घरफिचर्ससारांशमालवणी बोलीचा बालेकिल्ला !

मालवणी बोलीचा बालेकिल्ला !

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामदेवतांचे जत्रोत्सव, शिमगोत्सव, होलिकोत्सव, गणेशोत्सव व दसरा हे सण मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. अलीकडे पर्यटकांना येथील संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी सिंधु महोत्सव, सागर महोत्सव व क्रीडा महोत्सव यांचं आयोजन करत त्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातोय. देवस्थानांतील महत्त्वाचा उत्सव म्हणजे जत्रा. जत्रोत्सवात मंदिर विद्युतरोषणाई करून दीपमाळ दिव्यांनी मंदिर सजवलं जातं. पूजा-अर्चा, नैवेद्य, आरती, भंडारा आदी सोपस्कार झाल्यावर देवाची पालखीतून मिरवणूक, शोभा-यात्रा आदी कार्यक्रम पार पडतात.

प्राचीनकाळी अपरांत हा उल्लेख असलेला प्रदेश म्हणजे कोकण. ह्या कोकणात अनेक राजघराणी झाली. राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी आपली राजसत्ता गाजवली. १९८१ मध्ये राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून दक्षिणेकडचा भाग वेगळा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली. १२१ किमी सागरीकिनारा लाभलेली समृद्ध किनारपट्टी, अभिजात निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक गड-किल्ले, नटलेली प्राचीन मंदिर, सागरी जैवविविधता, फळ-बागायतींचं वरदान लाभलेल्या सिंधुदुर्गाला पारंपरिक सण व उत्सवांइतकंच कला, साहित्य व संस्कृतीच्या आविष्कारानंही समृद्ध केलं आहे. त्यामुळेच हा जिल्हा पर्यटकांसाठी आवडता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. शेजारील गोवा राज्याप्रमाणेच या जिल्ह्यालाही निसर्गाची दैवी देणगी लाभली आहे. इथल्या सांस्कृतिक परंपरेचं गोव्याच्या संस्कृतीशी साधर्म्य आहे, तरीदेखील ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यापेक्षाही इथली संस्कृती वेगळी आहे.

सिंधुदुर्गवासी देवधर्म, कुळाचार, धर्माचरण, ग्रामसंस्कार, मौखिक परंपरा, सण व उत्सव, यात्रोत्सव यांचे काटेकोर पालन करतात. ऐक्य व सलोखा यांच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गातील धार्मिक, कला, साहित्य व सांस्कृतिक लोकसंस्कृती आजही टिकवलेली आहे. इथल्या अनेक लोककथा व प्रथा या पूर्वापार चालत आलेल्या असून त्यामागे केवळ ग्रामहित व लोककल्याण हाच हेतू आहे. सिंधुदुर्गातील रवळनाथ, माऊली, सातेरी, वेतोबा ही देवस्थानं इतरत्र कोठेच अस्तित्वात नाहीत. प्रत्येक गावात ग्रामदेवता असून वाडीवस्तीवर त्यांची मंदिरं आहेत. कुळाचार व कुळधर्म यांचं पालन करताना तसंच कोणतंही शुभकार्य करताना ग्रामदेवतेचा कौलप्रसाद घेण्याची प्रथा असते. या प्रथा कोकणाबाहेरील लोकांना अंधश्रद्धा वा हास्यास्पद वाटला तरी यांच्या दृष्टीने त्या श्रद्धाच आहेत. अशा काही प्रथांचं पालन करण्यासाठी चाकरमानी जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी गावाकडे परत येतो, ते केवळ मान व श्रद्धेपायी. इथल्या देवळातील मानपानाचे किस्से तर गावच्या ग्रामसभेत चांगलेच रंगले आहेत.

- Advertisement -

ग्रामदेवतांचे जत्रोत्सव, शिमगोत्सव, होलिकोत्सव, गणेशोत्सव व दसरा हे सण मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. अलीकडे पर्यटकांना येथील संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी सिंधु महोत्सव, सागर महोत्सव व क्रीडा महोत्सव यांचं आयोजन करत त्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातोय. देवस्थानांतील महत्त्वाचा उत्सव म्हणजे जत्रा. जत्रोत्सवात मंदिर विद्युतरोषणाई करून दीपमाळ दिव्यांनी मंदिर सजवलं जातं. पूजा-अर्चा, नैवेद्य, आरती, भंडारा आदी सोपस्कार झाल्यावर देवाची पालखीतून मिरवणूक, शोभा-यात्रा आदी कार्यक्रम पार पडतात. आजही आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा, कुणकेश्वर, सोनुर्ली व कर्ली देवीच्या यात्रेला भाविक मोठ्या श्रद्धेने गर्दी करताना दिसतात. कोकणी माणूस मुळातच उत्सवप्रिय असल्याने मोठ्या भक्तिभावाने देवतांच्या या उत्सवांमध्ये सामील होतो. जत्रोत्सवात दशावतारी नाटकं, देवखेळे, नमन, भजन, कीर्तन, प्रवचन, फुगड्या आदी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते. काही ठिकाणी हरिनाम सप्ताह व दिंडी यांचं आयोजन केलं जातं. नवरात्रात सरस्वतीपूजन करतानाच विजयादशमीला ग्रामदेवतेच्या मंदिरात सोनं लुटण्याचा सामुदायिक कार्यक्रम होतो. यातून सामाजिक ऐक्य व सलोखा राखला जातो.

अनेक वैशिष्ठ्यांनी परिपूर्ण असलेल्या सिंधुदुर्गात आजही प्रथांची जपणूक करतानाच संपूर्ण गावाचं सुख व स्वास्थ्य राखण्याच्या कामी कोणतीच तडजोड केली जात नाही. आठ तालुक्यांतील जवळपास सगळ्याच गावांमधून मालवणी व कुडाळी बोलीभाषा बोलल्या जातात त्या याच संस्कृतीच्या अंगीकारामुळे, त्याच्या प्रभावामुळे. काही अभ्यासकांच्या मते कुडाळी व मालवणी भेद दाखवला जातो. परंतु राजसत्तेचा विचार करता कुडाळदेशकर सत्तेमुळे इथल्या बोलीला पूर्वी कुडाळी म्हटले गेले आहे तर स्वातंत्रोत्तर काळानंतर सर्रास इथल्या बोलीला मालवणी म्हटले गेले आहे.

- Advertisement -

अध्यात्माच्या दृष्टीने येथे वारकरी, दत्तात्रय व रामदासी संप्रदाय आढळतात. जशी हिंदूंची मंदिरं आहेत तसंच चर्च, मशिदी व बुद्धविहारही आहेत. तमाशा, दशावतार, चित्रकथी, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, पांगुळाचा खेळ, गोंधळ व वासुदेव आदी प्राचीन परंपरांचा मोठा ठेवा या जिल्ह्यात जपण्याचा प्रयत्न कोकणवासीय आजही करत आहेत. कुडाळ जवळच्या पिंगुळी गावात ह्या कलेला पुनर्जीवन दिले गेले आहे. इथल्याच परशुराम गंगावणे यांना ह्या लोककलेतील कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक संत, महंत या मातीत लोकप्रबोधनाचं कार्य करून गेले त्यापैकी दाणोलीचे साटम महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज, टेंबे स्वामी यांचं कार्य मोलाचं आहे.

सिंधुदुर्गात प्राचीन शिल्पकलेच्या नमुन्यामध्ये कुणकेश्वर, विमलेश्वर व रामेश्वर आदी मंदिरे आढळतात. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर तर आजूबाजूच्या चौर्‍यांशी खेडेगावांचा अधिपती मानला जातो. सावंतवाडीतील चितारआळी येथील लाकडी खेळणी बनवणारे कारागीर व त्यांची कला जगप्रसिद्ध आहे. लाखकाम, वाडे येथील अडकित्ते अशा अनेक कला, लोककला, संगीत, चित्रं, शिल्पकला पाहायला मिळतात. तसंच साहित्य, संस्कृती-परंपरा यात आपलं योगदान देत संपूर्ण जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे महान कार्य इथल्या लोकांनी केलं आहे. म्हणूनच आज हा जिल्हा जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. इथल्या संस्कृती-परंपरांची महती, लोकप्रियता आता अटकेपार पोहोचली आहे. उत्तम पर्यटनाचा अनुभव प्रवासी पर्यटकांना मिळत असल्यामुळे या जिल्ह्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

इथल्या बहुतेक रूढी परंपरा ह्या शेतीशी निगडित आहेत. देसरूढ, वाडवळसारख्या रूढी असूदेत किंवा गुढीपाडवा, होळीसारखे अगदी दिवाळी (चावदीस) असू दे, ह्या सणांना साजरे करण्याची पद्धत ही इथल्या कृषीसंस्कृतीशी निगडित आहे. ह्यादिवशी लावण्यात येणार्‍या तोरणात मुद्दाम भाताच्या केसराचा समावेश केला जातो.

इथल्या गावागावात चालणार्‍या गजालीना इथल्या ग्रामसंस्कृतीत एक वेगळे महत्व आहे. इथल्या माणसाची बोलण्याची तर्‍हा ही काही वेगळीच. इथल्या ह्या बोलीने इथल्या माणसाचे वेगळेपण ठळकपणे अधोरेखित होते. कोणी चौकशी करावी ह्या हेतूने अमक्या अमक्याचे घर तुमच्या घरापासून किती लांब आहे? त्यावर तो कोकणी अहो, लांब कुठले. त्याच्या मांडवाला आग लागली तर माझ्या घरातून दिसेल. अस बोलला तर आश्चर्य वाटू नये. इथल्या मालवणी बोलणार्‍या माणसाची ही बोली शिवराळ वाटत असली तरी बोलीचा तो रगेलपणा आपसूक त्या मातीचा गुण सांगतो. इथल्या लोककलेबरोबर गावागावात असणारे वैद्य जे इथल्या औषधी वनस्पती जाणतात, त्या औषधी हरप्रकारचे रोग बरे करण्यास समर्थ आहेत.

इथल्या माणसांचे गुराढोरांना औषधोपचार करण्यासाठी ह्या वैद्यलोकांवर जास्त विश्वास आहे. इथले अनेक मूर्तिकार, शिल्पकार, चित्रकार लौकीकार्थाने पुढे आले नाहीत तरी आंतरराष्ट्रीय तोडीची कला ते निर्माण करत आहेत. गावोगावी चालणार्‍या भजनातील भजनीबुवा, तबलजी कितीतरी दर्जेदार कला निर्माण करतात. इथले दशावतारी कलावंत आपली कला सादर करण्यासाठी उभे राहिले की, रंगमंच हलवून सोडतात. इथल्या देवगड हापूसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाव मिळवले आहे. इथल्या भूमीचा गंध ह्या पानाफुलात उतरला आहे, परंतु आजही काही विनाशी प्रकल्प ह्या जिल्ह्याचा हा चेहरामोहरा बदलून टाकतील की काय ही भीती सारखी वाटते आहे.

ह्या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे इथली साहित्यसंस्कृती. साठोत्तरी काळात चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू, कवी डॉ. वसंत सावंत, गुरुनाथ धुरी, आ. ना. पेडणेकर या कवींनी सिंधुदुर्गाच्या साहित्य संस्कृतीला मराठी साहित्याच्या नकाशावर आणले. मधु मंगेश कर्णिक हे इथल्या मातीतील साहित्यरत्न आज वयाच्या नव्वदीतदेखील साहित्य निर्मिती करतात हे विशेष!. ह्यानंतरच्या काळात डॉ. महेश केळुसकर, डॉ. अनिल धाकू कांबळी, गजलकार मधुसूदन नानिवडेकर, कृष्णा देवळी यांनी साहित्याची पताका फडकवत ठेवली. नव्वदीच्या काळात प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, अजय कांडर, गोविंद काजरेकर, प्रा. सिद्धार्थ तांबे ही नावे मराठी साहित्याच्या प्रवाहात वावरताना आढळतात.

गजलच्या प्रांतात नानिवडेकर यांच्यानंतर तेवढ्या ताकदीची गजल आज पुढे येत नाही, त्याचप्रमाणे कथा हा साहित्यप्रकार ह्या जिल्ह्यात तितकासा अजून रुजला नाही. मधु मंगेश कर्णिक, मनोहर कदम, जयंत पवार यांच्यानंतर त्या तोडीचा कथालेखक आजच्या मितीला इथे नाही ही खरं तर चिंतेची बाब आहे. इथल्या अनेक कवी-लेखकांनी म्हणजे डॉ. नामदेव गवळी, दादा मडकईकर, प्रभाकर भोगले यांनी इथली मालवणी बोली वापरून साहित्यनिर्मिती केली हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते.

एकंदरीत गेल्या चाळीस वर्षात अनेक बदल ह्या जिल्ह्यात झाले. विकासाच्या नव्या कल्पना विस्तारत असताना इथला निसर्गदेखील तेवढाच ढासळत चालला आहे हे दृष्टीआड करता येत नाही. आता मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण चालू आहे. आजूबाजूला कौलारू घरांची छपरे दिसत नाहीत. फक्त उभ्या उंच बिल्डिंगी दिसतात. हीच कदाचित नव्या सिंधुदुर्गाची नांदी असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -