घरफिचर्सबालशिक्षणाच्या जनक 

बालशिक्षणाच्या जनक 

Subscribe

ताराबाई मोडक (जन्म : इंदूर, १९ एप्रिल, इ.स. १८९२; मृत्यू : ३१ ऑगस्ट , इ.स. १९७३) ह्या एक मराठीभाषक आणि ‘भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या ‘मॉन्टेसरी’ म्हणतात. त्यांचा ३१ ऑगस्ट हा स्मृतिदिन. ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.


केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली (इ.स. १९०२). पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९०६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या.१९०९साली ताराबाई मॅट्रिक
झाल्या.

- Advertisement -

ताराबाई मोडक या प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १०१६साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत. प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. विवाह त्यानंतर पतीचा मृत्यू अशा घटना घडल्यावर ताराबाई सौराष्ट्रातील भावनगरला येऊन दाखल झाल्या. गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीनुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. गिजुभाई आणि ताराबाईंची भेट ऐतिहासिक होती. भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी होती. दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची (मॉन्टेसरी संघाची) स्थापना झाली. ताराबाई भावनगरला ९ वर्षे होत्या. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.

पुढील काळात मुंबईला आल्यावर त्यांनी दादरला आपल्या कल्पनांवर आधारित असे शिशुविहार सुरू केले. जसजशा या बालशाळा वाढत जातील, तसतसा त्यांना आवश्यक असणारा प्रशिक्षित शिक्षकवर्गही लागणार या विचाराने शिशुविहारमध्येच त्यांनी बाल अध्यापक विद्यालयाची मंदिराची स्थापना केली. इ.स. १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर ताराबाईंनी आपले पूर्ण लक्ष बालशिक्षणावर एकवटले. आता त्यांना त्यांच्या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे परिमाणही द्यायचे होते. कालांतराने कोसबाडला आल्यावर त्यांच्या प्रयोगांना आदिवासींच्या संदर्भांचे परिमाणही मिळाले आणि साऱ्या देशात एकमेव ठरावी अशी सर्वव्यापी बालशिक्षणाची पद्धत अस्तित्वात आली. ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -