घरमहाराष्ट्रगाडी जाते कशी घाटातून...दर्‍याखोर्‍यांच्या वाटेतून

गाडी जाते कशी घाटातून…दर्‍याखोर्‍यांच्या वाटेतून

Subscribe

ब्रिटिशांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा फोडून बोरघाट बांधला आणि मुंबई- पुणे शहराला जोडले.ओबडधोबड डोंगरांच्या, जीवघेणे चढउतार असलेल्या बोरघाटातून रेल्वे मार्ग काढणे फार कठीण होते. या बोरघाटामध्ये कधी सोसाट्याचा वारा, कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी, तर कधी अंग भाजून काढणारे रणरणते ऊन असते. त्यात जंगली श्वापदांचा वावर, सततचे पाण्याचे दुर्भिक्ष्य,अशा बिकट परिस्थितीत एकीकडे उंच डोंगर आणि दुसरीकडे खोल दरी कसलाही रस्ता नाही. पर्वतरांगा फोडून हा मार्ग तयार करण्यात आला होता. या सर्व कामात अनेक कामांत अनेक कामगारांनी आपला जीव गमावला. रेल्वेने 1858 ते 1863 या अल्पावधीत अत्यंत कठीण अशा बोरघाटातून दुहेरी लोहमार्ग बांधला होता. त्यानंतर भारतीय रेल्वेने 1982 मध्ये मंकीहिल ते जांबरुंग दरम्यान तिसरा लोहमार्ग बांधण्यात आला. त्यामुळे मोठ्या जलदगतीने मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक होऊ लागली. मानवी कौशल्य आणि अभियांत्रिकीच्या अत्युच्च आविष्कारामुळे मध्य रेल्वे सुरक्षित रेल्वे गाड्या चालवत आहेत. आपली सेवा अहोरात्र प्रवाशांना देत आहे.

बोरघाटाचा इतिहास

मुंबई पूर्वी कापड गिरण्यांसाठी ओळखली जायची. त्यामुळे मुंबईतील कापड गिरण्यांना ठरलेल्या वेळेत कापसाचा पुरवठा व्हावा यासाठी इंग्लंडच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने,सैनिकांच्या देखरेखित बोरघाटातून रेल्वे मार्ग टाकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा घाटातून रेल्वे मार्ग टाकण्याची महत्वाकांक्षी योजना 1856 मध्ये आखली होती. हा मार्ग 1863 साली पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे मुंबई- पुणे रेल्वे मार्गाने प्रवास होऊ लागला. मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचा एक महत्वाचा सह्याद्रीच्या डोंगररांगेमधील बोरघाट व्यग्र लोहमार्ग आहे. त्यामुळे पुण्यापासून दोनपदरी (दोन लाईन) असणारा हा लोहमार्ग लोणावळा रेल्वे स्थानकाच्या पुढे तीन पदरी (ट्रिपल लाईन) होतो. लोणावळा रेल्वे स्टेशन ते मंकीहिलपर्यंत या तिन्ही रेल्वे मार्गांवर एकमेकांना खेटून समांतर धावतात. डाऊन आणि मिडल लाईन ही ब्रिटाशांनी बांधली होती. तेव्हा 30 मार्च 1863 रोजी या घाटातून पहिले रेल्वे इंजिन धावले होते. मानवी कौशल्य आणि अभियांत्रिकीचा अत्युच्च आविष्कारमुळे ब्रिटीशांनी हा प्रकल्प पूर्ण केला होता. त्यावेळी बोरघाटातून जाणारा रेल्वे मार्ग 2,027 फूट उंचीवर होता. तर त्यावेळी 25 बोगदे आणि छोटे मोठे 23 रेल्वे पूल या बोरघाटात बांधण्यात आले होते. त्यानंतर 1980 ला कर्जत लोणावळा या मार्गावर अतिरिक्त रेल्वे ट्राफिक वाढल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मध्य रेल्वेने 1980 साली मांकिहिल ते ठाकूरवाडी दरम्यान तिसरी लाईन बांधण्यात आली. या तिसर्‍या लाईनला अपलाईन म्हणतात.

बोरघाटाचे वैशिष्ठ्य

- Advertisement -

या बोरघाटातील 28 किलोमीटर रेल्वे मार्गाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. इंग्रजांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा फोडून बोरघाटात बांधला आणि मुंबईला पुणे शहरांना जोडले. मात्र, या बोरघाटातून रेल्वे मार्ग काढणे फार कठीण होते. एकीकडे उंच डोंगर आणि दुसरीकडे खोल दरीचा कोणताही रस्ता नाही. पर्वतरांगा फोडून हा मार्ग तयार करण्यात आला होता. रेल्वेने 1858 ते 1863 या अल्पावधीत अत्यंत कठीण अशा बोरघाटातून दुहेरी लोहमार्ग बांधला होता. त्यानंतर भारतीय रेल्वेने 1982 मध्ये मंकी हिल ते जांबरुंग दरम्यान तिसरा लोहमार्ग बांधण्यात आला. त्यामुळे मोठ्या जलदगतीने मुंबई पुणे रेल्वे वाहतूक होऊ लागली. मात्र घाटात रेल्वे गाड्या चालविणे मोठ्या साहसाचे आणि मोठ्या अडचणीचे काम आहे.

1 मीटर उंचीत वाढ

- Advertisement -

2,027 फूट उंचीच्या बोरघाटातून जाणारा रेल्वे मार्ग चढताना अभियांत्रिकी गणितीपद्धतीच्या वापर केला जातो. रेल्वे गाड्या बोरघाट चढत असताना प्रत्येक 37 मीटर अंतरानंतर 1 मीटर डोंगरावर रेल्वे गाडी चढत असते. या घाटातून गाड्या जात असताना गाड्यांची गती दर ताशी 30 कि.मी. असते. त्यामुळे धीम्या गतीने एक्स्प्रेस गाड्या बोरघाट पार करतात.आता घाटविभागात गाड्याची गती वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत.

बँकिंग सिस्टीम

जेव्हा कर्जत लोणावळा घाटातून रेल्वे गाड्यात जातात. तेव्हा सर्व घाट चढण्यासाठी कर्जतला रेल्वे गाडयांना तांत्रिक थांबा दिला जातो. कारण रेल्वे गाड्यांच्या मागे एक बँकिंग सिस्टीम अर्थात अतिरिक्त रेल्वेचे इंजिन जोडावे लागते. जेव्हा कर्जत लोणावळा हा 25 किलोमीटर घाट चढत असतो तेव्हा रेल्वे गाडी रोल डाऊन (मागे येत) होऊ शकते. यासाठी रेल्वेकडून घाट विभागातून गाड्या जात असताना मध्य रेल्वे ही बँकिंग सिस्टीम लावते.

35 तज्ञ लोको पायलेट

घाट विभागातून एक्स्प्रेस आणि मालगाड्या चालविण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोको पायलेटची नियुक्ती केली जाते. कारण घाट विभागात रेल्वे गाड्या चालविणे खूप सतर्कतेचे आणि साहसाचे काम आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन लोको पायलेटच्या पथकाची नेमणूक केली आहे. हे मोटरमन फक्त घाट विभागांतच आपले चोख कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या खांद्यावर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. सध्या कर्जत लोणावळा घाट विभागात 35 मोटरमनचे पथक कार्यरत आहे.

52 बोगद्यांचा बोरघाट

कर्जत- लोणावळा घाटात एकूण 8 रेल्वे स्थानके आहेत. एकूण 25 किलोमीटर रेल्वेच्या घाट मार्ग असून यात अनेक ठिकाणी रेल्वेचे तांत्रिक थांबे दिले आहे.बोरघाटांतून (बोगदे तयार करून) रेल्वे मार्ग टाकण्यात आला आहे. सध्या लहान मोठे एकूण 52 रेल्वेचे बोगदे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक लांब बोगदा 2. 4 किलोमीटरचा आहे. या बोगद्यात रेल्वेने सुरक्षेसाठी लाईट व्यवस्थेपासून ते रेल्वे रुळाची देखभाल करणार्‍या ट्रॅकमनच्या सुरक्षेसाठी खोलगट भाग सुद्धा या बोगद्यात तयार केला आहे. विशेष म्हणजे बोगद्यावर दरड कोसळून नये यासाठी ‘टनेल पोर्टल’तयार करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे बोगद्यांची सुरक्षा वाढली आहे.

बोरघाटची 2,027 फूट उंचीवर

बोरघाटामध्ये रेल्वे मार्ग 2,027 फूट उंचीवर सह्याद्रीच्या पर्वतरांगा फोडून बोरघाटात तयार करण्यात आला आहे. उंच डोंगर आणि खोल दरीदरम्यान या रेल्वेच्या गाड्या धावत असतात. पावसाळ्यात उंच डोंगरावर पावसाचे पाणी रेल्वे रुळावर येते आणि खोल दरीत जात असल्यामुळे अनेकदा रेल्वेचे नुकसान होते. रेल्वे वाहतुकीत काही काळासाठी खोळंबा सुद्धा होत असतो. त्यामुळे या डोंगरावर दरड कोसळू नये म्हणू रेल्वेचे हिल गँग तैनात करण्यात आले आहे.

पर्यायी रस्ता नसल्यामुळे समस्यांत वाढ

जेव्हा घाट विभागात रेल्वेच्या एखादे इंजिन तांत्रिक बिघाड किंवा उंच डोंगरावरून दरड कोसळली तर पर्यायी रस्ता नसतो. त्यामुळे रेल्वे मार्गानेच रेल्वेला अभियांत्रिकी पथक आणि कर्मचार्‍यांना घटना स्थळी धाव जावे लागते. विशेषत: काही पूल बांधण्यासाठी रेल्वेला मटेरियल पाठवायचे असेल तर ते सुद्धा रेल्वे मार्गाने पाठवावे लागते. त्यामुळे घाट विभागात रेल्वे सुरळीत सुरू ठेवणे हे खूप शर्तीचे काम आहेत. त्यासाठी मोठे कष्ट मध्य रेल्वेला घ्यावे लागत आहेत.

सुरक्षेसाठी उपाययोजना

घाट विभागाच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या ज्या 25 किलोमीटर घाट मार्गावर 24 तास पेट्रोलिंग सतत सुरू असते. या पेट्रोलिंग टीममध्ये विशेषत: रेल्वेचे अनुभवी ट्रॅकमन कार्यरत आहेत आणि रात्र न दिवस टप्प्याटप्प्याने रेल्वे मार्गाची पाहणी या कर्मचार्‍यांकडून केली जाते.त्यासाठी पेट्रोलिंगच्या प्रत्येक युनिटला मध्य रेल्वेकडून काही अंतर निश्चित करून देण्यात आलेल्या हे पेट्रोलिंग पथक राऊंडींग क्लॉक काम करत असतात. त्यांनासुद्धा या गाठ विभाग काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते .तरीसुद्धा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कधी तक्रार न करता सतत काम करत असतात.त्यामुळे खाट विभागात या पेट्रोलिंग पथकांचे महत्वपूर्ण भूमिका आहे.

100 सीसीटीव्ही कॅमेरे

कर्जत लोणावळा घाट विभागात जिथे दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात अशा 19 ठिकाणी मध्य रेल्वेने 100 सीसी टीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेर्‍याच्या माध्यमातून रेल्वे घाट मार्गावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक घटना टाळण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने कर्मचार्‍यांची नेमणूक केलेली आहे. त्यांना घाटातील कॅबिनमध्ये बसून घाटातील हालचालींवर लक्ष देता येते.

बोल्डर स्कॅनिंग आणि हिलगँग

रेल्वेच्या घाट विभागात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. डोंगरावर दरड कोसळून ती रेल्वेवर किंवा रेल्वे रूळावर पडू नये,यासाठी मध्य रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वीच डोंगरावर कमकुवत झालेली दरड शोधण्यासाठी स्कॅनिंग पध्दतीच्या वापर करतात. त्यानंतर दरडेला रेल्वेचे हिल गँगचे कामगार मार्क करतात. त्यानंतर मेगा ब्लॉक घेऊन या दरडी पाडण्याचे काम केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात दरडी फार कमी प्रमाणात पडतात. मात्र, निसर्गाच्या समोर मानवी कौशल्य सुध्दा तिकीट नाही. यंदाच्या घाटात रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे दरड तर कोसळल्या इतकेच नव्हे तर रेल्वे रुळ सुध्दा वाहून गेला आहे.

रेल्वेच्या बोगद्यात लिंकी केबल

घाट विभागात नेटवर्क कमी असल्यामुळे रेल्वेच्या लोको पायलेट आणि गार्डमध्ये संभाषणास अडथळा निर्माण होत होता. हा अडथळा विशेष घाट विभागातील रेल्वे बोगद्यात निर्माण होतो. जेव्हा बोगद्यातून रेल्वे गाड्यांतील जाते. तेव्हा लोको पायलेट आणि गार्डमध्ये संपर्क होत नाही. वॉकीटॉकीसुध्दा संपर्क करता येत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे सुरक्षेच्या द़ृष्टीकोनातून फायबर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट स्टिस्टम तयार केलेल्या माइक्रोवेब टावर अर्थात लिंकी केबल रेल्वे बोगद्यात लावल्या आहेत. बोगदा क्रमांक 49 मध्ये लिंकी केबल लावण्यात आल्या आहेत. या केबलची लांबी 2150 मीटर आहे. या लिंकी केबलमुळे रेल्वेच्या सुरक्षेत वाढ झाली आहे.

घाटात ‘मंकी ट्रप’

बोरघाटात मोठया प्रमाणात माकड आहेत. या माकडांमुळे नेहमी रेल्वे मार्ग विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत जात होते. माकडे घाट विभागातील रेल्वे खांबांवर चढून ओव्हरहेड वायरवर पोहोचल्यास विद्युत पुरवठा खंडित होत असे. त्यामुळे सुमारे एक ते अडीच तास रेल्वे मार्गाचा खोळंबा होत असे. इतकच नव्हेतर घाट विभागात रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यास अनेक माकडांच्या प्राण गेले आहे. यावर रेल्वे प्रशासनाने खांबावर लोखंडी खिळे लावले. मात्र तरीदेखील माकडांचा सुळसुळाट सुरू होता. त्यानंतर प्रशासनाने खांबांवर ‘मंकी ट्रक’ लावले. स्टीलचे गोलाकार तबक खांबांवर लावले. त्यामुळे माकडांमुळे रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.त्यामुळे रेल्वे वाहतूक आता सुरक्षित झाली आहे.

घाटात केनेडियन फेन्सिंगचे कटारे

पावसाळ्यात लोणावळा ते कर्जत या मध्य रेल्वेच्या हद्दीत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात रुळावर आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांची सेवा खोळंबते. त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने परदेशाप्रमाणेकेनेडियन फेन्सिंग लावली आहेत.फेन्सिंगची उंची दोन ते तीन मीटर इतकी असून तिचा पायादेखील दोन मीटर खोल आहे. तसेच त्यांचे वजन 200 ते 300 किलो इतके आहे. दरड कोसळलीच तर केवळ माती ट्रॅकवर येईल, परंतु रुळांना नुकसान पोहचविणारे दगड मात्र जाळीवरच अडकून राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी 650 मीटर जागेत केनेडियन पद्धतीच्या पोलादी पट्टया ट्रकच्या सुरक्षेसाठी लावल्या असल्याने जर एखादा दगड ट्रकच्या दिशेने आलाच तर या पट्टयांमुळे अडकून राहून ट्रकला काहीही हानी पोहचणार नसल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा वाढली आहे.

रेल्वेच्या बोगद्यांवर ‘टनेल पोर्टल’

मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा घाट सेक्शनमध्ये यंदा दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मंकी हिल ते विठ्ठलवाडी या पट्टयात यंदा बोगद्याचा सुरुवातील रेल्वेट्रॅकवरच दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. पूर्वी जवळून कोसळणारे दगडमाती आता थेट उंच डोंगरातून 50 ते 70 मीटर उंचीवरून घरंगळत खाली ट्रॅकवर पडत होते.वारंवार दरडी कोसळणार्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने बोगद्यांसमोरच पुन्हा काँक्रीटचे छोटे बोगदे ‘टनेल पोर्टल’ बांधायला आहे.बोगद्यांसमोर आता दरड कोसळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत.

2019 बोरघाट
======================
रेल्वे मार्ग = 28 किलोमीटर
रेल्वे बोगदे = 52
रेल्वे बोगद्यांची लांबी = 14 किलो मीटर
सर्वात लांब बोगदा = 2.40 किलो मीटर
रेल्वेचे पूल= 8
दररोज पॅसेंजर,मेल एक्स्प्रेस गाड्या = 72
दररोज मालगाडी = 18
बोरघाटात एकूण = 8 रेल्वे स्टेशन्स
=======================

1863 बोरघाट
रेल्वे मार्गाच्या कामाची सुरुवात = जानेवारी 1856
पहिली रेल्वे गाडी = 23 मे 1883
रेल्वे मार्ग = 25. 5 किलोमीटर
घाटची उंची = 573 मीटर
रेल्वे बोगदे = 25
रेल्वे बोगद्यांची लांबी = 3.64 किलो मीटर
दरीवरील पूल = 8
सर्वाधिक लांब पूल = 153 मीटर
सर्वाधिक उंच पूल = 42 मीटर

उंच डोंगरावर हिल गँग

लोणावळा आणि कर्जत घाट विभागात उंचच उंच डोंगरावर हिल गँग काम करते. सध्या मध्य रेल्वेवर दोन हिल गँग आहेत. प्रत्येक गँगमध्ये 15 माणसे आहेत. सध्या या दोन हिल गँगमध्ये फक्त दहा दहा कर्मचारी आहेत. एक हिल गँग लोणावळा घाट विभागात तर दुसरी कर्जत घाट विभागात कार्यरत आहे. या हिल गँगची उभारणी इंग्रजांनीच स्थानिक लोकांमधून केली होती. कारण सह्याद्री पर्वतरांगांमधील या दुर्गम भागाची, या ओबडधोबड डोंगरांची, जीवघेण्या चढउतारांची सखोल माहिती येथील लोकांना असते. त्यामुळे इंग्रज राजवटीपासून हिल गॅँगसाठी याच परिसरातील लोकांची भरती केली जाते. पूर्वी या हिल गँगमधील कामगारांची संख्या फार मोठी होती. मात्र, दिवसेंदिवस या गँगमधील कामगारांची संख्या कमी होत आहे. रेल्वेकडून नवीन भरती करण्यात येत नाही. त्यामुळे असलेल्या लोकांवर कामाचा ताण वाढत आहे.

घाटासाठी 35 तज्ञ लोको पायलेट

घाट विभागातून एक्स्प्रेस आणि मालगाड्या चालविण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोको पायलेटची नियुक्ती केली जाते. कारण घाट विभागात रेल्वे गाड्या चालविणे खूप सतर्क आणि सहवासाचे काम आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन लोको पायलेटचे पथक नेमणूक केली आहे. हे मोटरमन फक्त घाट विभागांतच आपले चोख कर्तव्य बजावत असते. त्यांच्या खांद्यावर प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी असते. सध्या कर्जत लोणावळा घाट विभागात 35 मोटरमॅनचे पथक कार्यरत आहे.घाटातून जाणार्‍या सर्व गाड्या सुरक्षित ये-जा करण्याची यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी असते.

60 रेल्वेचे गँगमन

रेल्वेच्या लेखी या दोन्ही घाटांची नोंद थळ घाट आणि बोर घाट अशी आहे. पुण्याला रेल्वेने जाताना आबालवृद्धांच्या आकर्षणाचा विषय म्हणजे खंडाळ्याचा घाट. या घाटात पावसाळ्याच्या काळात गाडी चालवणे मोठे आव्हान असते. दरड कोसळण्याची भीती इथे नेहमीचीच असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाची, साप-विंचवाची तमा न बाळगता दोन स्थानकांमध्ये सतत गस्त घालण्याचे काम रेल्वेचे गँगमन करतात.आज कर्जत ते लोणावळा घाट विभागात जवळ 60 रेल्वेचे गँगमन आहेत. त्यांना घाटात काम करण्याचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे.

माझे वडील राजू मरोड हे हिल गँगमध्ये होते. ते निवृत्त झाल्यानंतर मी या हिल गँगमध्ये कार्यरत झालो. हे काम करत असताना सुरुवातीला मनात भीती होती, मात्र आता डोंगरावर चढण्याची सवय झाल्यामुळे भीती निघून गेली. मात्र, हिल गँगमध्ये काम करत असताना सदैव तत्पर आणि सतर्क राहावे लागते. थोडीशी चूक झाली तर जीव गमावण्याची भीती असते. त्यामुळे आम्ही सर्व सतर्क असतो. – निलेश मरोड, हिल गँग कामगार, कर्जत

घाट विभागात गँगमन गेले 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. हे काम खूप जबाबदारीचे आहे. घाट विभागात रेल्वे रुड चेक कर दररोज गस्त घालावी लागते. विशेष म्हणजे पावसाळ्यात दरड कोसळता तेव्हा आम्हाला सतर्क राहावे लागते. वेळप्रसंगी गाडीचा अपघात टाळण्यासाठी जीवावर उदार आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. – सादिक सय्यद, गँगमन

कर्जत लोणावळा घाट विभाग मध्य रेल्वेसाठी अतिसंवेदशील आहे. घाट विभागात काम करणारे रेल्वेचे अभियंता किंवा सर्वच कर्मचारी सदैव सतर्क असतात. त्यांच्या या सतर्कतेमुळे घाटात रेल्वे गाड्या सुरक्षित आणि सुरळीत चालतात. मात्र, कर्जत लोणावळा घाट विभागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. त्यामुळे रेल्वे समोर अनेक अडचणी येतात. यंदाच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी सर्व घटनांवर आणि अडचणींवर मात करत मध्य रेल्वेने गाड्या सुरळीत सुरू ठेवल्या आहेत. आता फक्त शेवटच्या टप्प्यात मंकी हिल ते नागनाथच्या दरम्यान पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते लवकरच पूर्ण करून येत्या काही दिवसांत मुंबई-पुणे तिसरी मार्गिका लवकरच सुरू होणार आहे. – शिवाजी सुतार मुख्य जनसंपर्क, मध्य रेल्वे

इतिहासात पहिल्यांदाच मोठा ब्लॉक

यंदाच्या पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील कर्जत-लोणावळा घाट विभाग मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड आणि रेल्वे मार्ग वाहून गेल्याचा घटना घडल्या आहे. त्यामुळे रेल्वेची मुंबई -पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेला तारेवरची कसरत करावी लागली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने मंकी हिल ते नागनाथ या दोन स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून तिसरी मार्गिका पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दोन टनेलमध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला रेल्वे मार्ग उभा करणे आव्हानात्मक असून, रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक दुरुस्तीचा कामासाठी घेतला असावा. सतत पडणारा पाऊस,तीव्र उतार, अत्यावश्यक सामग्री पोहोचविण्यास अडचणी अशा बाबींवर मात करून मार्गिकेचे काम सुरू आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गर्डर उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी रात्र दिवस अर्थात 24 तास येथे युद्धपातळीवर काम सुरू आहे.

10 कोटी रुपयांचा खर्च

सुमारे 150 कामगारांच्या साहाय्याने घाट भागातील काम केले जात आहे. क्रेनच्या साहाय्याने गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. 150 मीटर लांबीचा मार्ग बनविला जात आहे. 80 टन स्टील सामग्री, 350 ट्रक दगड, सुमारे 100 ट्रक सिमेंटच्या साहाय्याने गर्डर, सुरक्षा भिंत बनवली जात आहे. या सर्व कामासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून दिली गेली.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -