जाणता नेता..!

Subscribe

आघाडी होऊन जे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती

रायगडमधील शिवसेनेचे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे शिवसैनिकांचे नेते होऊच शकत नाहीत, असे जाहीर विधान करून आगीत तेल ओतण्याचा आततायीपणा केला आहे. आततायीपणा यासाठी की अनंत गीते हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. तसंच रायगड लोकसभा मतदारसंघातून ते सातत्याने पाच वेळा लोकसभेवर शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला आणि त्यानंतर सहाजिकच गीते हे राजकीय विजनवासात फेकले गेले. मात्र रायगड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात अनंत गीते आणि सुनील तटकरे असा परंपरागत वाद असला तरीही गीते यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्याला याची पूर्ण जाणीव असायला हवी होती की 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीनही परस्पर राजकीय विचारसरणी असलेल्या पक्षांची आघाडी होऊन जे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. त्यांच्या बहुसमावेशकतेमुळे तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांकरिता मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावे यासाठी अडून बसले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या या ठाम निर्णयानंतरही राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना काडीमात्र किंमत दिली नव्हती. यापूर्वीचा जर 2014 पासून म्हणजे अर्थात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे युग अवतरल्यापासून जर भाजपने शिवसेनेशी केलेला व्यवहार तपासून पाहिला तर युतीमध्ये सत्तेत असून देखील शिवसेनेला सातत्याने अवहेलना, अपमान आणि दुय्यम वागणूक भाजपाकडून मिळालेली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तर शिवसेनेच्या मंत्र्यांना काडीमात्र किंमत नसायची. मग ते मातोश्रीवरचे चाणक्य समजले जाणारे सुभाष देसाई असोत की ठाण्याचे एकनाथ शिंदे असोत. शिवसेनेच्या मंत्री, आमदार, खासदार यांना फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर तारेवरची कसरत करत मतदारसंघांतील कामे करून घ्यावी लागत असत.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांचे संबंध फारसे सलोख्याचे नसल्याचा फटका जिल्ह्यात जिल्ह्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना आणि शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सत्तेत असतानाही बसत होता. त्यावेळी अनंत गीते कुठे होते असा प्रश्न जर शिवसैनिकांना पडला तर कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मात्र काल अचानक शिवसैनिकांचा तारणहार असल्याची आठवण झाल्याप्रमाणे अनंत गीते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबतीत जे जाहीर विधान केले ते वास्तविकतः त्यांनी करण्याची काहीही आवश्यकता नव्हती.

अनंत गीते ज्या पक्षात वर्षानुवर्षं आहेत त्या पक्षाची शिस्त त्यांना निश्चितच माहिती आहे. अशावेळी ज्या शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार उलथून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही भिन्न राजकीय विचारसरणी असलेल्या पक्षांची मोट बांधण्याचे काम पवार यांनी केले ते निश्चितच महाराष्ट्रातच नव्हे तर देशात वेगळे संकेत देऊन गेले. 2014 नंतर देशात मोदी लाट आल्यानंतर भाजप नेत्यांची केंद्रातील असो वा राज्यातील असो जी भाषाशैली बदलली त्याचा अनुभव केवळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घेतला असे नव्हे तर पंचवीस वर्षं युतीत असलेल्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसारख्या जुन्या मित्र पक्षांनीही घेतला. ज्या केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते हे कॅबिनेट मंत्री होते त्यावेळी शिवसेना भाजपातील राजकीय संबंध कटू होऊ लागले तेव्हा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते यांना तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीकरता दिल्लीत पाठवले होते. तेव्हा अमित शहा यांच्या भेटी समयी अनंत गीते यांच्याकडील मोबाईलदेखील काढून घेण्यात आला होता.

- Advertisement -

इतका अवमान आणि अपमान सहन केल्यानंतरदेखील अनंत गीते यांना शरद पवार यांच्या इतके भाजपचे नेते कधी का सलले नाहीत, असा प्रश्न आता जर कोणी विचारला तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. याउलट महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तसं बघायला गेल्यास दोन्ही प्रादेशिक पक्ष म्हणूनच वाटचाल करीत होते. दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने राजकीय वाद कुरघोड्या कुरबुरी सुरुच असायच्या, मात्र असे असले तरी देखील शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यातील वैयक्तिक मैत्रीचा ओलावा सदैव कायम राहिला. तसेच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी ज्यांच्यामुळे अस्तित्वात येऊ शकली त्या शरद पवार यांनी जर हट्ट धरला असता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला द्यावे लागले असते. मात्र शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात, त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न घेता ते शिवसेनेकडे आणि त्यातही विशेष करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेण्यास आग्रह केला. यातच त्यांच्यातील कसलेल्या राजकीय नेत्याची अनुभूती राज्यातील जनतेला येऊ शकली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेनेच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा पूर्ण मार्गच बदलून गेला. त्याच बरोबर ज्या शिवसेनेने राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांना आपले कायमचे शत्रू मानले त्याच शरद पवार यांच्या कर्तृत्वामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव व शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ होऊ शकले. एवढा मोठा क्रांतिकारक बदल घडवण्याची आणि आपण घडवलेला बदल पचवण्याची क्षमता शरद पवार या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे म्हणून ते जाणता नेता आहेत. त्यामुळे अनंत गीते रायगडमध्ये काल जे काही बडबडले ते खरेच आहे. शरद पवार यांच्यासारखा जाणता नेता हा अनंत गीते यांचा नेता कधीच असू शकत नाही. गीते यांनी हे विधान रायगडमधील त्यांच्या वैयक्तिक राजकारणातून केल्याचे नंतर उघड झाले.

कारण त्यांच्या त्या विधानाचे शिवसेनेच्या कुठल्याच प्रमुख नेत्याने समर्थन केले नाही, उलट, संजय राऊत यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असे सांगून अनंत गीते यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेच सूचित केले. पण गीतेंच्या या विधानाचे महाविकास आघाडीच्या सरकारला नेहमीच धारेवर धरण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपच्या नेत्यांनी चांगलेच भांडवल केले आहे. त्याचाच फायदा ते घेत आहेत आणि पुढे काळातही घेतील. मी पुन्हा येईन, असा आत्मविश्वास वाटणारे देवेंद्र फडणवीस यांनी तर गीते यांचे विधान अगदी बरोबर आहे, त्यात काहीच चूक नाही. कारण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी ही अनैसर्गिक आहे, असे सांगून शरद पवारांनी ज्या व्यापक दृष्टिकोनातून महाविकास आघाडी स्थापन केली, त्याला धक्के द्यायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -