घरअर्थजगतकोरोना Act of God, तर तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड का? आजी-माजी अर्थमंत्री...

कोरोना Act of God, तर तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड का? आजी-माजी अर्थमंत्री भिडले!

Subscribe

मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचं थैमान सुरू झालं असून तेव्हापासूनच लॉकडाऊनचं पाऊल उचलावं लागलं. या पार्श्वभूमीवर बंद पडलेले उद्योगधंदे आणि गेलेल्या नोकऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेली असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Corona हा Act of God असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. ‘कोरोनामुळे देशात आलेली महामारी जर Act of God आहे, तर कोरोना यायच्या आधी गेल्या ३ वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे अयोग्य व्यवस्थापन झालं आहे, त्याचं वर्णन तुम्ही कसं कराल? Messenger of God म्हणून आपल्या अर्थमंत्री या प्रश्नाचं उत्तर देतील का?’ असा सवाल पी. चिदंबरम यांनी केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर ट्वीट्सचा पाऊस पडत आहे.

शुक्रवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलमध्ये बैठकीनंतर निर्मला सीतारमण यांनी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. ‘कोरोना ही देवाची करणी आहे. जीएसटी गोळा करण्यावर परिणाम करणारा तो एक अदृश्य घटक ठरला आहे. ही एक अभूतपूर्व परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत थोडी मंदी पाहायला मिळत आहे’, असं सीतारमण म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांमध्ये अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या परिस्थितीत मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. या काळात अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले असून हजारोंच्या नोकऱ्या गेल्याचं दिसून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तब्बल १ लाख ७० हजार कोटींचं विशेष आर्थिक सहाय्य पॅकेज देखील जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर देखील देशाची आर्थिक स्थिती पुरेशी सुधारली नसल्याचंच दिसल्यानंतर विरोधकांनी आणि देशातील अर्थतज्ज्ञांनी या परिस्थितीवर आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. विशेषत: राज्य सरकारांना केंद्राकडून मिळायला हव्या असणाऱ्या मात्र अजूनही न मिळालेल्या जीएसटी परताव्याविषयी देखील राज्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जाताना पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -