घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररेमडेसिवीर काळाबाजाराचे पालघर कनेक्शन

रेमडेसिवीर काळाबाजाराचे पालघर कनेक्शन

Subscribe

मुख्य सूत्रधाराकडून ६३ बाटल्या जप्त

झटपट श्रीमंती मिळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नर्स, वॉर्डबॉय, औषध निर्मिती कंपनीतील मार्केटिंग प्रतिनिधी, हेल्पर रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात उघडकीस आले आहे. नाशिक शहर पोलिसांनी मुख्य सुत्रधारास अटक केली असून, त्याच्या ताब्यातून सुमारे १ लाख ८९ हजार रुपये किंमतीचे ६३ रेमडेसिवीरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ आरोपींकडून तब्बल ८५ रेमडेसिवीर बाटल्या जप्त केल्या आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश करत गुरुवारी (दि.१३) रात्री ११ वाजेदरम्यान के. के. वाघ कॉलजेजवळ रेमडेसिवीरची प्रत्येकी २७ हजार रुपयांना विक्री करणार्‍या तीन नर्स व सिडकोतील एका मेडिकलमध्ये काम करणार्‍या युवकाला अटक केली होती. रविवारी (दि.१६) एकाला नाशिकमधून अटक केली. त्यानंतर तिघांना विरार व वाडा येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून २० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले. रेमडेसिवीर काळाबाजाराचे कनेक्शन पालघर असल्याचे पुढे आले.

- Advertisement -

पालघरमध्ये एका औषध निर्मिती कंपनीत संशयित सिद्धेश अरुण पाटील हेल्पर म्हणून नोकरीस आहे. तो काळाबाजारात रेमडेसिवीर बाटल्यांचा पुरवठा करत असल्याचे नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल ६३ रेमडेसिवीर बाटल्या जप्त केल्या. यामध्ये विना लेबलच्या ६२ बाटल्या व एक लेबल असलेली बाटली आहे. आठजणांची बुधवारी पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी मुख्य सुत्रधार पाटीलसह त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आठजणांना न्यायालयीन कोठडी व पाटील यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अटकेतील आरोपींची नावे

मुख्य सुत्रधार सिद्धेश अरुण पाटील (रा.उमरोळी, ता.जि.पालघर), जागृती शार्दुल (रा.अहिवंतवाडी, ता. दिंडोरी), स्नेहल पगारे (रा. शांतीनगर, मनमाड) आणि श्रृती रत्नाकर उबाळे (रा. विठ्ठलनगर, कोटंमगाव, ता. येवला) व कामेश रवींद्र बच्छाव (रा. उदय कॉलनी, तोरणानगर, सिडको), रोहित मुठाळ (रा. नाशिक), महेश पाटील (रा.वसई, जि. पालघर), अभिषेक शेलार (रा.वाडा, जि.पालघर), सुनील गुप्ता (रा.विरार, जि.पालघर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

शहरात सात ठिकाणी कारवाई, १७ जणांना अटक

रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजारातील विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनी नाशिक शहरामध्ये आतापर्यंत सात ठिकाणी छापे टाकले आहेत. पंचवटीत एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मखमलाबादमध्ये एका तरुणास अटक केली. गंगापूर रोडवर खासगी रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीप्रकरणी चार संशयितांना अटक केली तर अंबडमध्ये दोघांना अटक केली. आता आडगाव पोलिसांनी नऊजणांना अटक केली आहे.

श्रीमंतीचा शॉर्टकट पडला महागात

मुख्य सुत्रधार सिद्धेश पाटील बोईसर येथील कमला लाइफ सायन्स प्रा. लि. कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीस असून, पँकिंग विभागात काम करतो. तो या कंपनीतील रेमडेसिवीरच्या बाटल्या सिप्ला कंपनीला पुरवठा करायचा. रेमडेसिवीरची वाढती मागणी लक्षात घेत त्याने कंपनीतून जसे जमेल तसे रेमडेसिवीरच्या बाटल्या चोरुन आणायचा. त्यानंतर तो घरीच लेबल लावून गरजूंना चढ्या भावाने रेमडेसिवीरची विक्री करायचा. पोलिसांनी त्याच्या उमरोळीतील राहत्या घरातून ६३ रेमडेसिवीरच्या बाटल्या जप्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -