घरताज्या घडामोडीगरज सरो अन् घोडे मरो; माथेरानमध्ये अनेक घोड्यांच्या नशिबी मरणयातना

गरज सरो अन् घोडे मरो; माथेरानमध्ये अनेक घोड्यांच्या नशिबी मरणयातना

Subscribe

माथेरानच्या घोड्यांचे होत आहेत हाल...

माथेरानचे प्रमुख वाहन असलेल्या घोड्यांचे कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने हाल होऊ नयेत म्हणून दानशुरांकडून हजारो किलो खाद्य दिले गेले. मात्र अशी माणुसकी या घोड्यांच्या मालकांकडे आहे का, या सवालाचे उत्तर ‘नाही’ असे मिळत आहे. कारण ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे ‘गरज सरो अन् घोडे मरो’ अशी परिस्थिती आहे. आता पुन्हा एकदा मालवाहू घोड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खेचर जातीचे असलेले घोडे मोठ्या प्रमाणात नेरळ आणि नेरळ-माथेरान घाट रस्त्यात फिरताना दिसतात. कर्जत-कल्याण राज्य मार्गावर रात्रीच्या वेळी ठाण मांडून बसलेले किंवा फिरत असताना अनेकदा अपघात होऊन त्यात घोडे मरण पावत असल्याच्या घटना घडत आहेत. मुळात मालवाहतुकीसाठी हे घोडे वापरात असताना त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकून त्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे आजारी पडणे, अशक्त होणे, पाठीला आणि मानेला जखमा होणे यामुळे घोड्यांचे हाल होत असून, निरुपयोगी ठरणारे घोडे नेरळ परिसरात सोडले जात आहेत. मालकांच्या या अमानवी कृतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.धडधाकट असताना भार वाहून नेणारे घोडे ‘युज अँड थ्रो’प्रमाणे झाले असून, त्यांचे उपेक्षेचे जीवन यातनादायी असल्याने त्यांच्यासाठी प्राणीमित्र संघटना धावून येणार आहेत का, याकडे अनेक सहृदयींचे लक्ष लागून राहिले आहे.

जागतिक पर्यटनस्थळांच्या यादीत माथेरानचे नाव आहे. मात्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे या गिरिस्थानावर किरकोळ अपवाद वगळता इंधनावर चालणार्‍या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथे प्रवासी वाहतुकीसाठी हातरिक्षा, घोडे आणि ट्रेन याने वाहतूक केली जाते. माल वाहतुकीसाठी हातगाडीप्रमाणे घोड्यांचा वापर केला जातो. सध्या या ठिकाणी नगर परिषद हद्द आणि परिसरात एमएमआरडीए अंतर्गत विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी सामानाची वाहतूक करायला घोड्यांचा देखील वापर होत आहे. त्यासाठी येथे जवळपास ५०० ते ६०० घोड्यांच्या पाठीवर मालवाहतुकीचे सामान लादून सामान वाहून नेले जात आहे. याच कामात घोडे मालकांकडून जखमी घोड्यांचा वापर होत असून, ३०० ते ४०० किलो वजनाचे ओझे लादले जात असते.

- Advertisement -

…नाहीतर ग्लेंडरसारख्या महाभयंकर आजारांचा सामना करावा लागेल

माथेरानमध्ये सध्या ३०० च्यावर मालवाहू घोडे आहेत. कित्येक घोड्यांना वेळेवर पोटभर खाद्य आणि पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने मालवाहतूक करण्यासाठी वापरलेले घोडे अर्ध्या रस्त्यात देखील अशक्तपणामुळे कोलमडून पडतात. प्रशासनाकडून मालवाहतूक घोड्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने माथेरानकरांना भविष्यात घोड्यांपासून होणार्‍या ग्लेंडरसारख्या महाभयंकर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुक्या प्राण्यांची व्यथा जिव्हारी लागते. याबाबत आम्ही देखील अनेकदा घोड्यांवर अधिक भार लादलेला दिसला तर मालकाला हटकत असतो. याबाबत पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती केली आहे. शासनाने लक्ष देण्याची मोठी गरज आहे. माथेरानमध्ये जी काम सुरु आहेत त्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने घोड्यांचा वापर केला जातो.
– प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

- Advertisement -

मालवाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे खेचर जातीचे घोडे आहेत. त्यांची पाठीवर सामान वाहून न्यायची क्षमता अवघी ५० किलोग्रॅम आहे. तेव्हा त्यांच्यावर अधिक भार पडला तर ते आजारी पडणारच. त्यात त्यांची काळजी देखील घेणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे प्रवासी घोड्यांचा डेटा नोंद करण्यात आल्यामुळे आहे. मात्र मालवाहू घोड्यांची नोंद आणि लसीकरण करण्यात येत नाही. मात्र एखादा जखमी घोड्याला कुणी आणल्यास त्यावर उपचार केला जातो.
-डॉ. ए. आर. रजपूत, पशुवैद्यकीय अधिकारी, माथेरान

मोकाट सोडण्यात आलेल्या घोड्यांचे अपघात होत आहेत. जखमी घोड्यांचे हाल पाहवत नसतात. घोडे अशक्त, आजारी झाल्यानंतर वार्‍यावर सोडून दिले जाते. त्यामुळे पुढे असे अपघात घडल्यास या घोडेमालकांवर गुन्हे दाखल करायला हवेत, त्याशिवाय या मुक्या जीवांची किंमत यांना समजणार नाही.
-गोरख शेप, अध्यक्ष, मानवाधिकार संघटना, रायगड

गेल्या ४ पिढ्या व्यवसाय करतोय. त्यामुळे घोड्याची उत्तमरीत्या काळजी घेत असतो. त्याच्या हालचालींवरून त्याला काय होतेय हे समजण्याची कुवत आमच्यात आहे. आमच्या संघटनेत साधारण १५० घोडे आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे आमच्या सदस्याला वार्‍यावर सोडण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. मात्र मागील काही काळात बाहेरून अनेकजण मालवाहू घोडे घेऊन माथेरानमध्ये व्यवसाय करीत आहेत. त्यांना घोडे सांभाळायची देखील माहिती नाही. तेव्हा त्यांच्याकडून असले प्रकार होत आहेत. उलट असे रस्त्यावर सोडून दिलेल्या घोड्यांची निगा प्रशासन राखणार असल्यास आम्हाला सांगितल्यास ते पकडून देण्याची जबाबदारी घेऊ.
-अनिल चव्हाण, अध्यक्ष, मालवाहू घोडे संघटना

 -ज्योती जाधव


हे ही वाचा – सहकार क्षेत्रातील आवश्यक कामे मविआ सरकार करणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -