घरमहाराष्ट्रCoronavirus: सांगलीत महिलांनी केले पोलिसांचे संरक्षण; बनवले १० हजार कॉटनचे मास्क!

Coronavirus: सांगलीत महिलांनी केले पोलिसांचे संरक्षण; बनवले १० हजार कॉटनचे मास्क!

Subscribe

आणीबाणीच्या काळात सांगलीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या या लढवय्या पोलिसांसाठी सांगलीकर महिला पुढे सरसावल्या

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून वेळोवेळी नागरिकांना खबरदारी घेत वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क लावणे अशाप्रकारचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध लढण्यास आरोग्य यंत्रणेसह पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. आपण सुरक्षित राहावे म्हणून त्यांच्या कुंटुबापासून दूर राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे पोलीस दिवसरात्र गस्त घालत असतात. मात्र सांगलीत माणसुकी अजूनही जीवंत असल्याचे चित्र बघायला मिळाले. आणीबाणीच्या काळात सांगलीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या या लढवय्या पोलिसांसाठी सांगलीकर महिला पुढे सरसावल्या आहेत. या महिलांनी लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळत दोन लेअर असलेले कॉटनचे दहा हजार मास्क शिवून दिले आहेत.

हेही वाचा – कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने तयार केले ‘सॅनिटाझर टनल’

पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. परंतु जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे पोलीस बांधव २४ तास बंदोबस्तासाठी तैनात आहेत. भर उन्हात आपले कर्तव्य बजावत असताना तसेच स्वतःची काळजी घेताना त्यांनादेखील या मास्कचा तुटवडा जाणवू लागला होता. साधे मास्क वापरून पोलिसांना त्याची सुरक्षितता कमी आणि त्रास जास्त होत होता.

- Advertisement -

फक्त आठ दिवसात दहा हजार मास्क तयार

सांगलीतील चेकनाक्यावर साध्या रूमालाने आपले नाक, तोंड बांधून हे पोलीस आपले ड्यूटी करत होते. यावेळी सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी पोलिसांसाठी काहीतरी करायचे ठरवले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर दहा हजार मास्कची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कामात मदत लागणार याचा विचार करून श्रुती दांडेकर यांनी निलिमा वझे यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान २५ ते ३० महिलांनी या कार्याला सहकार्य करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आणि आठ दिवसात दहा हजार मास्क बनवले.

सोशल डिस्टन्सिंग पाळत केले मास्क तयार

हे काम करताना सगळ्या महिला एकत्रित जमल्या मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत १५ ते ६५ वयोगटातील या सर्व महिलांनी लॉकडाऊनच्या काळातील आपले काम सांभाळून फक्त आठ दिवसात दहा हजार मास्क तयार केले.

- Advertisement -

पुनर्वापर करता येणारे मास्क अधीक्षकांकडे सुपूर्द

हे मास्क सुरक्षित असून मास्क धुवून त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. कित्येक महिने पोलिसांना हे मास्क वापरता येणार असून हे मास्क सांगलीकर महिलांनी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -