घरमहाराष्ट्रनाशिकआरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

Subscribe

द्वारका चौकात रास्ता रोको : आरक्षण मागणी

मराठा क्रांती मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर वातावरण तापले असतांना आता मुस्लिम समाजालाही शिक्षणात आणि नोकरीत २० टक्के आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सोमवारी नाशिक जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समितीच्या वतीने द्वारका चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलावी अन्यथा संसदेला घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मुस्लिम उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर यांच्या नेतृत्वात द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे द्वारका चौकातील वाहतूक ठप्प झाली. भद्रकाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण रद्द झाले. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेले नाही. या मागणीची लढाई अनेक वर्षापासून असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सादिक पठाण, नगरसेविका समिना मेमन, नगरसेविका आशा तडवी, रईस फारुकी, अफजल शेख, मिरान पठाण, तौसिफ मन्सुरी, सोनू शेजवळ, दाऊद शेख, शब्बीर पठाण, जावेद पठाण, रुबिना खान, नुरजान शेख, समिना पठाण उपस्थित होते.

या आहेत मागण्या : 

  • मुस्लिम समाजाला २० टक्के आरक्षण द्यावे.
  • समाजातील मुलामुलींना नोकरीत आरक्षण द्यावे.
  • बार्टीच्या धर्तीवर संस्था स्थापन करावी.
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आणि रोजगार कर्ज सुरू करून निधीत वाढ करावी.
  • समाजाकरीता प्रत्येक तालुक्यात दफनभूमी करिता जागा द्यावी.
  • मॉबलिचिंगला बळी पडलेल्या मोहसीन शेख ला न्याय मिळवून द्यावा.

मुस्लिम समाजाला २० टक्के आरक्षण मिळावे याकरीता समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करून समाजाला न्याय मिळवून द्यावा. मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून प्रसंगी संसदेला घेराव घालू.

                    – हनिफ बशीर, जिल्हाध्यक्ष, मुस्लिम समाज उत्कर्ष समिती

या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. केंद्र सरकारने रदद केलेले आरक्षण पुन्हा द्यावे. या मागण्यांचा केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक विचार करून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा.

                                                           – समिना मेमन, नगरसेविका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -