घरफिचर्ससारांशधोका ओमायक्रॉनचा !

धोका ओमायक्रॉनचा !

Subscribe

कोरोनाने आपल्या वेगवेगळ्या रूपांनी अवघ्या जगाला एकामागून एक धक्के देण्याची सुरू केलेली मालिका दोन वर्षांनंतरही सुरूच ठेवली आहे. आता याच मालिकेतील ओमायक्रॉन नावाच्या रूपाने जगासमोर नवीन संकट उभे केले आहे. दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेला ओमायक्रॉनचा प्रवास भारतासह जगातील 25 हून अधिक देशात सुरू झाला असून महाराष्ट्रात आणि येनकेन प्रकारे आता नाशिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. सद्य:स्थितीत ओमायक्रॉनची तीव्रता फारशी जाणवत नसली तरी, त्याच्या संसर्गाच्या गतीच्या तीव्रतेची प्रखरता पाहता पुढच्या काळात पुन्हा एकदा जगाची गती ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच धोक्याकडे शासनाबरोबरच प्रत्येक व्यक्तीनेही वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

ओमायक्रॉन हा कोरोनाचाच नवीन व्हेरिएंट असल्याचे सिद्ध झाले असले तरी कोरोना आणि ओमायक्रॉन यांची लक्षणे वेगवेगळी असल्याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. यात विशेष चिंता वाढविणारी बाब म्हणजे तरुण आणि प्रौढांपेक्षा याचा धोका 12 वर्षाखालील लहान मुलांना अधिक असल्याचे दिसत आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1511 वर पोहोचली तेव्हा त्यात लहान मुलांची संख्या तब्बल 113 इतकी होती. पहिल्या लाटेत कोरोनाने हाहा:कार माजवला होता तेव्हादेखील एवढ्या प्रमाणात लहान मुलांची रुग्णसंख्या दिसून आली नव्हती. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका पन्नाशीच्या पुढील नागरिकांना सर्वाधिक बसला होता. त्यानंतर आलेल्या दुसर्‍या लाटेच्या प्रकोपाने 20 ते 50 वयोगटातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर जखडले होते. पहिली लाट ओसरत असतानाच दुसर्‍या लाटेचा प्रभाव सुरू झाला.

एकीकडे लॉकडाऊनने अर्थकारण बिघडविले तर दुसरीकडे झालेल्या मोठ्या जीवितहानीने हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या लाटेच्या दाहकतेची झळ कमी होत असतानाच तिसर्‍या लाटेच्या शक्यतेची चर्चा सुरू झाली. दरम्यानच्या काळात लसीकरणाने 100 कोटींचा टप्पाही ओलांडला असला तरी येऊ घातलेली तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असेल याविषयी गल्लीपासून जागतिक स्तरावर चर्चा आणि अंदाज-आडाखे सुरू झाले होते. त्यातच 18 वर्षांच्या आतील मुलांच्या लसीकरणासाठीही वेगवान प्रयत्न सुरू झाले होते. त्यामुळे एकप्रकारे तिसरी लाट लहान मुलांवर येणार यावर सर्वत्र एकवाक्यता झाल्याची स्थिती निर्माण झाली, आणि सद्य:स्थितीत ओमायक्रॉनचे प्राथमिक अवस्थेत जे चित्र समोर येत आहे, त्यात लहान मुलांच्या बाधित होण्याच्या शक्यतेची खातरजमा होताना दिसते आहे. म्हणूनच येथून पुढच्या काळात प्रत्येकाने स्वतःबरोबरच आपल्या मुलांची काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

- Advertisement -

पहिल्या व दुसर्‍या लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून सर्वसामान्य माणूस आणि एकूणच अर्थकारणाचा गाडा रुळावर येऊ पहात असतानाच येऊ घातलेले तिसर्‍या लाटेचे संकट आपल्याला आणि इतर कुणालाही निश्चितच परवडणारे नाही, कारण कोरोनाने आजवर जे भोगायला लावले त्याची आठवणही नकोशी वाटणारी आहे.

आपल्याकडे दुसरी लाट शेवटाकडे आणि अनलॉकची परिस्थिती निर्माण होत असतानाच काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच ओमायक्रॉननेही शिरकाव केलाय, शासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज होऊ लागल्या आहेत. संभाव्य तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे देशासह आपल्या राज्यात तिसर्‍या लाटेची नांदी सुरू झालीय की काय, इतपत शंका निर्माण होण्यास वाव आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉनचा विषाणू घातक नसला तरी त्याची वहन आणि संक्रमणशक्ती अधिक असल्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका अधिक तीव्र आणि वेगाने होण्याचा धोकावजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

- Advertisement -

खरंतर आधीपासूनच ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने काही राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढणे पुढच्या धोक्याची सुरुवात तर नाही ना? यावर विचार करण्याची गरज आहे. पहिल्या लाटेनंतर आता कोरोना संपला, अशा समजुतीने सर्व निर्बंध झुगारून बेफिकीर झालेल्या सर्वांनीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना व इशार्‍याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशाने जे भोगले तशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दिल्ली, चंदिगड आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे, तिथे पुन्हा एकदा पूर्वीसारखे कठोर निर्बंध लादावे लागतील, तसेच आरोग्य यंत्रणांनी वेळीच जागरूक होऊन या स्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

याशिवाय जनतेनेही कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी सक्ती करण्याबरोबरच आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या आणि जास्त रुग्णसंख्या असलेल्या ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या सूचनाही केंद्रीय आरोग्य विभागाने केल्या आहेत. राजकीय सभा समारंभ आणि धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांतील गर्दीवरचे निर्बंध, लग्न व अंत्यविधीसाठी उपस्थितीवर मर्यादा, यासारख्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 10 राज्यांना दिल्या आहेत. या 10 राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या रुग्णसंख्येचे लोण आजूबाजूच्या गावांमध्ये आणि तेथून लगतच्या राज्यांमध्ये पसरले तर पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप होण्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या विषाणूचा संसर्ग झालेले 30 पेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असले तरी यापैकी एकाच्याही प्रकृतीला धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला असून राज्यासाठी आणि देशासाठीही ही समाधानाची बाब आहे. ओमायक्रोनचा विषाणू घातक नसला तरी त्याची वहन आणि संक्रमणशक्ती अधिक असल्यामुळे दुसर्‍या लाटेची पुनरावृत्ती कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या रूपाने होऊ नये यासाठी जेथे जेथे कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, त्या त्या ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासन-प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही दोन पावले पुढे येण्याची गरज आहे.

एकंदरीत विचार केला तर भारतात अजूनही ओमायक्रॉनचा प्रभाव प्राथमिक अवस्थेत आहे. ओमायक्रॉनची रुग्णसंख्या दिसून आली असली तरी ही स्थिती अशीच नियंत्रणात राहिलं याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. जगभरात ओमायक्रॉन लहान मुलांना लक्ष्य करतोय. त्यामुळे भारतातील पालकांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. जे सुरक्षा उपाय आजपर्यंत आपण करत आलो आहोत त्याचे नीट पालन केले तरी ओमायक्रॉनशी आपण संघर्षं करण्यासाठी आपण स्वतःला सक्षम ठेऊ शकतो. येणारा काळ हा कठीण असेल, पण त्यासाठी आपण आतापासूनच तयार राहायला हवे यात शंका नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -