घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहुश्श्य! नाशिक शहरात ६५० बेड्सची व्यवस्था

हुश्श्य! नाशिक शहरात ६५० बेड्सची व्यवस्था

Subscribe

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा निर्णय

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने शहरातील विविध कोरोना केंद्रांवर एकूण 650 बेडस्ची व्यवस्था केली आहे. यात मुंबई नाक्यावरील साखला मॉलच्या इमारतीत तत्काळ 300 बेडचे कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पंचवटीतल्या रसिकलाल माणिकचंद धारिवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात 100 बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी 50 बेड ऑक्सिजनचे, तर 50 बेड सर्वसामान्य असतील. दुसरीकडे बिटको रुग्णालयातही 250 ऑक्सिजन बेड वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या 12 हजारांच्या पुढे गेली आहे. महापालिकेकडे सध्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात 150 बेड, तर बिटकोत 500 बेडची उपलब्धता आहे. सोबतच समाजकल्याण भवनच्या तीन इमारतींमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय आणि बिटकोतील बेड जवळपास फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे महापालिकेने ठक्कर डोम व मेरीतील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या कोविड सेंटरपेक्षा ऑक्सिजन बेडची मागणी वाढत आहे. त्यामुळे महापालिकेची तातडीची बाब लक्षात घेता, जैन संघटनेने सांखला मॉलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचे पत्र आयुक्तांना दिले आहे. या ठिकाणी इमारत तयार असल्यामुळे केवळ बेडची उपलब्धता लागत असल्याने तातडीने या ठिकाणी तीनशे बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन बेडही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रसिकलाल माणिकचंद धारीवाल चॅरिटेबल ट्रस्टनेही पंचवटीतील 100 बेडचे रुग्णालय महापालिकेला उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी सर्व सुविधा असल्याने तातडीने हे रुग्णालय महापालिकेकडून ताब्यात घेण्यात येणार असून, इथे 50 ऑक्सिजनचे बेड, तर 50 सामान्य बेड उपलब्ध केले जाणार आहे. बिटकोत 250, पंचवटीत 50 आणि साखला मॉलमध्येही शंभरच्या आसपास ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नव्याने चारशे ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. मेरी आणि ठक्कर डोममध्येही कोविड सेंटर लवकरच कार्यान्वित केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -