैलावतात, तुमच्या चेहर्‍यावरची त्वचा घोटीव होते, गाता गाता तुमचा घसा मोकळा होतो, नुसत्या बोलण्यापेक्षा गाण्यामुळे तुमच्या घशाला एक प्रकारचा व्यायाम मिळतो, तुम्हाला झोपेत घोरण्याची सवय असेल तर ते घोरणं आधी कमी कमी होत जातं आणि एके दिवशी बंद ंहोतं, गाणं गाण्यामुळे तुमच्या फुफ्फुसाचं आणि हृदयाचं आरोग्यही व्यवस्थित राहतं, गाण्यामुळे म्हणजे गाणं गाण्यामुळे त्यातले शब्द, त्यातल्या शब्दांचे चढउतार, त्या शब्दातल्या जागा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात, त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे तुम्ही दररोज गात राहिल्यास अल्झायमरसारख्या आजाराची बाधा तुम्हाला होऊ शकत नाही, गाण्यामुळे तुम्हाला जगण्याच्या वाटेवर काही काळानंतर येणारा एकटेपणा वाटत नाही, उदासीची छाया गडद होत नाही, भपकेबाज ठेक्यावरची गाणी गाताना ह्रदयाचे ठोके व्यवस्थित पडतात, तुमच्यातला आत्मविश्वास वाढवतात, दर आठवड्याला एक नवीन गाणं शिका आणि गा, तुम्हाला नवेकोरे कपडे घातल्याचा आनंद मिळेल!

त्या डॉक्टरांनी इतकी सगळी माहिती मला खास वेळ काढून दिल्यानंतर मी त्यांना विचारलं, तुम्ही रोज गाणं गाता का?
डॉक्टर म्हणाले, मला गाणं शिकायला घरातून विरोध झाला, पण मी गाणं शिकलो, गाण्यासोबत शंकर-जयकिशनला आवडणारं अ‍ॅकॉर्डियन शिकलो, त्यामुळे शॉवरखाली रोज गाणं गातोच, पण दवाखान्यात येतानाही गाणं गात गातच येतो. मी अठ्ठ्याहत्तर वर्षांचा तरूण आहे!