घरफिचर्सआत्महत्येला समजून घेताना...

आत्महत्येला समजून घेताना…

Subscribe

धन-दौलत, सेलिब्रिटी स्टेटस, सौंदर्य, भरपूर मित्र-मैत्रिणी इतकं सारं जवळ असताना सुशांत राजपूतने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णयच घेतला नाही तर गळ्याला फास अडकवून स्वतःला संपवून घेतलं. असं का झालं? त्याच्याकडे काय कमी होतं? मैत्रिणीशी दुरावा निर्माण झाला म्हणून हे जीवघेणं पाऊल उचललं का? पिक्चर मिळणे कमी झालेत म्हणून असं वागावं का?, बॉलिवूडमधील तथाकथित गटाने त्याला एकटे पाडले म्हणून हे झालं असावं? व्यसनांच्या आहारी गेला म्हणून तर सुशांतनं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नसेल? हे आणि असे असंख्य प्रश्न उपस्थित केले गेले. प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ काढत आत्महत्येची कारणमीमांसा केली. पण सुशांतने नव्हे तर त्याच्यातील आजारपणाने आत्महत्या केली हे मान्य करायला कुणी तयार झाले नाही, ही खेदाची बाब...

आत्महत्या करणे पाप आहे, आत्महत्या करणे म्हणजे पळपुटेपणा, भ्याडपणाचे आहे, काय कमी होत त्याच्याकडे, संपत्ती, गाडी, बंगला ऐषाराम सगळं होतं. कोणीही, त्यातल्या-त्यात प्रसिद्ध व्यक्तीने केलेल्या आत्महत्येनंतर जनसामान्यांच्या अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यपणे ऐकू येतात. त्या ऐकल्यानंतर एक प्रकर्षाने लक्षात येते की, खरोखर मन, मानसशास्त्र, मानवी मेंदू, डिप्रेशन एकूणातच मानसिक आरोग्य याबाबत आपणा सर्वांची समज खूप कमी आहे आणि ती वाढली पाहिजे अशी अपेक्षा. आत्महत्या हा खरेतर कोणाचाही आवडीचा पर्याय नाही, इतर कोणताही पर्याय न दिसता तो निवडावा लागणे ही किती गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असू शकेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे, किंवा माणूस हौस म्हणून आत्महत्या करत नसतो, तर ती केली जात असते निराशेने, मानसिक आजाराने.

जसे इरफान खान कॅन्सरने गेला तसेच सुशांत हा मानसिक अस्वास्थ्याने गेला. जेव्हा आपण त्यामागची कारणे शोधायला लागतो, तेव्हा पहिला विचार मनात येतो तो म्हणजे त्याला काय कमी होते ? खरंच नेमका कोणत्या अभावाचा प्रभाव माणसाला जीवन नाकारून मृत्यूला स्वीकारायला भाग पडत असेल ? प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी तसेच प्रत्येकाला जाणवणारा, अनुभवास येणार अभाव वेगवेगळा आणि त्याच अभावाचा टोचर्‍या जाणिवेमुळे असहाय आणि असह्य अशा विफल मनोवस्थेत माणूस ही टोकाची कृती करतो. त्यावेळी मेंदूच्या रसायनांचा असा काही न आवरता येण्यासारखा पसारा झालेला असतो त्यापुढे, त्याने एकदातरी विचार करायला हवा होता, आई वडील किंवा मुलांकडे पाहून तरी असे करायला नको होते, इतकेच नव्हे तर, अध्यात्म, तत्वज्ञान हे सगळे फिके पडते.

- Advertisement -

खूपदा मनात विचार येतो की, आत्महत्या करणार्‍या व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याच्या क्षणी नेमके कुठले विचार असतील ? तो क्षण नेमका कसा असेल त्या व्यक्तीसाठी? त्या क्षणाला नेमका स्वतः बद्दल काय विचार असेल ? ज्याही पद्धतीने त्या व्यक्तीने मरण स्वीकारायचं ठरवलं असेल त्या वेदना, ती तडफड जीवन जगण्यापेक्षा सहनीय आणि सोप्पी होत असेल का? खरंच मरण इतकं सोप्प का होतं? आणि जगणं इतकं अवघड ? माझ्या 18 वर्षाच्या मनोविकास तज्ञ म्हणून काम करण्याच्या अनुभवात माझ्यापर्यंत पोहोचलेल्या 70 टक्के क्लायंट त्यांच्या आयुष्यात कधीना कधी स्वत:ला संपवून टाकावं असे विचार येऊन गेलेले असतात. पण त्यातले बरेचसे मंडळी स्वत:च्या स्वतः त्या विचारांना झटकून टाकतात. मरणाच्या पर्यायाचे दार बंद करतात. कधी भीतीने ( डेरिंग होत नाही म्हणून ) तर कधी हा उपाय नाही असा त्यावेळेपुरता समंजस विचार करून ते समुपदेशकापर्यंत पोहोचलेले असतात. पण जे जीवनातील कोणत्या न कोणत्या समस्येमुळे, आलेल्या अपयशामुळे इतके खचून जातात की, स्वत:ला त्या समस्या किंवा अपयशापुढे खूप छोटे समजतात म्हणजेच समस्येला स्वतःपेक्षा कितीतरी मोठे समजतात. कुठून आणि कसा येत असेल हा विचार ?

विचार माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करणारा मोठा घटक. ज्या विचारांमुळेच माणसाला जगण्याची ऊर्जा मिळू शकते, जीवनातील समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग मिळू शकतात, स्वतःला विकसित आणि उन्नत बनवू शकतात. तेच विचार माणसाला इतकं धैर्य कसे देऊ शकतात की, कुणी झोपेच्या औषधांची अख्खी बाटली संपवतात, फासाला लटकून पायाखालची खुर्ची ढकलून देतात किंवा उंच इमारतीवरून, रेल्वेखाली स्वतःला ढकलून देतात.

- Advertisement -

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात आत्महत्येतून वाचलेल्या लोकांच्या मुलाखतीतून किंवा मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्यांच्या अभ्यासातून आत्महत्येच्या मागची कारणं शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात उदासी एकटेपणा, वेदना, नात्यांमधील अपयश, आर्थिक विवंचना, सामाजिक बहिष्कार, अपयश त्यातून आलेलं समाजभय किंवा लोकलज्जा, मानसिक आजार, व्यसन अशी अनेक कारणं सांगितलेली आहेत. आणि आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या मनातील मध्यवर्ती भाव असे असतात की, माझी समस्या माझ्या मृत्यूनंतर संपून जाईल म्हणजे खरंतर त्या समस्येची जाणीव माझ्यासाठी संपून जाईल. याचाच अर्थ त्या समस्येपेक्षा समस्येची जाणीव वेदनादायी असते. मग ही आपल्यासाठीची एक व्यक्तिगत अनुभूती असते ही अनुभूती आपल्याला कोण देत असते? तर आपला स्वतःचा दृष्टिकोन, सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहण्याचा आणि सर्वात मूलभूत म्हणजे स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोन.

कसा आणि कधीपर्यंत हा दृष्टिकोन तयार होतो? साधारण वयाच्या तिसर्‍या वर्षापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत जसे व्यक्तिमत्व बनत जाते त्या प्रत्येक टप्प्यावर दृष्टिकोन बनत आणि दृढ होत जातो आणि हा दृष्टिकोन आपल्याला स्वतःविषयी आणि परिस्थिती विषयीचा सुखद किंवा दुःखद अनुभूती देत असतो. आणि हीच अनुभूती माणसाला जगायला शिकवणार असते किंवा आत्महत्येच्या विचारांनी मरायला शिकवणार असते. आणि हा स्वतःकडे बघायचा सकारात्मक दृष्टिकोन, स्व-प्रतिमा, आत्मप्रतिष्ठा, या सारख्या आत्यंतिक आवश्यक प्रक्रिया शिकण्याकरिता दुर्दैवाने आपल्या कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक, रचनेत कोणतीही यंत्रणा आज उपलब्ध नाही. त्यामुळे जीवनकौशल्य शिकण्याची अत्यंत महत्वपूर्ण गरज आपण सगळ्यांनी ओळखली पाहिजे. आत्महत्या रोखण्याकरिता एकमेकांशी असणारा संवाद जितका महत्वाचा तितकाच स्वतःशी असणारा संवाद महत्वाचा या संवादाची कला आणि शास्त्र सर्वपातळ्यांवरून शिकविणे अत्यंत महत्वाचे आहेत. समस्यानिराकरण, निर्णयक्षमता, ताणतणाव निवारण या जीवन कौशल्यांबरोबर स्व-प्रतिमा आणि आत्मप्रतिष्ठा या संकल्पना शिकवण, त्याचा विचार करणे परवलीचे होणे आवश्यक आहे. ज्यामुळे जगणं अवघड होऊन मरण सोप्प होण्याच्या मानसिकतेत आपण बदल घडवून आणू शकतो.

हे सारे अशा उदासीच्या टोकाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या आधी निकोप मानसिकता तयार होणे तसेच आत्महत्या प्रतिबंध यासाठी प्रोऍक्टिव्ह बनून होणे गरजेचे आहे.

परंतु मानसिक स्वास्थ्य जेव्हा बिघडते तेव्हा शरीर जसे आजारी पडते तसेच मनदेखील आजारी पडते, हे वास्तव आता आपण सगळ्यांनी डोळसपणे स्वीकारले पाहिजे आणि शरीराचे दुखणे जसे अंगावर न काढता आपण डॉक्टरकडे जातो तसेच, मन आजारी पडले की, मानसोपचार तज्ज्ञ, मनोचिकित्सक, तज्ज्ञ समुपदेशक यांच्याकडे जाणे गरजेचे आहे व मदत किंवा उपचार घेणे गरजेचे आहे.

कारण गोष्ट जेव्हा मानसिक आजाराची येते त्यावेळेस, मैत्री, मित्र, मोकळे बोलणे, जे बोलले जाते ते ऐकून घेणे हे सहसा पुरेसे ठरत नाही, आत्महत्येच्या घटनांनंतर, मित्रांनो बोलत जा, मित्रांना वेळ द्या, मित्रांचे ऐकून घ्या, अशा आशयाचे मेसेज मुबलक प्रमाणात फिरतात, पण मानसशास्त्र या विषयातील सगळ्यात अवघड गोष्ट आहे, ऐकून घेणे, ऐकून घेताना तटस्थतेबरोबर एम्पथेटिक लिसनिंग होणे गरजेचे आहे. ऐकताना नॉन जजमेंटल राहून, भावनांना ऐकून घेणे, आणि त्याला दाद देऊन बोलणार्‍याचे आरसा बनणे हे कौशल्यपूर्ण आणि शिकल्यानंतर, अनुभवाने येणारे ज्ञान आहे. नुसते वेळ द्या, ऐकून घ्या (आणि मग सल्ले द्या) इतके सहज आणि सोप्पे नसते हे लक्षात घ्यायला हवे, जीवनात, नातेसंबंध, जिव्हाळा, प्रेम, बोलायला आपली माणसे आवश्यक आहेत, पण उपचारार्थ बोलणे हे याच्यापेक्षा वेगळे आहे हे लक्षात घ्यायला हवे. आणि प्रोफेशनल्सची मदत घेणे किंवा आपल्या परिचितांमध्ये कोणाला गरज असेल तर त्याला अशी मदत घ्यायला प्रवृत्त करणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रत्येकाने मानले पाहिजे.

Su assimiliación es inmediata, la medicina para la Disfunción Eréctil no puede ser utilizada por mujeres o luchar contra las desigualdades y para esto pueden existir diferentes razones. Si bien es cierto que pueden ayudarte a tratar una enfermedad determinada y esta enfermedad requiere que la insulina sea administrada de forma correcta.

आत्महत्या करणारा माणूस, मग तो गरीब असो, तो शेतकरी असो, श्रीमंत असो, किंवा चंदेरी दुनियेतील एखादा स्टार असो, आत्महत्या ही दुर्दैवी आणि वाईटच, प्रत्येकाकडे भौतिकदृष्ठ्या काही असते काही नसते पण मानसिक पातळीवर मात्र एक समान धागा सगळ्यांमध्ये दिसतो. आशा भोसलेंची मुलगी वर्षा भोसले, कर्तबगार पोलीस अधिकारी हिमांशू रॉय, अध्यात्म क्षेत्रातील भैयू महाराज आणि कर्जबाजारी झालेला परिस्थितीने हरलेला शेतकरी, हे सारेच कोणत्या न कोणत्या अभावाला बळी गेलेले, पण समान मासिकतेतून आत्महत्येसारख्या समान क्षणाला जवळ केलेले, हे सारे चटका देणारे आहे. त्यातच सुशांतसारख्या चंदेरी दुनियेतील आदर्शवत वाटणार्‍या अभिनेत्याला त्याच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा स्वतःशी रिलेट करण्याच्या मानवी सहज स्वभावाने जास्त हळहळ समाजमाध्यमातून व्यक्त होताना दिसते. तरी आत्महत्या केलेल्या माणसाला समजून घेणे हे आपल्या पुढचे एक आव्हान आहे आणि मानसिक आरोग्य याबाबत अधिक सजग, गंभीर आणि सक्रिय, सुशिक्षित होण्यासाठीचा अलार्म आहे, असे म्हणायला हरकत नाही.

– अमोल कुलकर्णी, मनोविकार तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -