घरफिचर्सबाप्पाची अवकृपा नको म्हणून...

बाप्पाची अवकृपा नको म्हणून…

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार गणेशोत्सवात चर्चेशिवाय जाचक नियम लादू पाहतंय. त्यावरून गणेशभक्तांचा प्रक्षोभ उसळला तर त्याची जबाबदारी कुणाची असेल? बाप्पाची अवकृपा टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांसोबत संवाद साधण्याची गरज आहे. तिसर्‍या लाटेबद्दल कुणाचंच एकमत नाहीय. डॉक्टर, शासकीय अधिकारी आणि संशोधन संस्था वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. दुकाने, व्यवसाय, उपनगरीय रेल्वे यांच्या बाबतीत जो गोंधळ सुरू आहे तोच गणेशोत्सवाबाबत घातला जातोय.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ या मंत्राचा अर्थ असा आहे की, ‘वक्राकार सोंडेच्या, महाकाय शरीराच्या कोट्यवधी सूर्यांचे तेज असलेल्या देवा माझ्या कार्याला विघ्नं न येता पार पडण्यासाठी आशीर्वाद दे’. ही प्रार्थना आपण विघ्नहर्त्या गणेशाला प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला करत असतो याचं कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी ज्या देवतेला साकडे घातले जाते ती देवता म्हणजेच श्री गणेश. याच श्रीगणेशाला आता हा मंत्र सरकारी बाबूंच्या उपद्व्यापांमुळे स्वतःसाठी बोलावा लागतो की काय अशी स्थिती सध्या गृहविभागाच्या एका पत्रकाने निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हाहा:कार उडाला होता. एखाद्याला कोरोना झाला तर जणू काही तो आता बरा होऊन आपल्यात पुन्हा येणारच नाही, इथपासून ते कोरोनाग्रस्तांवर सामाजिक बहिष्कारापर्यंत स्थिती गेली होती. या आजाराचा संसर्ग झाला त्या वाड्या, वस्त्या, गल्ल्या आणि इमारतीमधली लोकांची भावना खूपच असुरक्षिततेची होती. शास्त्रज्ञ, डॉक्टर, आरोग्यसेवक, शासकीय यंत्रणा आणि जनतेच्या पाठिंबा यामुळे ही महामारी आता नक्कीच आटोक्यात आलेली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर ठरली. हजारो नागरिकांना यात प्राण गमवावे लागले. या दुसर्‍या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याची बदलती स्थित्यंतरं ही नेहमीच त्रासदायक असतात. हा शास्त्रीय अभ्यासकांचा निष्कर्ष आहे, पण त्यासाठी जनजीवन ठप्प करून किंवा मानवी संवेदना थिजवून काहीच होणार नाहीये. तरीही असाच प्रयत्न कोरोनाची भीती दाखवून करण्यात येतोय. मग कधी तो उपनगरीय लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय असेल तर कधी गणेशोत्सवासाठी जाचक नियमांची चौकट बनवण्याचा असेल. सरकारी अधिकार्‍यांचा वर्षानुवर्षं मागच्या पानावरून पुढे अशाच पद्धतीने काम करण्याचा कल आपल्याला दिसून येतो. कोविड 19 मागे पडून नवा डेल्टा विषाणू आला तरी सरकारी बाबू तोच ‘कॉपी-पेस्ट’ फॉर्म्युला राबवतायत. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत तेच अनुभवायला मिळत आहे. सरकारी पातळीवरून जे घडलं ते काहीसं संतापजनक चीड आणणारं आहे. तितकंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खलनायक ठरवणारा असा शासकीय पत्रकाचा मतितार्थ आहे.

- Advertisement -

राज्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधला आणि त्यानंतर सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत गणेशोत्सवाचं स्वरूप साधेपणाचं करून महामारीवर मात मिळवण्यास सरकारला आणि प्रशासनाला मदतच केली. यंदा ३ जुलैला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या आधी म्हणजेच 29 जूनला दुपारी एक वाजता गृहविभागाने एक परिपत्रक जाहीर केलं. याच दिवशी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे लालबाग, परळ, काळाचौकी, शिवडी परिसरातील गणेशोत्सव मंडळाची बैठकही बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी मंडळांचे पदाधिकारी आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले असता अति.आयुक्त चव्हाण हे तिथं नसल्याचं सांगण्यात आलं. ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे बैठकीला गेल्याची माहिती या मंडळींना देण्यात आली. सरकारच्या किंवा पोलीस व्यवस्थेच्या समन्वयाची घडी विस्कळीत होण्याची हीच ती पहिली पायरी होती. ज्ञानेश्वर चव्हाण हे कर्तव्यदक्ष आणि सक्षम अधिकारी आहेत. मला ते व्यक्तिगतरित्या नीट माहीत असल्यामुळे त्यांनी ही गोष्ट मुद्दाम केली किंवा घडवून आणली असं मी म्हणणार नाही. पण त्यांच्याकडून अशा स्वरूपाची चूक होणं शक्य नव्हतं आणि तरीही ती झाली याचा अर्थ समन्वयाचा अभाव हे एकमेव कारण आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनाच्या बाहेर सेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. उभय कार्यकर्त्यांवर जी कलमं शिवाजी पार्क आणि माहिम पोलिसांकडून लावण्यात आलेली आहेत आणि जी कारवाई करण्यात आलेली आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. याबाबतच्या मुख्यमंत्री ठाकरेंच्या नाराजीची दखल वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांपर्यंत पोहचवण्यात आली आहे. या राड्यासाठी अजामीनपात्र कलमं लावून पोलिसांनी स्वतःला ‘सेफझोन’ मध्ये नेताना मुख्यमंत्री कसे ‘बॅडबूक’ मध्ये जातील हेच पाहिलं आहे. या प्रकरणातही स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं लक्षात आलेलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा स्वप्रसिद्धीत परमानंद शोधणारा अधिकारी जर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असेल तर गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कुणीही असले तरी त्यांना जनक्षोभाचा सामना करावाच लागेल.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा मोठ्याप्रमाणात पगडा आहे. या मंडळाच्या माध्यमातून ते कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्य करत असतात. मग कोरोना काळातील लसीकरण असू द्या किंवा रक्ताचा तुटवडा पडल्यानंतर रक्तदानाची शिबिरं असू द्या किंवा प्लाझ्मा दानासाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार हा उल्लेखनीय असतो. गणेशोत्सवासारख्या संवेदनशील वाटणार्‍या उत्सवाची परंपरा शंभर वर्षांत पहिल्यांदा खंडित झाली. त्यामागे या कार्यकर्त्यांची सरकारबाबत प्रामाणिक लोकहिताची भावना तर होतीच, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची झूल उतरवून जनमानसाशी जो संवाद साधला त्याची ती फलश्रुती होती. यंदाच्या खेपेला म्हणजेच मंगळवारी मात्र उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवणारं परिपत्रक सचिन दगडू खेडेकर या गृहविभागाच्या उपसचिवाने प्रसिद्ध केलं. त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या भागातील स्थानिक पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या कार्यालयापर्यंत पोचवण्यात आलं. मुळात सचिन खेडेकर यांची स्वतःची कारकीर्द हीच वादग्रस्त आहे. त्यांनी हे पत्रक प्रसिद्ध करताना गेल्या वर्षीच्या पत्रकाला मागच्या पानावरून पुढे चालवण्याचाच शासकीय आचरटपणा केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. घरगुती मूर्ती दोन फुटांची आणि सार्वजनिक मूर्ती चार फुटांची, पोलीस आणि महापालिका यांच्या परवानगीशिवाय उत्सव करू नये. आरती आणि भजन यांना मनाई, अशा स्वरूपाचं हे पत्रक अनेक मंडळांच्या हाती पडलं आणि त्यानंतर सोशल मीडियावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं मविआ सरकार, शरद पवार, काँग्रेस नेते यांचा खरपूस समाचार नेटकर्‍यांनी आणि गणेश भक्तांनी घ्यायला सुरुवात केली.

- Advertisement -

गेल्यावर्षीचा कोरोना त्याची तीव्रता त्या वेळंच लसीकरण, आरोग्य व्यवस्था यांच्यामध्ये सरकारने आणि लोकांनी ही खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे. covid-19 या स्वरूपात काढण्यात आलेलं हे परिपत्रक नव्या बदललेल्या विषाणूचा नवं नाव व स्वरूप याची दखल घ्यायला तयार नाही. यावरून सरकारी बाबू किती डोळ्यावर पट्टी बांधून आणि झापडं ओढून काम करतायेत हेच आपल्या लक्षात येऊ शकतं. 3 जुलैला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरकारचे प्रतिनिधी, समन्वय समिती आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक होण्याआधीच हे पत्रक गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचवून नेमकं कोणाला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला टीकेचं धनी करायचं आहे. आज इथे प्रश्न आहे गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी झूम प्रणालीद्वारे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांबरोबर संवाद साधला होता. विचारांची देवाण-घेवाण करून एक सामंजस्य करार मुख्यमंत्री आणि गणेशभक्त यांच्यात झाला होता. त्याआधी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना एकत्र आणून चर्चा करुन त्यातील मंथनाचं प्रारूप बनवून ते गृहविभागाकडे पाठवलं होतं. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं याबद्दल करावं तितकं कौतुक थोडं आहे. कारण या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांचा एकूणच विषय हा काहीसा संवेदनशील असतो. तिथल्या छोट्या वादाची ठिणगी पडून वनवा भडकायला वेळ लागत नाही. याचं प्रत्यंतर तेजुकायाचा राजा काही वर्षांपूर्वी मिरवणुकीच्या वेळी एका होर्डिंगला लागून पडल्यावर जो तणाव मुंबई शहरात निर्माण झाला होता तो मी स्वतः अनुभवलेला आहे. या अप्रिय घटनेनं प्रचंड मोठा दुःखाचा माहौल गिरणगावात निर्माण झाला होता. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः तेजूकायामध्ये धाव घेऊन या सगळ्या गणेश कार्यकर्त्यांचं सांत्वन केलं होतं. हे सगळे कार्यकर्ते काही शिवसैनिक नव्हते तर ते सर्वपक्षीय होते. आज जेव्हा ठाकरेंचं सरकार गणेशोत्सवाच्या बाबतीत चर्चेशिवाय जाचक नियम लादू पाहतंय तेव्हा प्रक्षोभ उसळला तर त्याची जबाबदारी कुणाची असेल? तिसरी लाट येईल ती मुलांना त्रासदायक ठरेल असं सांगितलं जातंय, महापालिकेच्या दुसर्‍या एका सर्वेक्षणातून 80 टक्के मुलांना कोविडची बाधा होऊन गेलीय असं सांगितलं जातं. तिसर्‍या लाटेबद्दल कुणाचंच एकमत नाहीय. डॉक्टर, शासकीय अधिकारी आणि संशोधन संस्था वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत.

आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. तरीही दुकाने, व्यवसाय, उपनगरीय रेल्वे यांच्या बाबतीत जो गोंधळ सुरू आहे तोच गणेशोत्सवाबाबत घातला जातोय. मुख्यमंत्र्यांनी जमिनीवर उतरत संवाद साधला तर ते कुणालाही शांत स्वभावामुळे आपलेसे वाटतात. लोक त्यांचं ऐकायला तयार होतात. पण तेच कुणाला तरी नकोय का? गणेशोत्सव मंडळ म्हणजे मवाल्यांचा उद्योग ही कल्पना केव्हाच मागे पडलीय. खूप मोठी तरुणाई मवालीपणा, हुल्लडबाजीला महत्व द्यायला तयार नाहीय. त्यांना बदलणारं तंत्र, टापटीपपणा, स्वच्छता आणि पारदर्शीपणा आपलासा वाटतो. मुख्यमंत्री ठाकरेंचा पक्ष आणि त्यातली सळसळती ऊर्जा कुणाला खुपतेय? म्हणून अशी संतापजनक पत्रकं आणि कारवाया केल्या जातायत. गणपती मुख्यमंत्री ठाकरेंना पावलाय म्हणूनच ते ध्यानीमनी नसताना सर्वोच्च राजकीय पदावर विराजमान झाले आहेत. त्यांनी आता यंदाच्या सार्वजनिक गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संवाद सुरू करायला हवा. तरच उभयबाजूंचं मांगल्य टिकून राहील…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -